तुम्हाला जयपूर फूट मोफत हवाय का...?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 नोव्हेंबर 2019

- पंढरपुरात एक डिसेंबरला भारत विकास परिषदेचा उपक्रम

- मोफत मिळणार जयपूर फूट

- कृत्रिम हात व पोलिओ कॅलिपरचेही मोफत वाटप करण्यात येणार

- लाभ घेऊ इच्छिणाऱ्यांनी पूर्व नोंदणी करणे आवश्‍यक 

पंढरपूर : भारत विकास परिषद पंढरपूर शाखेच्या वतीने जयपूर (विकास) फूट शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर ता. 1 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते 2 या वेळेत गायत्री हायटेक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे आयोजित केले असून हे शिबिर मोफत आहे, अशी माहिती भारत विकास परिषदेचे अध्यक्ष डॉ. सुरेंद्र काणे यांनी दिली. 

हे ही वाचा... कर्जतमध्ये महाविकास आघाडीचा जल्लोष

भारत विकास परिषदेच्या विविध उपक्रमांतील एक विकलांग सहाय्यता योजनेअंतर्गत कृत्रिम पाय, हात व पोलिओ कॅलिपरचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. गेल्या 25 वर्षांत भारत विकास परिषदेने देशात तीन लाख कृत्रिम पाय बसवून दिले आहेत. या महान, समाजोपयोगी कार्याबद्दल माननीय राष्ट्रपतींकडून परिषदेला दोन वेळा गौरविण्यात आले आहे. 

हे ही वाचा... संविधान दिन आणि शहिद दिनानिमित्त सोलापुरात विविध कार्यक्रम

शिबिराच्या दिवशी दिव्यांगांच्या पायाचे/हाताचे माप घेतले जाते. त्याप्रमाणे पुणे येथील तज्ज्ञ आणि तंत्रज्ञ पुणे येथील केंद्रात कृत्रिम पाय/हात तयार करतात. साधारणपणे एक महिन्यानंतर पाय/हात तयार होतात. शिबिराच्या ठिकाणीच ते लाभार्थींना बसवले जातात. भारत विकास परिषदेच्या पुणे येथील विकलांग पुनर्वसन केंद्रास कोणतेही शासकीय अनुदान नाही. समाजातील दानशूर व्यक्तींच्या सहकार्यानेच हे काम केले जाते. पुणे येथील कायमस्वरूपी केंद्रातही पाय/हात बसवले जातात. या उपक्रमास आमदार भारत भालके यांचे सहकार्य लाभले आहे. 
अशी माहिती भारत विकास परिषदेचे अध्यक्ष डॉ. सुरेंद्र काणे, सेक्रेटरी महावीर गांधी, खजिनदार अजित कुलकर्णी यांनी दिली. 

हे ही वाचा... तुमच्या बाळाची काळजी घेताना `या` गोष्टी लक्षात ठेवा..!

शिबिराचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्यांनी पूर्व नोंदणी करणे आवश्‍यक आहे. या शिबिरासाठी डॉ. श्री. अनिल पवार, डॉ. पंकज गायकवाड, सुनील उंबरे सेवाप्रमुख आहेत. गरजूंनी 02186223234, 8421005596, 9822071469 या क्रमांकांवर संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Do you want Jaipur feet free ...?