नऊ हजार जणांना वर्षभरात श्‍वानदंश 

हेमंत पवार
बुधवार, 6 जून 2018

कऱ्हाड - श्‍वानांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे श्‍वानदंशाचे प्रमाण वाढले आहे. जिल्ह्यात वर्षात तब्बल आठ हजार 962 जणांना श्‍वानदंश झाल्याची नोंद आरोग्य विभागाकडे आहे. त्याचबरोबर खासगी रुग्णालयांतही अनेक रुग्णांनी उपचार घेतले आहेत. मोकाट श्‍वानांचा बंदोबस्त करण्यासाठी ठोस पावले उचलली जात नसल्याने दिवसेंदिवस श्‍वानदंशाचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यामुळे आबालवृद्धांत भीतीचे वातावरण आहे. 

शासनाच्या नियमाप्रमाणे श्‍वानांना मारता येत नाही. त्यामुळे त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मटण-चिकन विक्रीच्या ठिकाणी, कचरा  डेपो परिसरासह गावोगावी श्‍वानांची टोळकीच्या टोळकी दिसतात. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी सध्या कोणत्याच पातळीवर पावले उचलली जात नाहीत. त्यामुळे श्‍वानदंशाचे प्रमाण वाढले आहे. त्याच्यांकडून लहान मुले, महिला व नागरिकांवर हल्लेही होत आहेत. अलीकडे श्‍वान पिसाळण्याचेही प्रमाण वाढल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. त्यामुळे त्यांचा बंदोबस्त करण्याची गरज निर्माण झाली आहे. जिल्ह्यात मागील एका महिन्यात तब्बल एक हजार चार जणांना श्‍वानदंश झाला आहे. त्यात सातारा तालुक्‍यात 165, फलटण 179, माण 157, खटाव 127, कऱ्हाड 127 येथील श्‍वानदंशांची संख्या मोठी आहे. 

गेल्या वर्षात तब्बल आठ हजार 962 जणांना जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये श्‍वानदंशाचे उपचार करण्यात आले आहेत. त्याचबरोबर शासकीय रुग्णालये आणि खासगी रुग्णालयांतही रुग्णांनी उपचार घेतले असून तीही संख्या मोठी आहे. त्यातून श्‍वानदंशाचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते. 

श्‍वानांचे खच्चीकरण कऱण्याची मोहीम जिल्हा परिषदेच्या सहकार्याने ग्रामपंचायतींमार्फत राबवण्यात येत होती. त्यासाठी श्‍वानांना पकडून इंजेक्‍शन देण्यात येत होते. मात्र, गेल्या काही वर्षांत ही मोहिमच राबवण्यात आलेली नाही. त्यामुळे श्‍वानांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. 

श्‍वानदंशाची तालुकानिहाय स्थिती  
सातारा - 1 हजार 692, मेढा 144, महाबळेश्वर 62, वाई 136, खंडाळा 307, फलटण 1 हजार 572, माण 889, खटाव 1 हजार 67, कोरेगाव 538, कऱ्हाड 1 हजार 532, पाटण 1 हजार 23. 

Web Title: Dog bite nine thousand people in karad district