पंढरपूर : श्री विठ्ठल मंदिराच्या उत्पन्नात वाढ

अभय जोशी
शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2019

कार्तिकी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला यंदा २ कोटी ९६ लाख ३६ हजार ७३८ रुपये इतके उत्पन्न मिळाले.

पंढरपूर : कार्तिकी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला यंदा २ कोटी ९६ लाख ३६ हजार ७३८ रुपये इतके उत्पन्न मिळाले. मागीलवर्षी पेक्षा यंदा यात्रेसाठी गदी कमी असूनही तब्बल ९८ लाख १५ हजार ३०४ रुपये एवढी वाढीव देणगी मंदिर समितीस मिळाली, अशी माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सुनील तथा विठ्ठल जोशी यांनी दिली.

दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील कार्तिकी यात्रेसाठी आलेल्या भाविकांना मंदिर समितीने चांगल्या सुविधा दिल्या होत्या. परंतु अवकाळी पावसामुळे कार्तिकी यात्रेवर परिणाम झाला होता. भाविकांच्या संख्येत यंदा घट जाणवत होती. दरवर्षीच्या तुलनेने गर्दी कमी होती. परंतु तरीही मंदिर समितीच्या उत्पन्नात मात्र घट न होता वाढच झाली आहे. हे विशेष आहे.

मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी जोशी यांनी कार्तिकी यात्रेच्या पंधरा दिवसांच्या कालावधीत मंदिर समितीला मिळालेल्या उत्पन्नाची तपशीलवार माहिती दिली आहे. यंदा श्री विठ्ठलाच्या चरणाजवळ २३ लाख ८२ हजार ४४० रुपये, श्री रुक्मिणीमातेच्या चरणाजवळ ७ लाख ३ हजार ७११
रुपये, अन्नछत्र देणगी ४७ हजार १०० रुपये, पावती स्वरुपातील देणगी ९२ लाख ५२ हजार ७३२ रुपये, बुंदी लाडू प्रसाद विक्री
३८ लाख २५ हजार ८५५ रुपये, राजगिरा लाडू विक्री २ लाख ९६ हजार ५७० रुपये, फोटो विक्री ७३ हजार ५२५ रुपये, सर्व
भक्त निवास २९ लाख ८८ हजार ५७५ रुपये, नित्यपूजा ४ लाख ४४ हजार रुपये,  हुंडी पेटी जमा ७३ लाख ४७ हजार ९६३ रुपये,
परिवार देवता १४ लाख ७२ हजार ८४३ रुपये, ऑनलाईन देणगी ३ लाख ४० हजार ८३८ रुपये, अन्य स्वरुपात ४६ हजार ५८६
रुपये मिळाले.

गेल्या वर्षी कार्तिकी यात्रा कालावधीत १ कोटी ९८ लाख २१ हजार ४३४ रुपये इतके उत्पन्न मंदिर समितीला मिळाले होते.गेल्या
वर्षीच्या तुलनेत यंदा ९८ लाख १५ हजार ३०४ रुपये एवढी वाढीव देणगी समितीस मिळाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Donation Amount have been Increased of Vithoba Temple Pandharpur