शिक्षकाची नोकरी नको रे बाबा...

तात्या लांडगे
रविवार, 24 नोव्हेंबर 2019

- शिक्षक पात्रता परीक्षेकडे भावी गुरुजींची पाठ
- राज्यातून टीईटीसाठी एक लाख अर्ज
- अडीच लाख विद्यार्थ्यांचे केले परीक्षा परिषदेने नियोजन
- राज्यात दहा लाख भावी गुरुजींची संख्या

सोलापूर : गुरुजी होण्याचे स्वप्न पाहत मागील सात वर्षांत तब्बल 12 लाख विद्यार्थ्यांनी बीएड, डीटीएडचे शिक्षण पूर्ण केले. मात्र, प्राथमिक शिक्षक भरती 2010 पासून तर माध्यमिक शिक्षक भरती 2012 पासून बंदच आहे. यंदा 12 हजार 140 पदांसाठी भरती राबविण्यात आली. मात्र, त्यातूनही सुमारे साडेपाच हजार शिक्षक नियुक्‍तीच्या प्रतीक्षेतच आहेत. त्यामुळे शिक्षक भरतीचा नाद करायला नको म्हणत भावी गुरुजींनी अन्य व्यवसायाची वाट धरली. 19 जानेवारीला होणाऱ्या टीईटी परीक्षेसाठी किमान अडीच लाख अर्ज अपेक्षित असताना 17 दिवसांत एक लाख 10 हजार विद्यार्थ्यांनीच अर्ज केले आहेत.

आई-वडिलांच्या डोळ्यासमोर मुलाचे शिक्षक होण्याचे स्वप्न पूर्ण होईल, या आशेने लाखों विद्यार्थ्यांनी आवश्‍यक शिक्षण पूर्ण केले. राज्यात सद्यस्थितीत जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांत सुमारे 30 हजार शिक्षकांची पदे रिक्‍त आहेत. त्यामुळे सात-आठ वर्षांनंतर यंदा 12 हजार शिक्षकांची भरती प्रकिया राबविण्यात आली. मात्र, पहिली ते आठवीपर्यंतच्या गुरुजींना नियुक्‍त्या मिळाल्या अन्‌ उर्वरित शिक्षकांना ताटकळत ठेवले. काहींचे वय झाले तर काहींच्या आई अथवा वडिलांचे निधन झाले. कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी खांद्यावर आल्याने भावी गुरुजींनी अन्य व्यवसायाची निवड केली असून पश्‍चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यातील विद्यार्थ्यांनी पाठ फिरवली आहे. दरम्यान, बीएड पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना दोन्ही पेपर देता येणार आहेत तर डीटीएड विद्यार्थ्यांना एकच पेपर देता येणार आहे, असा बदल राष्ट्रीय शिक्षक परिषदेने केला आहे.
-
राज्याची स्थिती
डीटीएड, बीएड उत्तीर्ण विद्यार्थी
9.95 लाख
टीईटीसाठी अर्ज
1.10 लाख
टीईटीसाठी अपेक्षित विद्यार्थी
2.50 लाख
अर्ज करण्याची मुदत
28 नोव्हेंबर
-
अर्ज करण्याची 28  नोव्हेंबरपर्यंत मुदत
शिक्षण पात्रता परीक्षा 19 जानेवारीला होणार असून 28 नोव्हेंबरपर्यंत विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याची मुदत आहे. अडीच लाखांपर्यंत अर्ज प्राप्त होतील असे नियोजन केले आहे. डीटीएड व बीएड झालेले विद्यार्थी या परीक्षेसाठी अर्ज करू शकतात.
- तुकाराम सुपे, आयुक्‍त, परीक्षा परिषद, पुणे

 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Don't want to hire a teacher ...