
Sangli : देव्हाऱ्यासमोर पोथी वाचत होते डॉक्टर, इतक्यात भावाने घरात घुसून केली हत्या; कारण..
कुपवाड (सांगली) : शहरातील मिरज रोडवरील संत रोहिदासनगर इथं वास्तव्यास असणाऱ्या डॉक्टरांचा (Doctor) सख्ख्या भावानंच धारधार विळ्याचे घाव घालून खून केल्याची घटना बुधवारी सकाळच्या सुमारास घडली. अनिल बाबाजी शिंदे (वय 43 रा. संत रोहिदासनगर मिरज रोड कुपवाड मूळगाव वडगाव ता. तासगाव जि. सांगली) असं खुनातील मयत डॉक्टरांचं नाव आहे.
याप्रकरणी पोलिसांनी त्यांचा सख्खा भाऊ संशयित संपत बाबाजी शिंदे (वय 37 सध्या रा. शिवशक्तीनगर कुपवाड, मूळगाव-वडगाव ता. तासगाव जि. सांगली) यास पोलिसांनी तातडीनं ताब्यात घेतलं. खुनाप्रकरणी त्याच्याविरोधात कुपवाड औद्योगिक पोलिस (Kupwad Police) ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. कौटुंबिक वादातून हा खून झाल्याची माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासामध्ये समोर आली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मयत डॉक्टर अनिल शिंदे यांचा कुपवाड शहरात दवाखाना आहे. पाच ते सहा वर्षांपासून स्थानिक रुग्णांना सेवा देण्याचं कार्य ते करत. शिंदे हे पत्नी व दोन मुलांच्या समवेत मिरज रस्त्यावरील संत रोहिदासनगर येथील सूर्यकांत प्रकाश हनकडे यांच्या इमारतीत तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये भाडेतत्त्वावर वास्तव्यास होते. बुधवारी सकाळी साडेआठ ते पावणे नऊच्या दरम्यान डॉ. शिंदे यांनी घरातील देवपूजा आटोपली.
धारधार विळ्याने हत्या
देव्हाऱ्यासमोरच ते एका धार्मिक ग्रंथाचे वाचन करत बसले होते. त्यांची पत्नी सरस्वती ही त्यांच्यासह दोन्ही मुलांसाठी नाष्टा बनवत होती. याच दरम्यान संशयित हल्लेखोर डॉक्टर शिंदे यांचा सख्ख्या भाऊ संपत यानं घराच्या दरवाज्याला जोराची लाथ मारून दरवाजा उघडला. सोबत आणलेल्या आपल्या ताब्यातील एका धारधार विळ्यानं धार्मिक ग्रंथाचं वाचन करत देव्हाऱ्यासमोर बसलेल्या डॉ. शिंदेवर हल्ला चढविला.
शिंदे पडले रक्ताच्या थारोळ्यात
हल्ल्यामध्ये डोक्यासह चेहऱ्यावर वर्मी घाव लागल्याने डॉ. शिंदे रक्ताच्या थारोळ्यात पडले. प्रकार पाहून भयभीत झालेल्या शिंदेयांच्या पत्नीने घटनास्थळावरून दोन मुलांसह जीव वाचविण्यासाठी पळ काढला. खाली येऊन आपल्या पतीचा जीव वाचविण्यासाठी पत्नीनं लोकांकडं धाव घेतली. लोक गोळा होण्याच्या आतच संशयित संपत यानं घटनास्थळावरून पोबारा केला. तेथून जवळ असणाऱ्या शिवशक्तीनगर परिसरातील नातेवाईकांकडे त्यानं आसरा घेतला.

Sangli Crime News
पतीला वाचवण्यासाठी पत्नीनं केला आरडाओरडा
पतीला वाचविण्यासाठी पत्नीनं केलेला आरडाओरडा व त्यानंतर घडलेली खुनाची घटना उघडकीस येताच लोकांनी धावाधाव केली. माजी नगरसेवक प्रकाश व्हनकडे घटनास्थळी तातडीने हजर झाले. घडलेल्या प्रकाराची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. कुपवाड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अविनाश पाटील यांच्यासह पोलिस पथक तात्काळ घटनास्थळी हजर झाले. व्हनकडे यांनी रक्ताच्या थारोळ्यात गंभीर जखमी अवस्थेतील पडलेल्या डॉ. शिंदे यांना कुपवाड संघर्ष समितीच्या रुग्णवाहिकेमार्फत मिरज शासकीय रुग्णालयात दाखल केले.
कुपवाड पोलिसांत गुन्हा दाखल
डोक्यात व चेहऱ्यावर वर्मी घाव बसल्याने उपचारापूर्वच शिंदे हे मयत झाल्याचे रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. हल्ल्यात वापरलेला विळा पोलिसांनी जप्त केला. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित संपत यास कुपवाडच्या शिवशक्तीनगरातून ताब्यात घेतले. सख्ख्या भावाचा खून केल्याप्रकरणी कुपवाड पोलिसांत त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
हल्लेखोर संपत आहे फार्मासिस्ट
प्रकरणातील संशयित हल्लेखोर संपत हा फार्मासिस्ट आहे. मयत डॉ.अनिल शिंदे यांच्यामध्ये कौटुंबिक वाद सुरू होता. त्यावादातून डॉ.शिंदे यांचा खून झाल्याची माहिती पोलिसांनी प्राथमिक तपासात दिली. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक अविनाश पाटील हे करित आहेत. गेल्या दहा दिवसात कुपवाड हद्दीतील ही खुनाची दुसरी घटना आहे.