मुंगेरीलाल के हसीन सपने नका हो पाहूऽऽऽ

सोलापूर - महापालिका निवडणुकीसंदर्भात शुक्रवारी सायंकाळी रंगलेल्या चर्चेत सहभागी भाजपच्या नगरसेविका रोहिणी तडवळकर, कॉंग्रेसचे बाबा मिस्त्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पीर अहमद शेख.(छायाचित्र - विजयकुमार सोनवणे)
सोलापूर - महापालिका निवडणुकीसंदर्भात शुक्रवारी सायंकाळी रंगलेल्या चर्चेत सहभागी भाजपच्या नगरसेविका रोहिणी तडवळकर, कॉंग्रेसचे बाबा मिस्त्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पीर अहमद शेख.(छायाचित्र - विजयकुमार सोनवणे)

सोलापूर - महापालिका निवडणुकीचे वातावरण पालिका परिसरात तापू लागले आहे. प्रारुप प्रभाग रचना जाहीर झाल्यामुळे कोण कुठे उभारणार आणि कुणाची सत्ता येणार यावर विद्यमान नगरसेवकांमध्ये चर्चा रंगू लागली आहे. महापालिकेत यंदा सत्तांतर होणारच असा दावा भाजपवाल्यांकडून केला जात असल्याने, "मुंगेरीलाल के हसीन सपने नका हो पाहू...' असा टोला कॉंग्रेसवाल्यांकडून मारला जात आहे, त्याला तितक्‍याच जोरदारपणे, "पक्षातलेच शेख चिल्ली कॉंग्रेसला सत्तेपासून दूर नेतील' असा प्रतिटोला भाजपकडून दिला जात आहे.

माजी महापौर आरीफ शेख, स्थायी समितीचे माजी सभापती बाबा मिस्त्री, शिवलिंग कांबळे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक पीरअहमद शेख, भाजपच्या नगरसेविका रोहिणी तडवळकर व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेविका बिस्मिल्ला शिकलगार सायंकाळी एकत्र आले आणि त्यांच्यात गप्पा सुरु झाल्या. कोणत्या क्रमांकाचा प्रभाग कोणासाठी "सोईचा' आहे, कोण अडचणीत आले आहे, कुणाला पक्षाकडून अडचणीत आणले जाणार आहे याची दिलखुलास चर्चा यावेळी रंगली.

गप्पांच्या ओघात महापालिकेत कोणाची सत्ता येणार यावर चर्चा सुरू झाली. त्यावेळी श्री. कांबळे यांनी "मुंगेरीलाल के हसीन सपने पाहू नका, सत्ता आमचीच येणार', असा टोला सौ. तडवळकर यांना हाणला. त्याला सौ. तडवळकर यांनीही तितकेच जोरदार प्रत्त्युत्तर देत, "आमचे सोडा, तुमच्या पक्षातील "शेख चिल्ली'च तुम्हाला सत्तेपासून दूर नेतील' असा प्रतिटोला लगावला. ही चर्चा सुरु असताना श्री. मिस्त्री, आरीफ शेख आणि श्रीमती शिकलगार एका कोपऱ्यात जाऊन चर्चा करू लागले. ते पाहिल्यावर परत निघालेले पीरअहमद शेख यांनी दुचाकी थांबवली. हे पाहून मिस्त्री आले व त्यांनी शेख यांची गळाभेट घेतली. पक्षांतर्गत अडचणी कुणामुळे वाढणार, कोण कुणाला अडचणीत आणणार, उमेदवारी न मिळाल्यास स्वीकृतसाठी कसा प्रयत्न करणार, महापौरपदाचा दावा कोण करणार यावर गप्पा सुरु झाल्या. विद्यमान नगरसेवकांमध्ये रंगलेल्या या गप्पांमध्ये परिसरात उभारलेल्या काही कार्यकर्त्यांनी सहभाग घेत स्वतःजवळची माहिती पुरवली. एकूणच महापालिका निवडणुकीचा ज्वर जसजसा वाढू लागला आहे, तसतसे प्रभाग रचना आणि उमेदवारीवरून नगरसेवकांमध्ये चर्चेच्या फैऱ्या झडू लागल्या आहेत.

शिंदे घेणार बंद खोलीत आढावा
माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे उद्या (शनिवारी) रात्री आठ वाजता नगरसेवकांसमवेत बैठक घेणार आहेत. कॉंग्रेसभवनमध्ये होणाऱ्या या बैठकीला फक्त नगरसेवकांनाच प्रवेश दिला जाणार आहे. त्यांनी सोबत कोणालाही आणू नये, असा "व्हीप'च शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी काढला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com