अफगाण हाउंड ठरला ‘बेस्ट इन शो’

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 फेब्रुवारी 2019

डॉबरमॅन, लॅब्रॉडोर, बॉक्‍सर या प्रचलित जातींसह फॉक्‍स टेरियर, बुलडॉग, बेल्जियम शेपहर्ड, फ्रेन्च बुलडॉग या दुर्मिळ जातींच्या श्‍वानांचा मेळा श्‍वानप्रेमींना अनुभवयाला मिळाला. कॅनाईन क्‍लब ऑफ कोल्हापूरतर्फे आयोजित डॉग शोमध्ये ऑल ब्रीड चॅम्पियनशिप स्पर्धा पार पडली.

कोल्हापूर - डॉबरमॅन, लॅब्रॉडोर, बॉक्‍सर या प्रचलित जातींसह फॉक्‍स टेरियर, बुलडॉग, बेल्जियम शेपहर्ड, फ्रेन्च बुलडॉग या दुर्मिळ जातींच्या श्‍वानांचा मेळा श्‍वानप्रेमींना अनुभवयाला मिळाला. कॅनाईन क्‍लब ऑफ कोल्हापूरतर्फे आयोजित डॉग शोमध्ये ऑल ब्रीड चॅम्पियनशिप स्पर्धा पार पडली.

देशभरातून ३५ हून अधिक जातींचे ३०० पेक्षा श्‍वान या स्पर्धेत सहभागी झाले होते. या स्पर्धेत के. एस. नागराज शेट्टी यांच्या अफगाण हाउंड जातीच्या श्‍वानाने ‘बेस्ट इन शो’चा किताब पटकावला. लोणार वसाहत येथील श्री गणेश लॉन येथे स्पर्धा झाली.

कॅनाईन क्‍लब ऑफ कोल्हापूरतर्फे दोनदिवसीय डॉग शोचे आयोजन केले होते. काल या डॉग शोला सुरवात झाली. शोच्या पहिल्या दिवशी आज्ञाधारक श्‍वानांचे दर्शन श्‍वानप्रेमींना झाले. आज या शोअंतर्गत ऑल ब्रीड चॅम्पियन स्पर्धा पार पडली. यात देशभरातील ३५ हून अधिक जातींचे ३०० पेक्षा जास्त श्‍वान या स्पर्धेत सहभागी झाले. दिवसभर सुरू असलेली ही स्पर्धा पाहण्यासाठी श्‍वानप्रेमींनी मोठी गर्दी केली होती. देशीविदेशी, तसेच दुर्मिळ जातींचे श्‍वान पाहण्याची संधी या निमित्ताने मिळाली.

श्‍वानाची जातीनुसार व वयोमानानुसार शरीराची ठेवण आणि शो ग्राउंडवरील श्वानाची चाल यानुसार प्रत्येक श्‍वानाचे परीक्षण करण्यात आले. झान्सीस स्मिथ (अर्जेंटिना), ॲबिअन डाझा (कोलंबिया) व दुसान बॅंवनीकर (स्लाव्हिनिया) हे आंतरराष्ट्रीय परीक्षक या वेळी उपस्थित होते. वेगवेगळ्या ग्रुपमध्ये सायंकाळी उशिरापर्यंत स्पर्धा सुरू होती. या स्पर्धेमध्ये शेट्टी यांच्या अफगाण हाउंड जातीच्या श्‍वानाने ‘बेस्ट इन शो’चा किताब पटकावला. याबरोबरच ‘बेस्ट ऑफ ब्रीड’, ‘रिझर्व्ह बेस्ट ऑफ ब्रीड’, ‘ग्रुप विनर’ अशा वेगवेगळ्या आठ प्रकारांत बक्षिसे देण्यात आली.

कॅनाईन क्‍लब ऑफ कोल्हापूरतर्फे रस्त्यावरील भटक्‍या कुत्र्यांची नसबंदी करण्याचा उपक्रम कोल्हापूर महानगरपालिकेच्या मदतीने राबवला जाणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dog show all bride champion competition