भिक्षेकऱ्यांशी नाते जोडून अनुभवली श्रीमंती - डॉ. अभिजित सोनवणे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

कोल्हापूर - व्यक्तीचा उपयोग संपला की, परिस्थिती त्यांना भिक्षेकरी बनवते. मग सर्वांचा तिरस्कार त्यांच्या वाट्याला येतो. अशा भिक्षेकऱ्यांशी मी नाते जोडले. त्यांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न केले आणि त्यातून त्यांच्या मनाची श्रीमंती अनुभवली, असे प्रतिपादन डॉ. अभिजित सोनवणे यांनी केले. 

कोल्हापूर - व्यक्तीचा उपयोग संपला की, परिस्थिती त्यांना भिक्षेकरी बनवते. मग सर्वांचा तिरस्कार त्यांच्या वाट्याला येतो. अशा भिक्षेकऱ्यांशी मी नाते जोडले. त्यांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न केले आणि त्यातून त्यांच्या मनाची श्रीमंती अनुभवली, असे प्रतिपादन डॉ. अभिजित सोनवणे यांनी केले. 

तात्यासाहेब तेंडुलकर व्याख्यानमालेतील पहिले पुष्प गुंफताना ते बोलत होते. प्रायव्हेट हायस्कूलमध्ये हे व्याख्यान झाले. श्री महालक्ष्मी सहकारी बॅंक, ब्राह्मण सभा करवीर आणि तेंडुलकर परिवार यांच्या वतीने तात्यासाहेब तेंडुलकर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.

व्याख्यानमालेत पहिल्या दिवशी डॉ. अभिजित सोनवणे यांनी ‘भिक्षेकरी समज व गैरसमज’ हा विषय मांडला. डॉ. सोनवणे यांनी पुण्यातील ४३ भिक्षेकऱ्यांचे पुनर्वसन केले आहे. भिक्षेकरी याविषयी सोनवणे म्हणाले, ‘जोपर्यंत व्यक्तीचा उपयोग असतो, ताेपर्यंत ती हवीहवीशी वाटते. तिचा उपयोग संपला की मग असंवेदनशील मनाची मुले पालकांना सोडून देतात. मग उरलेलं आयुष्य मंदिराच्या किंवा मशिदीच्या दारात हात पसरत घालवावे लागते. एका अशाच भिक्षेकरी दाम्पत्याने मला गरिबीच्या काळात मदत केली. त्यांचे उपकार फेडण्याच्या उद्देशाने या पुनर्वसन कार्याला सुरुवात झाली. भिक्षेकऱ्यांना मदत करत गेलो आणि माझीही नोकरीमध्ये आर्थिक उन्नती होत गेली. आता नोकरी सोडून पूर्णवेळ पुनर्वसनाचे काम करतो.’ 

डॉ. सोनवणे म्हणाले, ‘प्रत्येक देवाचा वार आहे, त्या दिवशी त्याच्या देवळासमोर थांबतो. तेथे भिक्षेकरी भेटतात. त्यांच्या जवळ बसतो. त्यांच्यातील शिळे अन्न खातो. त्यांच्याशी एकरूप होतो. त्यांना औषध देतो. मग काही दिवसांनी त्यांच्याशी नाते जोडले जाते.’

सूत्रसंचालन दीपक भागवत यांनी केले. प्रास्ताविक डॉ. उदय कुलकर्णी यांनी केले. श्रीकांत लिमये यांनी आभार मानले.  यावेळी महालक्ष्मी बॅंकेचे अध्यक्ष ॲड. प्रवीण शिराळकर, उपाध्यक्ष दिलीप मुंडरगी, जयंत तेंडुलकर, सरकारी वकील विवेक शुक्‍ल यांच्यासह ब्राह्मण सभेचे संचालक, बॅंकेचे संचालक उपस्थित होते.

Web Title: Dr Abhijeet Sonavane comment