जादा पैसे आकारणाऱ्या डॉक्‍टरला शेतकऱ्याच्या तक्रारीवरून अटक 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 जुलै 2019

सांगली - दोन रुपयांच्या केसपेपरमध्ये संपूर्ण तपासणी आणि औषध पुरवठा बंधनकारक असताना रुग्णांकडून सक्तीने तीस रुपये आकारणी करणाऱ्या कुरळप प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्‍टर नितीन बापू चिवटे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.

सांगली - दोन रुपयांच्या केसपेपरमध्ये संपूर्ण तपासणी आणि औषध पुरवठा बंधनकारक असताना रुग्णांकडून सक्तीने तीस रुपये आकारणी करणाऱ्या कुरळप प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्‍टर नितीन बापू चिवटे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. ऐतवडे खुर्द येथील एका शेतकऱ्याने त्याच्याविरुद्ध तक्रार केली होती. सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. त्यामुळे जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे एका वेगळ्याच प्रकरणात धिंदवडे निघाले आहेत. 

याबाबत अधिक माहिती अशी - संबंधित शेतकरी कुरळप आरोग्य केंद्रात तपासणीसाठी गेले होते. तेथे रुग्णांना दोन रुपयांचा केसपेपर काढला की संपूर्ण तपासणी आणि औषधोपचार मोफत करणे अपेक्षित आहे. डॉ. चिवटे तेथील प्रत्येक रुग्णालयातील औषधोपचारासाठी 30 रुपये आणि सलाईनसाठी 100 रुपये आकारत असल्याच्या तक्रारी आधीपासूनच होत्या. त्याबाबत एका शेतकऱ्यांने थेट तक्रार केली. दोन दिवसांपूर्वी संबंधित शेतकरी तेथे गेले होते. त्यांनी तपासून घेतले. डॉक्‍टरांनी तीस रुपये मागितल्यावर "माझ्याकडे नाहीत, नंतर देतो' असे सांगून ते बाहेर पडले.

दरम्यान, त्यांनी या प्रकरणाची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. त्यांच्या सूचनेनुसार आज सकाळी 30 रुपये देण्यासाठी आरोग्य केंद्रात गेले. तेथे पोलिसांनी आधीच सापळा लावला. त्यावेळी तीस रुपये स्विकारताना रंगेहाथ अटक करण्यात आली. या प्रकरणी कुरळप पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. 

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपायुक्त राजेश बनसोडे, अपर पोलिस उपायुक्त सुषमा चव्हाण यांच्या मार्गदशनाखाली पोलिस उपाधीक्षक राजेंद्र साळुंखे, पोलिस निरीक्षक गुरुदत्त मोरे, जितेंद्र काळे, संजय कलगुटगी, संजय संकपाळ, अविनाश सागर, सारिका साळुंखे, बाळासाहेब पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Doctor arrested for overcharging on farmer complaint