चार वर्षांच्या बालकावर कुत्र्यांचा हल्ला; बालक गंभीर

चार वर्षांच्या बालकावर कुत्र्यांचा हल्ला; बालक गंभीर

सोलापूर : जुळे सोलापुरातील गणेश नाईक प्राथमिक शाळेत बालवाडीत शिकणाऱ्या ओमप्रकाश चुंगी या चार वर्षांच्या मुलावर कुत्र्यांनी हल्ला केला. ही घटना गुरुवारी रेणुकानगर परिसरात घडली असून, ओमप्रकाश गंभीर जखमी झाला. 

बालवाडीत शिकणारा ओमप्रकाश रेणूकानगर परिसरातील शेतात काम करणाऱ्या आजी-आजोबांकडे गेला होता. दुपारी तीन-साडेतीनच्या दरम्यान आजोबा पाणी आणण्यास हौदाकडे गेले. पाठोपाठ ओमप्रकाशही गेला. हौदात पाणी व्यवस्थित नसल्याने आजोबा विहिरीकडे गेले. पाण्यासाठी ते विहिरीत उतरले. ओमप्रकाश हौदाजवळच उभा होता. अचानक तेथे आलेल्या चार ते पाच भटक्‍या कुत्र्यांनी ओमप्रकाशवर हल्ला केला. डोक्‍यावर, मानेवर, पाठीवर कुत्र्यांनी चावा घेण्यास सुरवात केली. मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकून लोकं तिकडे धावले. खवळलेल्या कुत्र्यांजवळ जाऊन मुलाला सोडवणे शक्‍य नव्हते. धाडस करून काठीने मारल्यानंतर कुत्र्यांनी ओमप्रकाशला फरफटत न्यायला सुरवात केली. काटे घुसल्याने तो अधिकच गंभीर जखमी झाला. जीवाच्या आकांताने तो रडत होता. अंगावरचे कपडे फाटले होते. शरीर रक्ताने भिजले होते. लोकांचा गोंधळ पाहून कुत्र्यांनी ओमप्रकाशला सोडले. 

आपल्या पोटच्या लेकरांची ही अवस्था पाहून आईने टाहो फोडला. आजूबाजूचे लोकही सुन्न झाले. कोणालाच काही कळत नव्हते. जखमी ओमप्रकाश याला डॉ. ओक यांच्याकडे नेले. तेथून सीटी हॉस्पिटल येथे घेऊन जाण्याचा सल्ला दिला. मुलाला सिव्हिल हॉस्पिटलला घेऊन जायला सांगितले. ओमप्रकाशचे आई-वडील घाबरून गेले. त्यांना काहीही सुचत नव्हते. शासकीय रुग्णालयात पोचल्यानंतर कोणीच लक्ष द्यायला तयार नव्हते.

दरम्यान, माजी आमदार शिवशरण बिराजदार-पाटील यांनी रुग्णालयाच्या वरिष्ठांशी फोनवरून संपर्क साधून घटनेचे गांभीर्य सांगितले. महापालिका परिवहन समितीचे सदस्य नितीन भोपळे हेही तिथे पोचले. अडीच तासांनंतर उपचार चालू झाले. 

सोलापुरात सर्वत्र मोकाट कुत्र्यांनी हैदोस घातला आहे. कुत्री कधी आपसात भांडतात तर कधीकधी अचानक वाहनाच्या मागे लागतात. त्यामुळे अनेक अपघात झाले आहेत. अपघातांमुळे कितीतरी लोकांचा जीव गेला आहे. अनेकांना अपगंत्व आले आहे. स्मार्ट सिटीमध्ये अशाप्रकारे मोकाट कुत्र्यांकडे महापालिका प्रशासनाने लक्ष द्यायला हवे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने यावर निर्णय घ्यावा. अपेक्षित कार्यवाही झाली नाही तर शाळेतील सर्व विद्यार्थी व पालक यांना घेऊन महापालिकेवर मोर्चा काढावा लागेल.

- मदन पोलके, शिक्षक, गणेश नाईक शाळा, जुळे सोलापूर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com