सर्किट बेंचच्या लढ्याला पुण्याचा टेकू नको

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 मार्च 2017

कोल्हापूर - उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापूरसह पुण्यातही व्हावे, अशा संयुक्त मागणीचा पुढे आलेला प्रस्ताव जिल्हा बार असोसिएशनच्या बैठकीत वकिलांनी गुरुवारी धुडकावून लावला. सहा जिल्ह्यांचा लढा यशाच्या उंबरठ्यावर आहे. लढ्याला आता पुण्याच्या टेकूची गरज नाही, असा सूर बैठकीत उमटला. सर्किट बेंचबाबत पुढाकार घेतलेल्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अभिनंदनाचा ठरावही बैठकीत झाला.

मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचबाबत पालकमंत्री पाटील यांनी नुकतीच सर्वपक्षीय खंडपीठ कृती समितीची बैठक घेतली. त्यात सकारात्मक पवित्रा घेत त्यांनी उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींसह मुख्यमंत्र्यांची लवकरच बैठक घेऊन याबाबत निर्णय घेण्याचे आश्‍वासन दिले. त्यामुळे कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांतील वकिलांच्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. कोल्हापूरसह पुण्याचीही सर्किट बेंचसाठी मागणी आहे. सरकारकडे ही मागणी कोल्हापूर व पुणे अशी संयुक्तपणे करूया, असा प्रस्ताव सातारा येथील विधिज्ञ धैर्यशील पाटील यांच्यामार्फत जिल्हा बार असोसिएशनला आला होता. यासंबंधी ज्येष्ठ वकिलांनी त्यांच्याशी चर्चा केली. यावर सहा जिल्ह्यांतील वकिलांचे मत घेतल्याशिवाय निर्णय घेता येणार नाही, असे त्यांनी ऍड. पाटील यांना सांगितले.

पुण्याचा प्रस्ताव आज जिल्हा बार असोसिएशनच्या बैठकीत अध्यक्ष प्रकाश मोरे यांनी चर्चेसाठी मांडला. त्याला वकिलांनी कडाडून विरोध केला. सर्किट बेंचचा लढा 35 वर्षे सहा जिल्ह्यांतील वकील लढत आहेत. आता हा लढा यशस्वी होण्याच्या उंबरठ्यावर आहे. त्याला आता कोणाच्या पाठिंब्याची गरज नाही. आपला लढा आपणच लढू आणि यशस्वी करू. त्याला कोणाच्या टेकूची गरज नाही, अशा प्रतिक्रिया वकिलांनी व्यक्त करत पुण्याचा प्रस्ताव एकमताने धुडकावून लावला.

आंदोलन सुरूच राहणार
मुख्यमंत्र्यांची भेट होईपर्यंत साखळी उपोषणाचे आंदोलन सुरू राहावे, असा प्रस्ताव पुढे आला. जोपर्यंत सर्किट बेंचबाबत सकारात्मक निर्णय होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील. सहा जिल्ह्यांतील सर्व वकिलांनी काम बंद ठेवून एक दिवस या आंदोलनात सहभागी व्हावे, यासाठीही नियोजन सुरू असल्याचे ऍड. घाटगे यांनी स्पष्ट केले. त्याचे सर्व वकिलांनी स्वागत केले.

Web Title: Do not prop Pune circuit bench in the fight