छत्रपतींच्या घराला स्वाभिमान शिकवू नका : शिवेंद्रसिंहराजे

प्रशांत गुजर
मंगळवार, 16 जुलै 2019

मागील अनेक दिवसांपासून माझ्या भाजप प्रवेशाच्या बातम्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरू झाल्या आहेत. परंतु, अजूनही याबाबत मी कोणताही निर्णय घेतलेला नाही.

सायगाव-सातारा : जावळीतील आपले विरोधक कोण आणि कोण कोण विरोधात उभे राहणार, हे तुम्हाला माहीत आहे. त्यांच्याविषयी जास्त न बोललेलं बरं. त्यांचा प्रचार सुरू झाला आहे. जावळीचा स्वाभिमान त्यांना आता दिसू लागला आहे. छत्रपतींच्या घराला तुम्ही स्वाभिमान शिकवू नका. जावळी आणि छत्रपती घराण्याचे नाते काय आहे, हे सर्वांना माहिती आहे. ते राजकीय नेत्यांनी आम्हाला सांगू नये, असा गर्भित इशारा आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिला.
 

सायगाव (ता. जावळी) येथे जावळी पंचायत समितीच्या सायगाव गणातील पदाधिकारी, कार्यकर्ता मेळावा झाला. त्यात आमदार भोसले बोलत होते. दीपक पवार यांचा नामोल्लेख टाळून आमदार भोसले म्हणाले, ""ज्यांना स्वतःच्या गटाचे प्रवेशद्वार असलेल्या आनेवाडीचा रस्ता होत नाही, त्यांनी वेळेकामथीत जावून मी हे काम मंजूर केले, माझ्या माध्यमातून कोट्यवधींचा निधी आणला, रस्ता झाला, आमदारांनी काही काम केलेले नाही, अशा फुशारक्‍या मारू नयेत. कोणी कितीही दंडेलशाही केली, दमबाजी केली तर त्याला मी सक्षम आहे, हे जिल्ह्याने पाहिले आहे. त्यामुळे कोणी पैलवान जरी समोर असला तरी त्याला चारी मुंड्या चित करण्याची ताकद माझ्यात आहे. तुम्ही कुणीही घाबरू नका. मी तुमच्या पाठीशी आहे. आपण निवडणुकीला सामोरे जाताना केलेले काम जनतेसमोर ठेवायचे.'' 

मागील अनेक दिवसांपासून माझ्या भाजप प्रवेशाच्या बातम्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरू झाल्या आहेत. परंतु, अजूनही याबाबत मी कोणताही निर्णय घेतला नसून, योग्य वेळ येईल तेव्हा याचा विचार करावा लागेल, अशी परिस्थिती लोकसभा निवडणुकीपासून झाली आहे. सध्या सुरू असलेल्या चर्चा जर तरच्या आहेत. ठाणे जिल्ह्यातील शहापूरच्या राष्ट्रवादीच्या आमदारांनी शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत 
पक्षप्रवेश केला, अशी गोष्ट तर मी केलेली नाही. गेल्यावेळी मेढ्यामधील कार्यक्रमातदेखील मी हेच सांगितले होते, जे काही करायचे ते सर्वसंमतीने करायचे. शिवेंद्रसिंहराजे म्हणून किंवा आमदार म्हणून मी निर्णय घेणार नाही. आता वेळ आली आहे असे नाही. परंतु, पुढील काळात निर्णय घ्यायचा झालाच तर जावळी तालुक्‍याला विचारात नक्कीच घेतले जाईल, असेही आमदार भोसले यांनी सांगितले. 

मेळाव्यास पंचायत समिती सदस्य सौरभ शिंदे, प्रतापगड कारखान्याचे उपाध्यक्ष राजेंद्र फरांदे, शिवाजी गोरे, संजय निकम, पोपट फरांदे, सुनील फरांदे, शरद निकम, मच्छिंद्र मुळीक, नितीन पाटील, प्रवीण देशमाने, संजय जेधे, आप्पासाहेब फरांदे, गणातील कार्यकर्ते उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Do not teach Chhatrapati's house self-respect says ShivendraSinghraje