महापालिका क्षेत्रात श्‍वान नसबंदी मोहिम खंडीत...भटक्‍या श्‍वानांचा धुमाकूळ

dog.jpg
dog.jpg

सांगली-  महापालिका क्षेत्रात मोकाट श्‍वानांनी सध्या धुमाकूळ घातला आहे. रात्रीच्या वेळेच्या सायकलस्वार तसेच दुचाकीस्वारांचा पाठलाग केला जात आहे. त्यामुळे काही ठिकाणी अपघात घडलेत. तशातच श्‍वानांची नसबंदी आणि लसीकरण मोहिम खंडीत झाली आहे. त्याचा परिणाम म्हणून श्‍वानांच्या संख्येत वाढ झाली आहे. 

लॉकडाउनपूर्वीचा काळ पाहिला तर महापालिका क्षेत्रात चिकन आणि मटण विक्री सेंटर परिसरात तसेच हॉटेल असलेल्या परिसरात भटक्‍या श्‍वानांची संख्या भरपूर होती. चिकन व मटण विक्री सेंटरमधील टाकाऊ मांसावर भटक्‍या श्‍वानांची गुजराण होत होती. तसेच हॉटेलमधील खरकट्या अन्नावर देखील ती ताव मारत होती. त्यामुळे एकप्रकारे भटक्‍या श्‍वानांना मांसाची चटक लागली होती. लॉकडाउनमध्ये सुरवातीच्या काळात मटण-चिकन विक्रीवर बंधन घालण्यात आले. तसेच हॉटेल्स देखील बंद झाली. त्यामुळे मांसाची चटक लागलेल्या श्‍वानांकडून नागरिकांवर हल्ले होण्याचे प्रकार काही ठिकाणी घडले. त्यांना सहजपणे अन्न मिळत नसल्यामुळे नागरिकांनी पाळलेल्या कोंबड्या, शेळ्या तसेच डुकरांवरही हल्ले केले. 

महापालिका क्षेत्रातील भटक्‍या श्‍वानांची नसबंदी आणि लसीकरणाची मोहिम देखील मार्च 2020 मध्ये खंडीत करण्यात आली. लॉकडाउनमध्ये मोकाट श्‍वानांबाबत नागरिकांच्या तक्रारी आल्यानंतर श्‍वान पथकाने एकाठिकाणी पकडलेले श्‍वान दुसऱ्या ठिकाणी सोडण्या व्यतिरिक्त काही केले नाही. काही दिवस मोकाट श्‍वानासाठी प्राणीमित्रांच्या मदतीने खाद्य ठेवले. लॉकडाउनमध्ये शिथीलता आल्यानंतर चिकन व मटण विक्री सेंटर सुरू झाले आहेत. तसेच हॉटेल्स व खानावळीतून पार्सलची सेवा सुरू झाली आहे. त्यामुळे श्‍वानांना पुन्हा एकदा मांस आणि खरकटे अन्न मिळू लागले आहे. पुन्हा एकदा रस्त्यांवर श्‍वानांच्या टोळ्या दिसू लागल्या आहेत. रात्रीच्या वेळेस त्यांच्याकडून दुचाकीस्वार तसेच सायकलस्वारांचा पाठलाग केला जातो. तसेच दुचाकीच्या आडवे येण्यामुळे अपघात देखील होऊ लागलेत. 

सध्या श्‍वानांचा प्रजननाचा काळ सुरू आहे. त्यामुळे श्‍वान अधिक हिंस्त्र बनले आहेत. त्यातून नागरिकांना धोका निर्माण झाला आहे. यापुढील काळात श्‍वानांची संख्या मर्यादीत ठेवण्यासाठी खंडीत झालेली नसबंदी आणि लसीकरणाची मोहिम सुरू ठेवणे आवश्‍यक आहे. 
 

""महापालिका क्षेत्रात संपलेल्या आर्थिक वर्षात 1841 श्‍वानांची नसबंदी व लसीकरण मोहिम झाली आहे. शासन अध्यादेशानुसार ही मोहिम विनाखंडीत सुरू ठेवणे आवश्‍यक आहे. मोहिम बंद राहिली तर भटक्‍या श्‍वानांची आणखी पैदास होऊन संख्या वाढण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे भटके श्‍वान पकडून तात्पुरती मलमपट्टी उपयोगाची नाही. श्‍वानांची संख्या वाढत राहिली तर मोठी दुर्घटना घडण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे नसबंदी व लसीकरण मोहिम सुरू ठेवण्याबाबत महापालिकेला विनंती केली आहे. तरी देखील निर्णय घेतला जात नाही हे दुर्दैव म्हणावे लागेल.'' 
-अजित काशिद (श्‍वान कमिटी सदस्य) 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com