शाहूनगरला कोणी वाली आहे का ?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

दत्त मंदिराजवळ रस्त्यातील दगडही उकलले आहेत. शिवाय, गळतीचे पाणी त्यातूनच वाहत असते. येथून जाताना अनेक अपघात झाले आहेत. येथील अपघात अनेकांच्या जिवावर बेतले आहेत. तरीही लोकप्रतिनिधी, अधिकारी त्याकडे लक्ष देत नाहीत.
- प्रसाद पाटील.  

सातारा : सातारा शहरालगतचा त्रिशंकू भाग असलेल्या शाहूनगराला कोणी वाली आहे का? असा सवाल रहिवाशी करू लागले आहेत. वर्षांनुवर्षे मुख्य रस्ते खराब असून, त्यांची सध्याची अवस्था दयनीय बनली आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या "गळक्‍या' कारभाराचे तर ग्रहण लागले असून, रस्त्यावरूनच शेकडो लिटर पाणी वाहत असते. वर्षांनुवर्षे मुख्य रस्त्यांची दुरवस्था आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या "गळक्‍या' कारभाराचे तर ग्रहणच लागले आहे.

शाहूनगर हा सध्या त्रिशंकू भाग असून, तो सातारा शहराच्या हद्दवाढीत समाविष्ट आहे. त्यामुळे हा भाग साताऱ्यात केव्हा समाविष्ट होणार, याकडे येथील लोकांचे लक्ष लागले आहेत. त्रिशंकू भाग असल्याने येथील समस्या सुटण्याऐवजी वर्षांनुवर्षे वाढतच चालल्या आहेत. पायाभूत सुविधांचे त्रांगडेच होऊन बसले आहे. एखादा रस्ता एकदा तयार झाल्यानंतर त्याची पुन्हा डागडुजी करण्यास कित्येक वर्षे उलटत असतात, असा येथील लोकांचा अनुभव आहे.
 
शाहूनगरात जाण्यासाठी असलेले गोडोली स्वागत कमान ते अजिंक्‍यबझार चौक, एसटी कॉलनी ते जगतापवाडीपर्यंतच्या मुख्य रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहेत. टेलिफोन एक्‍स्चेंज, इंद्रायणी मेडिकल येथे रस्ता आहे का? असा प्रश्‍न पडत आहेत. गुरुकृपा सोसायटीमध्ये अनेक ठिकाणी चरी असून, गटारातील पाणी रस्त्यावरून वाहून खाचखळग्यांचा रस्ता झाला आहे. जगतापवाडीमधील रस्ता तर कोणत्या अप्रगत देशातील आहे, असा नागरिकांना प्रश्‍न पडतो. अनेक ठिकाणी गटारांचे पाणी रस्त्यांवरून वाहत असते. अजिंक्‍य बझार चौक ते अजिंक्‍यतारा किल्ल्यापर्यंत बनविलेल्या डांबरी रस्त्याला वर्षापूर्वीच खड्ड्यांचे ग्रहण लागले आहे. विशाल सह्याद्री कॉलनी येथे रस्ता उखडू लागला आहे. त्यामुळे या कामाच्या दर्जावर साशंकता निर्माण झाली आहे.

जीवन प्राधिकरणाच्या पाइपलाइनला सातत्याने गळती लागलेली असते. अजिंक्‍य बझार चौक येथे अनेकदा गळती काढूनही पुन्हा मागील पाढे पंचावन्न याप्रमाणे गळती सुरूच आहे. तीच परिस्थिती टेलिफोन एक्‍स्चेंज कार्यालयासमोर झाली आहे. तरीही त्याकडे जीवन प्राधिकरण लक्ष देत नाही. मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांचेही अत्यंत खराब झाले आहेत. त्यामुळे वाहनधारकांचे प्रचंड नुकसान होत आहे. वाहनांचे स्पेअर पार्टस खिळखिळे होत आहेत. टायरची झिज होणे, इंधन जास्त लागणे यामुळे देखभाल दुरुस्तीच्या खर्चात वाढ होत आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Does anyone will look after Shahunagar ?