योग, आयुर्वेदातूनच सर्वांगीण आरोग्य - डॉ. अनुराधा भोसले-दिवाण

योग, आयुर्वेदातूनच सर्वांगीण आरोग्य - डॉ. अनुराधा भोसले-दिवाण

कोल्हापूर - ‘‘कुठल्याही डाएटरी हेल्थ सप्लिमेंटच्या मागे न लागता ऋतूनुसार आपापल्या परिसरात ज्या भाज्या, फळे पिकतात, त्यांचा आहारात योग्य वापर करा. योग आणि आयुर्वेदाची कास धरा. त्यातूनच सर्वांगीण आरोग्य लाभेल,’’ असे स्पष्ट मत तत्त्वज्ञानाच्या अभ्यासिका व लाईफ कोच डॉ. अनुराधा भोसले-दिवाण यांनी व्यक्त केले.

‘सकाळ’चे संस्थापक-संपादक, पत्रमहर्षी डॉ. ना. भि. तथा नानासाहेब परुळेकर यांच्या १२१ व्या जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानात त्या बोलत होत्या. 

राजर्षी शाहू स्मारक भवनात हाऊसफुल्ल गर्दीच्या साक्षीने ‘जगूया आरोग्यदायी’ या विषयावर त्यांनी सुमारे सत्तर मिनिटे अभ्यासपूर्ण संवाद साधला.

भारतीय आरोग्यशास्त्राला हजारो वर्षांचा इतिहास आहे. त्यातील विविध दाखले देत डॉ. भोसले-दिवाण यांनी आयुर्वेदातील अष्टांगयोग अभ्यासल्यास प्रत्येकाला आपापला युनिक डाएट प्लॅन मिळेल, असे स्पष्ट केले. 

त्या म्हणाल्या, ‘‘आपापल्या प्रकृतीनुसारच आपला आहार असायला हवा. आयुर्वेदाने आदर्श दिनचर्या सांगितली आहे आणि ऋतुचर्याही सांगितली आहे. आपण मात्र आपलेच शास्त्र कधी समजावून घेतले नाही. याउलट परदेशातून ज्या काही गोष्टींचा आपल्यावर भडीमार होतो, त्याच्याच मागे धावत राहिल्याने आपल्यातील जीवनशक्तीच संपवून बसलो आहे.’’

माणसाची निरोगी, आनंदी, समाधानी, चांगली आणि दीर्घायुषी अवस्था म्हणजे निरोगी स्वास्थ्य असते. त्यासाठी कुठल्याही औषधांची गरज नसते. आयुर्वेद हे जगण्याचे शास्त्र असून या शास्त्राने शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक आणि सामाजिक अशा चारही पातळीवर निरोगी व निरामय आयुष्य कसे जगता येते, याचे विस्तृत मार्गदर्शन केले आहे. मात्र सध्याच्या स्पर्धेच्या युगात भौतिक सुविधांच्या अतिवापरामुळे आपल्यातील ओजस म्हणजेच जीवनशक्ती संपवून टाकतो आणि विविध व्याधींचा विळखा पडायला लागतो. त्याची उत्तरं शोधताना योग आणि आयुर्वेदच सर्वोत्तम मार्गदर्शक ठरते. किंबहुना ते आत्मसात केले तर आपल्यातील जीवनशक्ती कैक पटीने वाढते आणि त्यामुळे उत्पादकता व सृजनशीलताही वाढते. हे अनेक संशोधनांनी सिद्ध झाले असल्याचेही डॉ. भोसले-दिवाण यांनी सांगितले. 

‘सकाळ’चे निवासी संपादक डॉ. श्रीरंग गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, ‘‘ ‘सकाळ’ने जनतेच्या सुख-दु:खात सहभागी व्हावे, असा डॉ. नानासाहेब परुळेकर यांचा आग्रह होता. त्यातूनच विविध सामाजिक उपक्रम सुरू झाले. त्यांचा लोककल्याणकारी विचार ‘सकाळ’ने आजवर जपला आहे आणि याच विचारांचा जागर मांडण्यासाठी प्रत्येक वर्षी जयंतीचा कार्यक्रम होतो. राजर्षी शाहूंनी ‘स्वच्छ व सुंदर कोल्हापूर’चा आग्रह धरला. जनतेसाठी दवाखाने सुरू केले. कोल्हापूरला हा मोठा वारसा असला तरी फिटनेसबाबत अनेक संभ्रम सध्या असल्याने यंदा आरोग्यविषयक व्याख्यानाचे आयोजन केले आहे.’’

डॉ. भोसले-दिवाण सांगतात

  • आपला स्वतःशी, दुसऱ्यांशी, सृष्टीशी आणि परमात्म्याशी असणारा संबंध शोधणं आणि त्यानुसार पुढे जाण्यातून सामाजिक स्वास्थ्य जपता येते.
  • बारीक असणे म्हणजे फिट असणे नव्हे. तुम्ही कसेही असा. प्रत्येकाच्या स्वास्थ्याचे रहस्य त्याच्या आहार-आचारात असते.
  • सोळा ते एकवीस वयोगटातील मुलींमधील ‘झिरो फिगर’ची क्रेझ आरोग्याला घातक.
  • आपल्या जगण्याचे ध्येय ठरवा. विशिष्ट टप्प्यावर त्याबाबत स्वतःशी संवाद साधा. त्यामुळे मनावरचा ताण कमी होईल आणि योग्य दिशेने वाटचाल करता येईल.
  • शरीर कमावणं म्हणजे तीन आणि चार महिन्यांचा डाएट प्लॅन किंवा सप्लिमेंटचा आग्रह नकोच. शरीर कमावणे ही एक साधना असते आणि ती सातत्यपूर्ण व्यायामातूनच साध्य होते. 

‘सकाळ’ अन्‌ राजर्षी शाहू
गेल्या तीन पिढ्या घरी ‘सकाळ’ आहे आणि त्यामुळे ‘सकाळ’चा वाचक सजग व सुजाण असतो, याची चांगली माहिती आहे. राजर्षी शाहूंच्या कोल्हापुरात व्याख्यानाची ‘सकाळ’ने पहिल्यांदाच संधी दिल्याचे सांगून राजर्षी शाहूंचा सामाजिक क्रांतीचा विचार आजही दिशादर्शक असल्याचे डॉ. भोसले-दिवाण यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com