दिवाळी पाडवा...सोने, वाहने खरेदीला उत्साह

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 नोव्हेंबर 2016

कोट्यवधींची उलाढाल : एका महिन्यात दोन पगारांसह बोनस मिळाल्याने ग्राहकांचा हात सैल
सांगली - उत्सवात खरेदीचे मोल नसते. त्यात साडेतीन मुहुर्तातील मुहूर्त असेल तर सोने, वाहने, इलेक्‍ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीला उधाण येते. काल (सोमवारी) दिवाळी पाडव्यानिमित्त बाजारपेठ ग्राहकांनी फुलून गेली होती. सराफ पेठेसह, वाहनांचे शोरूम, मोबाइल शोरूम, कापड पेठेत सुमारे 50 कोटींची उलाढाल झाली. एका महिन्यात दोन पगारांसह बोनस मिळाल्याने ग्राहकांनीही हात सैल सोडत खरेदीचा आनंद लुटला.

कोट्यवधींची उलाढाल : एका महिन्यात दोन पगारांसह बोनस मिळाल्याने ग्राहकांचा हात सैल
सांगली - उत्सवात खरेदीचे मोल नसते. त्यात साडेतीन मुहुर्तातील मुहूर्त असेल तर सोने, वाहने, इलेक्‍ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीला उधाण येते. काल (सोमवारी) दिवाळी पाडव्यानिमित्त बाजारपेठ ग्राहकांनी फुलून गेली होती. सराफ पेठेसह, वाहनांचे शोरूम, मोबाइल शोरूम, कापड पेठेत सुमारे 50 कोटींची उलाढाल झाली. एका महिन्यात दोन पगारांसह बोनस मिळाल्याने ग्राहकांनीही हात सैल सोडत खरेदीचा आनंद लुटला.

सोन्याच्या मागणीत मोठी वाढ
गतवर्षीच्या तुलनेत कमी झालेला दर यामुळे सराफ पेठेत खरेदीला चांगली गर्दी होती. या वर्षी वीस ते पंचवीस टक्‍क्‍यांनी सोन्याच्या मागणीत वाढ झाल्याची माहिती सराफ व्यावसायिकांनी दिली. काही ठिकाणी खरेदीवर सवलत योजना लागू केल्याने खरेदीत वाढ झाली असण्याची शक्‍यताही सराफांनी व्यक्त केली. सराफ बाजारात सुमारे पाच कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा अंदाज असून, जिल्ह्यात सुमारे 21 कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा अंदाज सराफ व्यावसायिक बाबूराव जोग यांनी व्यक्त केली. परंपरागत दागिने खरेदीकडे नागरिकांचा कल होता. यंदा सोन्याचा दर दहा ग्रॅमला 30 हजार 700 रुपये, तर चांदीचा दर 43 हजार 700 रुपये प्रति किलो होता.

स्मार्टफोन, लॅपटॉपची उलाढालही मोठी
स्मार्टफोन, लॅपटॉप, टॅब्लेट यांच्यासह इलेक्‍ट्रॉनिक वस्तूंच्या बाजारपेठेतही मोठी उलाढाल झाली. भाऊबीजेला तसेच पाडव्याला भेटवस्तू म्हणून स्मार्टफोन, टॅब्लेट देण्याचा कल तरुणाईत दिसून येतो.

कापड पेठेतही गर्दी
सराफ पेठेबरोबरच कापड पेठेतही खरेदीचा उत्साह दिसून आला. रेडिमेड कपड्यांचे नवनवीन प्रकार आणि त्यावर सवलती यामुळे या ठिकाणी गर्दी होती. गेल्या वेळेपेक्षा सुमारे वीस टक्‍क्‍यांनी कपड्यांची विक्री वाढली असल्याचे हरभट रोड, कापड पेठेतील व्यापाऱ्यांनी सांगितले. विशेष करून महिला, युवतींचा कल कापड पेठेत जास्त होता. साड्यांबरोबरच पैठणी आणि शालूच्या विविध प्रकारांना मागणी होती.

इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तूंची दिवाळी
इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तूंवर मोठ्या प्रमाणात गिफ्ट आर्टिकल्स असल्याने त्याकडेही ग्राहकांची पसंती दिसून आली. एलइडी टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशिन, एसी यांना मोठी मागणी राहिली. मायक्रोवेव्ह, मिक्‍सर, फूड प्रोसेसर आदी गृहोपयोगी वस्तूंची बाजारपेठ टिकून आहे. या बाजारपेठेत सुमारे चार ते पाच कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

वाहन बाजारात धूम
दसऱ्यानंतर दिवाळी पाडवा हा वाहन खरेदीचा मोठा मुहूर्त मानला जातो. त्यामुळे वाहनांची शोरूमही हाऊस फुल्ल होती. गतवर्षीपेक्षा दहा ते पंधरा टक्के वाढ झाली आहे. दुचाकी आणि चार चाकी वाहनांची विक्री चांगली झाली. वाहनांचे बुकिंग करून पाडव्या दिवशी डिलिव्हरी घेणाऱ्या ग्राहकांची गर्दी जास्त होती.

ऑनलाइन मार्केटचा परिणाम नाही
ऑनलाइन मार्केटची धूम दसरा, दिवाळीपूर्वी होती. अगदी कपड्यांपासून फ्रीज, एलइडी, स्मार्ट फोन, टॅब्लेट आदींना मोठी मागणी होती. फ्लिप कार्ट, स्नॅपडील, ऍमेझॉन यांसारख्या ऑनलाइन मार्केटमधील काही बड्या कंपन्यांनी दिलेला भरघोस डिस्काउंट व ऑफरमुळे मोठा ग्राहकवर्ग आकर्षित करून घेण्यात त्यांना यश मिळाले; मात्र प्रत्यक्ष दिवाळीत ग्राहकांनी बाजारपेठेत खरेदीला प्राधान्य दिले. ऑनलाइन मार्केटचा केवळ पाच ते दहा टक्के परिणाम झाला असे दुकानदारांनी सांगितले.

इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तूंना यंदा मोठी मागणी होती. सुमारे चार ते पाच कोटींची उलाढाल झाली. ऑनलाइन मार्केटकडे कला वाटत असला तरी प्रत्यक्षात त्याची माहिती घेणे आणि दुकानात खरेदी करणे असाच प्रकार ग्राहकांमध्ये आहे. विक्रीपश्‍चात सेवेसाठी प्रत्यक्ष दुकानात खरेदी करणे फायद्याचे असल्याने ऑनलाईन मार्केटचा फारसा परिणाम झाला नाही.
- सुनील मालू, श्री इलेक्‍ट्रॉनिक्‍स

सोन्याच्या मागणीत गतवर्षीपेक्षा सुमारे 25 टक्‍के वाढ झाली आहे. आजही सोने गुंतवणुकीसाठी सुरक्षित आणि फायदेशीर असल्याने नागरिकांचा सोने खरेदीकडे कल वाढतो आहे. जिल्ह्यात सुमारे 60 ते 70 किलो सोन्याची विक्री झाली असल्याचा अंदाज आहे. त्यानुसार सुमारे 21 कोटी रुपयांची उलाढाल झाली.
- बाबूराव जोग, सराफ व्यावसायिक

Web Title: diwali padwa gold, vehicle purchasing