कुत्र्याला मारणाऱ्यांची जामिनासाठी धाव

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 डिसेंबर 2016

सोलापूर - एक वर्षाच्या आतील एका कुत्र्याला मारून जीव घेणाऱ्या आणि दुसऱ्या कुत्र्याला मारहाण करून गंभीर जखमी करणाऱ्या दोघांनी अटकेच्या भीतीने न्यायालयात धाव घेतली आहे. कुत्र्याला मारहाण केल्याच्या गुन्ह्यात दोन वर्षे आणि पाच वर्षे कारावास व दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे.

सोलापूर - एक वर्षाच्या आतील एका कुत्र्याला मारून जीव घेणाऱ्या आणि दुसऱ्या कुत्र्याला मारहाण करून गंभीर जखमी करणाऱ्या दोघांनी अटकेच्या भीतीने न्यायालयात धाव घेतली आहे. कुत्र्याला मारहाण केल्याच्या गुन्ह्यात दोन वर्षे आणि पाच वर्षे कारावास व दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे.

कुत्र्याला मारल्याने रजाक बेंगलोरवाले, खलील बेंगलोरवाले या फळविक्रेत्या पिता-पुत्रावर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार जमखंडी पूल परिसरात 7 डिसेंबर रोजी घडला आहे. प्रत्यक्षदर्शी व्यक्तीने घाबरून फिर्याद दिली नव्हती; मात्र पुण्यातील प्राणी कल्याण अधिकाऱ्यांनी 11 डिसेंबर रोजी सोलापुरात येऊन फिर्याद दिली. दोघांनी लोखंडी सळीने मारहाण करून एका कुत्र्याचा जीव घेतला, तर दुसऱ्याला गंभीर जखमी केले आहे. या प्रकरणात अटक होऊ नये म्हणून दोघा आरोपींनी न्यायालयात धाव घेतल्याचे कळते.

काय होऊ शकते शिक्षा?
बेंगलोरवाले यांच्यावर कलम 428 आणि कलम 429 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. कलम 428 मध्ये दहा रुपये किमतीच्या किंवा त्यातून अधिक किमतीच्या प्राण्याला ठार मारणे, विष प्रयोग करून विकलांग केल्यास दोन वर्षांपर्यंत शिक्षा किंवा दंड होऊ शकते. कलम 429 मध्ये कितीही किमतीची गुरेढोरे किंवा पन्नास रुपये किमतीच्या जनावरास ठार मारून किंवा विकलांग करणाऱ्यास पाच वर्षे कारावासाची शिक्षा होऊ शकते. दंड किंवा कारावास दोन्हीही होऊ शकतात.

कुत्र्याला मारहाण करून त्याचा जीव घेणाऱ्या दोन आरोपींना अटक करण्यासाठी आम्ही पोलिसांकडे पाठपुरावा करीत आहोत. जोपर्यंत अशा लोकांवर अटकेची कारवाई होऊन गुन्ह्यात शिक्षा होत नाही तोपर्यंत अशा प्रकाराबाबत समाजात गांभीर्यता येणार नाही.
- डॉ. मनोज ओसवाल, पशुकल्याण अधिकारी

Web Title: dog murderer to run on bail