कोरोना उपचारांत लूट नको : सांगली जिल्ह्यातील आमदारांची एकमुखी सूचना

Don't rob in corona treatment: One-sided suggestion of MLAs from Sangli district
Don't rob in corona treatment: One-sided suggestion of MLAs from Sangli district

सांगली ः कोरोना संकट काळात आरोग्याच्या उपाययोजना, लसीकरण आणि लॉकडाऊन या विषयांवर आज पालकमंत्री जयंत पाटील यांनी जिल्ह्यातील खासदार, आमदारांशी चर्चा केली. त्यांच्यासमोर जिल्ह्यातील परिस्थिती मांडली आणि या संकटाशी दोन हात करण्यासाठी पक्षभेद बाजूला ठेवून काम करण्याची अपेक्षा व्यक्त केली. या बैठकीत सर्वपक्षीय आमदारांनी विविध मुद्दे मांडले व काही मागण्या केल्या. या बैठकीत आणि बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना आमदारांनी व्यक्त केलेल्या अपेक्षा.... 


गाफिलपणा नको 
सांगली जिल्हा लसीकरणात अग्रेसर आहे. आपल्याकडे तपासण्याही वाढवण्यात आल्या आहेत. परिणामी, वेळेत उपचार होत आहेत. प्रादुर्भाव नियंत्रण करण्यात त्यामुळे यश येत आहेत. लोकांनी बंधने पाळावीत, घरी रहावेत. ही चेन ब्रेक करणे अत्यंत आवश्‍यक आहे. पुन्हा वाढता प्रादुर्भाव पाहता पोलिस आणि महसूल यंत्रणा सक्षमपणे तयार आहे. लोकांनी अजिबात गाफिल राहू नये. लसीकरण करून घ्यावे. मास्क, सॅनिटायझरचा वापर वाढवावा. 
- विश्‍वजित कदम, राज्यमंत्री 


ग्रामसमित्या अधिक सक्षम करायला हव्या 
कोरोना संकटाची भीती लोकांनी वाटेना झाली आहे. गावागावांत ढिलाई आहे. त्यासाठी ग्रामसमित्या अधिक सक्षम आणि कडक करायला हव्यात. सरपंच, ग्रामसेवक, तलाठी ही यंत्रणा काटेकोर वागली पाहिजे. लसीकरणाची मोहीम ही मतदानाच्या मोहिमेसारखी राबवून लोकांना रुग्णालयापर्यंत न्यायला राजकीय यंत्रणाही पुढे यावी, आम्ही तो प्रयोग यशस्वी केला आहे. काही गावांत कोरोनाबाधित लोक मोकाट फिरत आहेत. त्यावर नियंत्रण आणण्याचे काम गावानेच करायला हवे. शंभर टक्के लॉकडाऊनला समर्थन नाही, मात्र लोक ऐकत नसतील तर पर्याय नाही, हे मान्य करावे लागेल. 
- अनिल बाबर, आमदार 


कोरोना उपचारांचे रॅकेट मोडून काढा 
कोरोनावरील उपचारांसाठी लाखांच्या पटीत पैसे लागत आहेत. ही लूटमार थांबली पाहिजे. गोरगरीब, शेतकरी, शेतमजुरांवर माफक दरात उपचार मिळाले पाहिजेत. अडचण कितीही असो, दहा हजार रुपयांत उपचार झाले पाहिजेत. गरीब रुग्णांवर उपचारासाठी जिल्हा नियोजन समितीतून पैशांची तरतूद करावी. अव्वाच्या सव्वा बिले होत असल्याने लोक संकटात आहेत. काही रुग्णालये लाख रुपये डिपॉझिट मागत आहेत. हे यावेळी होता कामा नये. गेल्यावेळी अनेकांनी हात धुवून घेतले. यावेळी आम्ही त्याला विरोध करू. 
- सदाभाऊ खोत, आमदार 


