राजकारण करा; पण योजना बंद नका पाडू

निखिल पंडितराव
गुरुवार, 11 मे 2017

गुंता थेट पाईपलाईनचा - राजकीय सुडामध्ये कोल्हापूरवासीयांना भरडू नका

गुंता थेट पाईपलाईनचा - राजकीय सुडामध्ये कोल्हापूरवासीयांना भरडू नका
कोल्हापूर - थेट पाईपलाईन योजनेचे काम बंद पाडणे किंवा ही योजनाच पुढे जाणार नाही, अशी भूमिका राजकीय नेत्यांनी घेतल्यास कोल्हापुरातील नागरिकांच्या तोंडाला पुन्हा एकदा पाने पुसण्याचे काम राजकीय नेतेमंडळींकडून केले जाईल. निव्वळ राजकारणासाठी या योजनेचा वापर करून यामध्ये खोडा घालणे चुकीचे ठरणार आहे.

योजनेतील त्रुटी, यातील आक्षेपार्ह बाबींबाबत चौकशी करणे किंवा त्या त्रुटी दुरुस्त करणे यावर चर्चा झाली पाहिजे. परंतु योजनेला खो घालण्याचा प्रकार कोल्हापूरकरांवर अन्याय केल्यासारखे ठरणारे आहे.

दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले. अनेकांना जीव गमवावा लागल्यानंतरच थेट पाईपलाईनने पाणीपुरवठा हा मुद्दा पुढे आला. काळम्मावाडी धरणातून थेट शहराला देणे असा हेतू ठेवून या योजनेची मागणी करण्यात आली. या मागणीसाठी कोल्हापुरात आंदोलने झाली. अगदी न्यायालयातही धाव घेण्यात आली. अनेक मुख्यमंत्र्यांनी आश्‍वासनांचे गाजर दाखवले. तत्त्वतः मान्यता, योजनेला मान्यता, अशा घोषणा केल्या गेल्या. सरकार कॉंग्रेस आघाडीचे असो अथवा युतीचे, प्रत्येक मुख्यमंत्र्यांनी आश्‍वासन दिले; परंतु देशात आणि राज्यात कॉंग्रेसचे सरकार असताना थेट पाईपलाईन योजनेला अखेर मंजुरी मिळून त्यासाठी निधीही वर्ग झाला. निधी वर्ग झाला आणि केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार आले आणि त्यांनी मागच्या सरकारच्या योजना गुंडाळून ठेवल्या. फक्त निधी वर्ग झाल्यामुळे ही योजना थांबवू शकले नाही.

अनेक वर्षांपासूनचे स्वप्न असलेली कोल्हापूरवासीयांची योजना प्रत्यक्षात सुरवात झाली. त्यामुळे निदान दोन किंवा चार वर्षांत शुद्ध पाणी पुरवठा होईल, या आशेवर कोल्हापूरवासीय बसले आहेत. या योजनेला सुरुवातीपासूनच अडथळे सुरू झाले आणि योजना वादात सापडली. कधी कुठली पाईप वापरायची, कधी स्थानिक पातळीवर कामे थांबली, कधी परवानगीच्या फेऱ्यात सापडली, कधी झाडे तोडणे, विद्युत खांब हलवणे अशा अनेक तांत्रिक बाबींमुळे योजना रखडली. त्यातच आता नेते मंडळींनी आपला राजकीय गेम खेळण्यास सुरुवात केली आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी उडत असून प्रत्येक नेता आपल्या परीने सोयीचा अर्थ लावून योजनेच्या मुळावर घाला घालण्याचे काम करत आहे.

राजकीय नेत्यांनी राजकारण करावे, परंतु या राजकारणात सर्वसामान्य नागरिक भरडणार असेल, तर त्याचा उपयोग नाही. राजकारण करत असताना योजना बंद पाडणे हा विचार मुळात चुकीचा आहे. योजनेतील त्रुटींची चौकशी करा, दोषींवर कारवाई करा, त्रुटी सुधारा; पण योजना बंद पडू देऊ नका, नाहीतर कोल्हापूरची जनता तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही.

कोल्हापूरकरांचा संघर्ष
- दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य आले धोक्‍यात
- मैलायुक्त पाण्यामुळे जंतुसंसर्गजन्य आजाराचा फैलाव
- काळम्मावाडी धरणातून थेट पाणी देण्यासाठी आंदोलने
- अनेक अडथळे पार करून मिळाली योजनेला मंजुरी
- योजनेच्या अंमलबजावणीतील त्रुटीवर बोट ठेवून होते राजकारण

Web Title: do politics but do not stop the plan