लक्ष लक्ष दिव्यांनी उजळले ज्ञानेश्वर मंदिर 

सुनील गर्जे
मंगळवार, 26 नोव्हेंबर 2019

"पैस' खांबास पहिला दीप अर्पण करून संजीवन सोहळ्यानिमित्त अभिवादन करण्यात आले. नंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून दीपोत्सव सुरू झाला. 

नेवासे : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यास 724 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल संत ज्ञानेश्वर महाराजांची कर्मभूमी असलेल्या श्रीक्षेत्र नेवासे येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरासमोर आज सायंकाळी करण्यात आलेल्या दीपोत्सवाने संत ज्ञानेश्वर मंदिर उजळून निघाले. 

माऊलींच्या 724व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त "पैस' खांबाचे विधिवत पूजन मंदिराचे प्रमुख शिवाजी महाराज देशमुख, महंत उद्धव महाराज, महंत सुनीलगिरी महाराज, प्रा. डॉ. जयश्री गडाख, उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील, मधुकर देशपांडे यांच्या हस्ते झाले. "पैस' खांबास पहिला दीप अर्पण करून संजीवन सोहळ्यानिमित्त अभिवादन करण्यात आले. नंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून दीपोत्सव सुरू झाला. 
संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरासमोर 724 दीप भाविकांच्या हस्ते लावण्यात आले. दीपोत्सवाने संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर व परिसर उजळून निघाला. जालिंदर गवळी, अनिल पेचे, इम्रान दारूवाला, सचिन पंडुरे, जयदीप जामदार, अशोक डहाळे, निखिल शिंगवी, भैया कावरे आदी उपस्थित होते. 

मंदिराचा इतिहास असा 

"ज्ञानेश्वरी'मध्ये लाडमोड व माळीमोह या दोन गावांतील लाडमोड टेकडीच्या दक्षिण पायथ्याला लागून असलेल्या करविरेश्वर (शिवमंदिर) मंदिरातील एका खांबाला टेकून संत ज्ञानेश्वरांनी गीतेवर भाष्य केले. त्यांनी या ग्रंथाच्या उपसंहारात श्रीक्षेत्र नेवाशाबद्दल पुढील उद्‌गार काढले आहेत. 

ऐसे युगी परिकाळी I आणी महाराष्ट्र मंडळी I 
श्री गोदावरीच्या कूली I दक्षिणीला I 
त्रिभुवनैक पवित्र I अनादि पंचक्रोशक्षेत्र I 
जेथे जगाचे जीवसूत्र I श्री महालया असे I 

तीर्थक्षेत्र योजनेत समावेश 
ज्ञानेश्‍वर मंदिर सुमारे चारशे-पाचशे वर्षे उपेक्षितच राहिले. वैकुंठवासी बन्सी तांबे महाराज व सोनोपंत दांडेकर महाराज यांनी 1959 च्या काळात मंदिराच्या विकासास प्रारंभ केला. त्या वेळी येथे ज्ञानेश्वरीची 51 पारायणे झाली. तांबे महाराजांनी ज्ञानेश्वरीचा प्रसार व प्रचार केल्याने दुर्लक्षित असलेल्या या संत ज्ञानेश्वर मंदिर व "पैस' खांबाची ख्याती सर्वदूर पोचली. याच दरम्यान पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी या मंदिरासाठी सभामंडप दिला. 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Dnyaneshwar Temple is lit by the lamps