नाट्यगृहात मोबाइल नकोच !

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019

प्रेक्षकांनी नाटकाच्या वेळेपूर्वी हजर राहावे, मोबाइल सायलेंट करावेत, कलाकारांची लिंक तुटणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे मत त्यांनी नुकतेच "सकाळ'शी बोलताना व्यक्‍त केले. 

सातारा ः नाटकाच्या प्रयोगादरम्यान मोबाइल वाजण्याने नाटकांत व्यत्यय येतो. त्यावर प्रसिद्ध कलाकार सुबोध भावे यांनी तीव्र संताप व्यक्‍त केला होता. त्याचे पडसाद आता राज्यभर उमटले असून, त्याबाबत साताऱ्यातील नाट्य कलाकारांनीही "सकाळ'शी बोलताना तीव्र नाराजी व्यक्‍त केली. 
सुबोध भावे यांचा रविवारी प्रभादेवी (मुंबई) येथील रवींद्र नाट्य मंदिरमध्ये "अश्रूंची झाली फुले' नाटकाचा प्रयोग सुरू होता. प्रेक्षकांचे मोबाइल सातत्याने वाजल्याने सुबोध भावेने प्रचंड संताप व्यक्त केला. प्रेक्षकांचे मोबाइल असेच वाजत राहणार असतील तर नाटकात काम करणार नाही, असा इशाराच सुबोध भावे याने फेसबुक पोस्टद्वारे दिला आहे. 
"नाटक सुरू होण्यापूर्वी अनेकदा विनंती केल्यानंतरही नाटक सुरू झाल्यावर मोबाईल वाजत असतील, तर याचा अर्थ आपल्या नाटकात काही कमी आहे किंवा नाटक संपूर्ण एकरूप होऊन बघण्याची रसिकांना गरज वाटत नाही. यावर उपाय एकच, म्हणजे यापुढे नाटकात काम न करणे. प्रेक्षकांच्या मोबाइलमध्ये त्यामुळे आमची लुडबूड होणार नाही. नाटकापेक्षा मोबाईल महत्त्वाचा. नाटक टीव्हीवरही बघता येईल,' असा संताप सुबोधने व्यक्‍त केला होता. 
त्यानंतर नाट्य क्षेत्रातील विविध कलाकरांनी पुढे येत त्याबाबतच्या आपल्याही संतापाला वाट मोकळी करून दिली. मोबाइलच्या वाजण्यामुळे रसिकवर्ग नाटकादरम्यान मोठमोठ्याने बोलतात. मधूनच उठून बाहेर जातात. मोबाइलच्या बॅटरीचा फ्लॅश पाडला जातो. याशिवाय, लहान मुलांचे खेळणे सुरू असते. मुले रडतात, ओरडतात, मधूनच प्रेक्षक ये-जा करतात. त्यामुळे कलाकारांचे लक्ष विचलित होते. असे प्रत्यय साताऱ्यातील कलाकारांनाही अनेकदा आले आहेत. प्रेक्षकांनी नाटकाच्या वेळेपूर्वी हजर राहावे, मोबाइल सायलेंट करावेत, कलाकारांची लिंक तुटणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे मत त्यांनी नुकतेच "सकाळ'शी बोलताना व्यक्‍त केले. 

नाट्य प्रयोग सुरू असताना प्रेक्षक उशिरा येतात, तसेच सातत्याने मोबाइल वाजत असतात. त्याचा राग आम्ही सादरीकरणावेळी व्यक्‍त करू शकत नाही. मात्र, त्याचा मानसिक त्रास आम्हाला होत असतो. सादरीकरणानंतर मात्र त्याबाबींचा राग बाहेर पडत असतो.
किरण माने, अभिनेता.

मोबाइल वाजणे, मोबाइलवर बोलणे हे नित्याचे बनले आहे. शिवाय, प्रयोग सुरू असतानाच लहान मुले रडतात, इकडून तिकडे धावतात, ओरडतात, यामुळे नाटकाची लय तुटते. त्याचा परिणाम नाटकाच्या सादरीकरणावर होतो.
 सोनाली पंडित, अभिनेत्री.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Don't play mobile in the theater !