पालावर उगवली दिवाळी पहाट

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 ऑक्टोबर 2016

पालावरच्या मुलांसोबत दिवाळी साजरी करून मिळालेला आनंद शब्दांत सांगता येणार नाही. समाजाच्या विविध घटकांतील मंडळी या उपक्रमात सहभागी झाली होती. पालावरची मुले समाजाच्या मुख्य प्रवाहात यावीत, यासाठीही आम्ही प्रयत्न करतोय.
- अनु तीरनगरी, सामाजिक कार्यकर्त्या

सोलापूर - रस्त्याच्या कडेला असलेल्या पालावर आज वेगळाच उत्साह होता.., मुला-मुलींच्या हातात शालेय साहित्यासोबत दिवाळीचा फराळ आणि भेटवस्तू होत्या.., भटक्‍या कुटुंबातील लहानथोरांना झालेला आनंद पाहून हीच खरी दिवाळी अशी भावना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होती.. हे वातावरण आहे अक्कलकोट रस्त्यावरील महालक्ष्मी मंदिराजवळील पालावरचे. सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन शुक्रवारी सकाळी पालावर राहणाऱ्या मुला-मुलींसोबत दिवाळी साजरी केली.

सामाजिक कार्यकर्त्या तरुणींनी पालावर सुंदर रांगोळी काढली होती. मुलांसह पालावर राहणाऱ्या मोठ्यांनाही या आगळ्या वेगळ्या दिवाळीची उत्सुकता होती. आपापली ओळख करून देऊन कार्यक्रमाला सुरवात झाली. दिवाळी साजरी करण्यासाठी आलेल्या कोणाच्या हातात शालेय साहित्य होते, तर कोणी दिवाळीचा फराळ आणला होता. काहींनी नवीन कपडे, सुगंधी उटणे, तेल तर काहींनी फळेही आणली होती. पाहता पाहता सगळेच आगळी वेगळी साजरी करण्यात दंग झाले. रस्त्यावरून जाणारी मंडळी उत्सुकतेने पाहत होती. आयुष्यात पहिल्यांदाच पालावर अशा प्रकारची दिवाळीची साजरी होत असल्याचा आनंद भटक्‍या कुटुंबातील सदस्यांना लपविता आला नाही. समाजाच्या विविध घटकांतील मंडळी मुलांसमवेत खाली बसून, उत्साहाने संवाद साधत होती. तास-दोन तास झाले तरी पालावरून जाण्याची इच्छा होत नव्हती. वंचित घटकांसोबत दिवाळी साजरी करून एक वेगळा आनंद मिळाल्याची भावना सर्वांच्या चेहऱ्यावर होती.

सामाजिक कार्यकर्ते अमोल मोहिते, मनोज देवकर, अनु तीरनगरी यांच्या पुढाकारातून पालावरची दिवाळी साजरी झाली. याप्रसंगी नीता रोडगे, अभय रोडगे, सुशांत वाघचौरे, वंदना करजगीकर, कामिनी गांधी, वसुंधरा शर्मा आदी उपस्थित होते.

Web Title: Diwali pahat with orphan childrens