लॉकडाऊनला विरोध नाही, लोकांची सोय करा 
कोरोना संकट वाढत असताना लॉकडाऊन करायला आमचा विरोध नाही, मात्र सरकारने सर्वसामान्य माणसाची जबाबदारी घेतली पाहिजे. त्याला आर्थिक मदत केली पाहिजे. गहू, तांदूळ, डाळी, तेल-मिठाला लोक महाग होताहेत. त्यांचे काय करणार? लोकांना थेट मदत करा. कामागारांना पगार द्या. हाताला काम नसेल, तर चुली पेटणार नाहीत. सरकार परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरत आहेत. या परिस्थितीत लोकही जगले पाहिजेत, याचा सरकार विचार करणार आहे की नाही. या आजारावरील उपचारांसाठी लोकांनी घरदार विकण्याची वेळ येत आहे. यातील लूट थांबली पाहिजे. 
- गोपीचंद पडळकर, आमदार 


उपचारांबाबत हयगय खपवून घेणार नाही 
कोरोना संकटकाळात वेळेवर उपचार मिळणे, हेच मोठे आव्हान होते. यावेळी पुन्हा तशी स्थिती येऊ शकते. त्यादृष्टीने पूर्ण तयारी असली पाहिजे आणि लोकांना वेळेवर आणि चांगले उपचार मिळावेत. ऑक्‍सिजन बेड आणि व्हेंटिलेटर बेडचा तुटवडा निर्माण झाला, तर संकट गडद होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे या पातळीवर काम व्हावे. लॉकडाऊनबाबत राज्य शासन योग्य तो निर्णय दोन दिवसांत घेईल, त्याचा सन्मान सर्वांनी करावा. शेतकरी, कष्टकरी, दुकानदार यांचे नुकसान होऊ नये, यासाठी कडक निर्बंध घालून व्यापार सुरू ठेवावा. 
- मानसिंगराव नाईक, आमदार 


तालुक्‍यांची आरोग्य यंत्रणा सक्षम करावी 
कोरोनाच्या सुरवातीच्या काळात संपूर्ण भार जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेवर होता. रुग्णांना उपचार मिळत नव्हते. अनेकांना त्यात जीव गमवावा लागला. आता त्यातून धडा घेतला पाहिजे. तालुकास्तरावरील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करावी आणि जिल्ह्यावरील ताण कमी करावा. जेणेकरून रुग्णाला त्याच्या तालुक्‍यात उपचार मिळतील आणि गंभीर रुग्णांना जिल्ह्याच्या ठिकाणी दाखल करता येईल. लॉकडाऊनबाबत माझे स्पष्ट मत आहे, पूर्ण बंद न करता कडक निर्बंध लावून व्यापार सुरू ठेवावा. 
- विक्रम सावंत, आमदार 
 

व्यापारी, विक्रेते, फेरीवाल्यांना मदत द्या 
लॉकडाऊन न करता काही निर्बंध घालून दुकाने उघडण्यास परवानगी देण्याचा प्रयत्न करावा. 2019 चा महापूर, गेल्या वर्षीचा कोरोना आणि यंदाही पुन्हा कोरोना संकट यामुळे परत लॉकडाऊन केले तर उद्योग धंदे बुडतील. त्यामुळे लोकांचा उद्रेक होईल. हे टाळण्यासाठी सरकारने प्रयत्न केले जावेत. त्यांना मदत मिळावी. लहान व्यापारी, टपरीवाले, फेरीवाले, भाजी फळ विक्रेते यांचे पोट भरले पाहिजे. त्यांचे कुटुंब जगले पाहिजे यादृष्टीने आपण विचार केला पाहिजे. 
- सुधीर गाडगीळ, आमदार 


बेड तत्काळ मिळावेत 
तासगाव, कवठेमहांकाळमध्ये पुरेशी आरोग्य व्यवस्था आहे. सध्या असलेल्या रुग्णांना उपचार मिळत आहेत. मात्र जर वाढीव बेडची गरज पडली, तर त्याची पूर्तता व्हावी. रुग्णांना उपचारासाठी सांगली, मिरजेला नेताना धावपळ होते, वेळ जातो. त्यामुळे गंभीर रुग्णावर उपचार मिळण्यास विलंब होतो. हे टाळण्यासाठी कुठल्या हॉस्पिटलमध्ये किती बेड आहेत, त्याची माहिती तालुकास्तरावर मिळावी. 
- श्रीमती सुमन पाटील, आमदार 

संपादन : युवराज यादव 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com