भ्रूण हत्याप्रकरणी डॉ. खिद्रापुरेला बेळगावमधून अटक

प्रमोद जेरे
मंगळवार, 7 मार्च 2017

मणेराजुरी (ता. तासगाव) येथील सौ. स्मिता प्रवीण जमदाडे यांचा बेकायदेशीर गर्भपात करतानाच मृत्यू झाल्याचा आरोप करून नातेवाइकांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यामुळे गुन्हा दाखल होऊन तपास करताना क्रूरकर्मा डॉ. खिद्रापुरे याच्या कत्तलखान्याचा उलगडा झाला.

सांगली - म्हैसाळ (ता. मिरज) येथील क्रूरकर्मा डॉ. बाबासाहेब खिद्रापुरे याला मिरज पोलिसांनी सोमवारी मध्यरात्री बेळगावमधून अटक केली आहे. त्याच्या पत्नीलाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

डॉ. खिद्रापुरे हे तब्बल नऊ वर्षांपासून भ्रूणहत्या करत असल्याचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्यामुळे शेकडो भ्रूणहत्या त्याने केल्याची शक्‍यता आहे. त्याच्याकडे महाराष्ट्र, कर्नाटकसह आंध्र प्रदेशातूनही रुग्ण येत असल्यामुळे आंतरराज्य "रॅकेट' कार्यरत असण्याची शक्‍यता आहे. डॉ. खिद्रापुरेविरुद्ध एमटीपी अर्थात वैद्यकीय गर्भपात कायदा आणि बॉंबे नर्सिंग होम कायद्यानुसार अतिरिक्त कलमे लावली आहेत. डॉ. खिद्रापुरे पत्नीसह फरारी झाला होता. त्याच्या शोधासाठी पाच पथके ठिकठिकाणी रवाना झाली होती. मिरज ग्रामीण पोलिस ठाण्याच्या पथकाला तो बेळगावमधील त्याच्या नातेवाईकांच्या घरी असल्याची माहिती मिळाल्यानंतर अटक करण्यात आली. त्याला आज न्यायालयात हजर करण्यात येणार असून, त्याला पोलिस कोठडीची मागणी करण्यात येणार आहे. या प्रकरणातील प्रवीण जमदाडे (वय 26, रा. मणेराजुरी) हा आरोपी सध्या पोलिस कोठडीत आहे.

मणेराजुरी (ता. तासगाव) येथील सौ. स्मिता प्रवीण जमदाडे यांचा बेकायदेशीर गर्भपात करतानाच मृत्यू झाल्याचा आरोप करून नातेवाइकांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यामुळे गुन्हा दाखल होऊन तपास करताना क्रूरकर्मा डॉ. खिद्रापुरे याच्या कत्तलखान्याचा उलगडा झाला. पोलिसांनी म्हैसाळ येथे ओढ्याजवळ खोदाई करून 19 भ्रुणांचे अवशेष ताब्यात घेतले. वाढ झालेले भ्रूण पुरून टाकले जात होते. दोन महिन्यांपेक्षा कमी कालावधीचे भ्रूण टॉयलेटमध्येच ऍसिड ओतून नष्ट केले जात होते. खिद्रापुरेकडे होमिओपॅथीची पदवी असताना ऍलोपॅथीची औषधे, इंजेक्‍शन, सर्जरीची हत्यारे मिळून आली. हॉस्पिटलमध्ये कोण कोण डॉक्‍टर गर्भपात आणि भ्रूणहत्येसाठी येत होते, याचे तारखेप्रमाणे पुरावे हाती लागले. ते पोलिसांनी पंचांसमक्ष जप्त केले. खिद्रापुरे 2008 पासून भ्रूणहत्या करत असल्याची धक्कादायक माहिती तपासात पुढे येत आहे. त्याच्याकडे काही डॉक्‍टर बाहेरून येत होते. हॉस्पिटलच्या तळघरात दोन रूम आणि बाथरूम असल्याचे दिसून आले.

Web Title: Doctor Babasahed Khidrapure Arrested From Belgaum in Sangli Abortion Racket Case