अभियांत्रिकीत करीअरच्या असंख्य संधी - डॉ. गुप्ता

अभियांत्रिकीत करीअरच्या असंख्य संधी - डॉ. गुप्ता

कोल्हापूर - ‘विज्ञान, तंत्रज्ञान, व्यवस्थापन कौशल्य यांचा वापर करून सर्वसामान्य माणसाचे जगणे सुखकर करणे, हेच अभियंत्यांचे काम आहे. तंत्रज्ञानाच्या युगामध्ये अभियांत्रिकी क्षेत्राचा विस्तार सर्वव्यापी झाला आहे; त्यामुळेच रोजगाराच्या असंख्य संधी उपलब्ध असून, भविष्यातही अभियांत्रिकी शाखेला प्रचंड मागणी असणार आहे. सध्या अभियांत्रिकी पदवी घेणाऱ्या ९० टक्के लोकांना नोकरी मिळते, तर १० टक्के लोक व्यवसाय सुरू करतात. त्यामुळे अभियंता बनू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी आत्मविश्‍वासाने अभियांत्रिकी शाखेला प्रवेश घ्यावा,’ असे प्रतिपादन डॉ. डी. वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता यांनी केले. 

‘सकाळ’ आणि डॉ. डी. वाय. पाटील ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त सहकार्याने आयोजित ‘इंजिनीअरिंग ॲडमिशन २०१९’ या उपक्रमात ते बोलत होते. विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी शाखा, त्यातील संधी, प्रवेशप्रक्रिया यांबाबतची माहिती होण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन झाले. यावेळी ‘मिशन ॲडमिशन ए टू झेड’ या पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले. 

डॉ. गुप्ता म्हणाले,‘‘विज्ञान, तंत्रज्ञान, व्यवस्थापन कौशल्य यांचा वापर करून सामान्य माणसाचे जीवन सुखकर करणे, हेच अभियंत्यांचे काम आहे. त्यामुळेच अभियांत्रिकी काम हे सर्वव्यापी बनले. वैद्यकीयपासून अंतराळ क्षेत्रापर्यंत सर्वच ठिकाणी अभियंत्यांना संधी आहेत. फ्लिपकार्ड, स्नॅपडील यांसारखी ऑनलाइन बाजारपेठही अभियंत्यांनीच बनवली आहे. केंद्र सरकारने ‘इलेक्‍ट्रॉनिक्‍स पॉलिसी-२०१९’ बनवली आहे. यामध्ये हजारो कोटींची गंतवणूक होणार असून, त्यातून अभियंत्यांसाठी १ कोटी रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. या अंतर्गत ॲपल कंपनी रांजणगावला मोबाईल फोन बनवण्याचा कारखाना सुरू करणार आहे. नॅनो टेक्‍नॉलॉजी, आयटी, एरोनॉटिक्‍स अशा नव्या अभियांत्रिकी शाखा सुरू झाल्या असून, त्यांचेही क्षेत्र विस्तारत आहे.’’

ते म्हणाले, ‘‘अभियंत्यांना नोकरीच्या कोट्यवधी संधी उपलब्ध आहेत. आजही अभियांत्रिकीची पदवी घेणाऱ्या ९० टक्के विद्यार्थ्यांना नोकरी मिळते. त्यांतील ४५ टक्के विद्यार्थी पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्याबरोबरच कॅंपस इंटरव्ह्यूमधून निवडले जातात. यूपीएसी, एमपीएससी परीक्षांमध्ये यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये अभियंत्यांचे प्रमाण अधिक आहे. बॅंकिंग क्षेत्रातही व्यवस्थापन, वित्त नियोजन आणि तांत्रिक विभागात अभियंते मोठ्या पगारावर काम करतात. अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केल्यानंतर जर व्यवस्थापकीय शिक्षण घेतले, तर रोजगाराच्या आणखी संधी आहेत. फक्त त्यासाठी प्रामाणिकपणे कष्ट घेण्याची तयारी पाहिजे. त्यामुळे अभियंता बनायची इच्छा बाळगणाऱ्यांनी कोणतीही भीती न बाळगता अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यावा. डी. वाय. पाटील ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये अभियांत्रिकीचे उत्तम शिक्षण, अनुभव आणि शंभर टक्के नोकरीची संधी मिळेल.’’ 

निवासी संपादक (सकाळ सेवाभक्ती) निखिल पंडितराव म्हणाले,‘‘कौशल्य विकासाला ‘सकाळ’ने पहिल्यापासूनच महत्त्व दिले आहे. एस.आय.एल.सी. प्रकल्पाच्या माध्यमातून विविध क्षेत्रांतील व्यक्तींना प्रशिक्षण दिले जाते. आंतरराष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक संधी महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना मिळाव्यात, हे ए. पी. ग्लोबलचे उद्दिष्ट आहे. भविष्यात शिक्षण क्षेत्रात ‘सकाळ’ अग्रेसर असेल.’’ 

यावेळी डी. वाय. पाटील शिक्षण संस्थेचे विश्‍वस्त ऋतुराज पाटील, ‘सकाळ’चे उपसरव्यवस्थापक रवींद्र रायकर, प्राचार्य डॉ. ए. एन. जाधव, डॉ. व्ही. पी. कलिमनी, उपप्राचार्य प्रा. आर. एस. पोवार यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com