... ही राजकारणाची अधोगती 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 नोव्हेंबर 2019

महाराष्ट्रात स्थापन झालेली सत्ता म्हणजे राज्याच्या राजकारणाची अधोगती असून, भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे अशा राजकारणाचा तीव्र निषेध करीत आहोत, अशी भूमिका भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव तुकाराम भस्मे, सहसचिव ऍड. सुभाष लांडे यांनी प्रसिद्धिपत्रकातून मांडली आहे.

नगर : महाराष्ट्रात स्थापन झालेली सत्ता म्हणजे राज्याच्या राजकारणाची अधोगती असून, भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे अशा राजकारणाचा तीव्र निषेध करीत आहोत, अशी भूमिका भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव तुकाराम भस्मे, सहसचिव ऍड. सुभाष लांडे यांनी प्रसिद्धिपत्रकातून मांडली आहे. शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसने एकत्र राहून सरकारला बहुमत सिद्ध करू देऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे. 

शपथविधी अनाकलनीय 
आजच्या राजकीय परिस्थितीसंदर्भात भारतीय कम्युनिस्ट पक्षाने काढलेल्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे, की विधानसभा निवडणुकीनंतर सत्तास्थापनेचा सुरू झालेला घोळ राज्याच्या राजकारणाला अधोगतीकडे नेणारा आहे. काल रात्री 10 वाजेपर्यंत महाराष्ट्रातील महाशिवआघाडीच्या बातम्या आल्या.

राज्यपालांची कीव करावी

आज सकाळी 5.47 वाजता अचानक महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवट संपुष्टात येते. त्यानंतर आज सकाळी आठ वाजता मुख्यमंत्रिपदासाठी भाजपचे गटनेते देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्रिपदासाठी राष्ट्रवादीचे गटनेते अजित पवार यांचा राजभवनामध्ये शपथविधी पार पडतो हे सर्व अनाकलनीय आहे. सत्तास्थापनेकरिता विधानसभा सदस्यांच्या सह्या असलेल्या शपथपत्राची मागणी करणारे बाहुले राज्यपालांची कीव करावी तेवढी कमीच आहे. 

त्यांना जनतेने धडा शिकविला पाहिजे 
ज्यांनी हे घडविले त्यांनी राज्याचे राजकारण अधोगतीकडे नेलेले आहे. अशा पद्धतीने राज्याच्या जनतेला कलंकित करीत असलेल्यांना जनतेने धडा शिकवला पाहिजे. या पद्धतीच्या राजकारणाचा राज्यातील भारतीय कम्युनिस्ट पक्ष तीव्र निषेध करीत आहे. शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसच्या विधानसभा सदस्यांनी राज्यपालांनी स्थापन केलेल्या या तथाकथित सरकारला विधानसभेमध्ये बहुमत दाखल करतेवेळी पराभूत करावे, असे आवाहनही भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे करण्यात आले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: This is the downfall of politics