डॉक्‍टर नेमणूक प्रक्रिया पुन्हा राबवा; सीईओ गुडेवार यांनी चूक मान्य करावी यांचा आहे आरोप

अजित झळके
Friday, 10 July 2020

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार यांनी कंत्राटी डॉक्‍टरांच्या नेमणूका करताना कायदा पाळलेला नाही. त्यांनी ही चूक मान्य करावी.

सांगली : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार यांनी कंत्राटी डॉक्‍टरांच्या नेमणूका करताना कायदा पाळलेला नाही. त्यांनी ही चूक मान्य करावी. सध्याच्या नेमणुका रद्द कराव्यात आणि नव्याने नेमणूक प्रक्रिया राबवावी, अशी मागणी जिल्हा परिषदेचे सदस्य जितेंद्र पाटील यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली. 

ते म्हणाले, ""जिल्हा परिषदेने करारावर 306 डॉक्‍टरांनी निवड केली. परीक्षा घेऊन त्यातून निवड करण्यात आली. 158 पुरुष आणि 148 महिलांची निवड झाली. त्यांना नेमणूका कशा द्याव्यात, याबाबत राज्य शासनाची मार्गदर्शक सूचना मार्च महिन्यात प्राप्त झाली होती. त्याकडे गुडेवार यांनी सपशेल दुर्लक्ष केले. या सूचनेनुसार, आधी सीईओंनी डॉक्‍टरांना त्याच्या गावाजवळील उपकेंद्रात नेमणूक द्यायला हवी होती. कोरोनाचा साथ आटोक्‍यात आल्यानंतर समुपदेशनाने त्यांना नेमणूक बदलता आली असती.

गुडेवार यांनी आता कोरोना संपलाय, असा युक्तीवाद करणे चुकीचे आहे. कारण, जिल्ह्यात जमावबंदी आहे. अंत्येष्ठीला 20, लग्नाला 50 लोकांवर कुणी जमवू शकत नाही. इथे 306 लोकांची गर्दी करून काय निष्पन्न केले. ही प्रक्रिया चुकीचीच होती. त्यांनी 40 ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अगदी नजीक असलेल्या गावातील उपकेंद्रांवर डॉक्‍टरांना नेमणूक दिली. ती काही दिवसांनी त्यांच्या लक्षात आली. ती रद्द करून या लोकांना तपासणी नाक्‍यावर काम दिले. ही चूक तर मान्य करावी.'' 

ते म्हणाले,""आता ही प्रक्रियाच चुकीची असल्याचे कबूल करून गुडेवार यांनी डॉक्‍टरांच्या सध्याच्या नेमणुका रद्द कराव्यात. कायद्यानुसार नव्याने ही सर्व प्रक्रिया राबवावी. त्यात डॉक्‍टरांना त्यांच्या गावाजवळ नेमणूक द्यावी. तपासणी नाक्‍यावर नेमलेल्या डॉक्‍टरांनाही नेमणूका द्याव्यात.'' 

भाषा चुकीची 

जितेंद्र पाटील म्हणाले,""कंत्राटी डॉक्‍टर सीईओ चंद्रकांत गुडेवार यांना विनंती करायला गेले होते. त्यांनी अतिशय चुकीच्या भाषेत त्यांना उत्तरे दिली. त्याची व्हिडिओ क्‍लीप माझ्याकडे आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने युवक डॉक्‍टरांशी अशा भाषेत बोलणे योग्य नव्हते.''  

संपादन - युवराज यादव 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Do ahain doctor appointment process; CEO Gudewar should admit the mistake