अवघी सांगली झाली 'भीम'मय

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 एप्रिल 2018

''खोटा इतिहास सांगून माथी भडकवणे, वर्तमान म्हणजे माध्यमं ताब्यात घेऊन विरोधी आवाज संपवणे आणि शैक्षणिक अभ्यासक्रमातच चुकीच्या माहितीचा समावेश करून भविष्य भ्रष्ट करायचे कारस्थान सुरु आहे. त्याचवेळी लोकशाहीची संस्थात्मक बांधणीच मोडीत काढली जात आहे''.

- संजय आवटे, पत्रकार

सांगली : डॉ बाबासाहेब आंबेडकर नावाच्या विचार सूर्याच्या प्रकाशाने ज्यांची आयुष्ये उजळून निघाली अशा शेकडो भीमसैनिकांच्या अमाप उत्साहाने आज सांगली भीममय झाली. रस्तोरस्ती आज निळे ध्वज आणि जय भीमचा नारा सुरु होता. येथील मध्यवर्ती एसटी स्थानकाजवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादनासाठी मोठा जनसमुदाय लोटला होता.

मध्यरात्रीपासूनच डॉ. आंबेडकर पुतळ्याचा परिसर भीमअनुयायींच्या उत्साहाने भारला होता. फटाक्‍यांच्या आतषबाजीने भीमोत्सवाला मध्यरात्री प्रारंभ झाला. अनेक ठिकाणांहून कार्यकर्ते मशाली घेऊन पुतळ्याच्या दिशेने येत होते. हाच उत्साह आज दिवसभर कायम होता. संपूर्ण पुतळा परिसराची सजावट केली होती. समोर थाटलेल्या मंडपातील गर्दी दिवसभर कायम होती. सकाळपासून विविध पक्षाचे नेते कार्यकर्त्यांची डॉ आंबेडकरांना अभिवादनासाठी रांग लागली होती. शहरातून तरुणांचे वाहनफेऱ्यांनी पुतळा परिसरात दाखल होत होते. पुतळ्याच्या पार्श्‍वभूमीवर यावेळी कोरेगाव भीमा विजयस्तंभाची प्रतिकृती आणि महामानवांच्या प्रतिमा होत्या. पुतळा परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने दिवसभर थंडगार सरबताची व्यवस्था केली होती. 

दुपारी अकरा वाजता रिपब्लिकन पक्षाचे नेते मोहन साबळे विचार मंचावर पत्रकार संजय आवटे व प्रा. श्रीमंत कोकाटे यांची भाषणे झाली. यावेळी ज्येष्ठ नेते डी. एल. थोरात यांच्या हस्ते कष्टकरी वर्गाचे नेते बिराज साळुंखे यांचा विशेष पुरस्काराने गौरव झाला. 

यावेळी आवटे म्हणाले, ''खोटा इतिहास सांगून माथी भडकवणे, वर्तमान म्हणजे माध्यमं ताब्यात घेऊन विरोधी आवाज संपवणे आणि शैक्षणिक अभ्यासक्रमातच चुकीच्या माहितीचा समावेश करून भविष्य भ्रष्ट करायचे कारस्थान सुरु आहे. त्याचवेळी लोकशाहीची संस्थात्मक बांधणीच मोडीत काढली जात आहे. मात्र, या देशाची लोकशाही टिकवून ठेवण्याचे शहाणपण या देशातील कोट्यवधी सामान्य लोकांना आहे, असे बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते. तेच लोकशाहीच्या सांगाड्यात प्राणवायू फुंकतील असेही ते म्हणाले होते. ते असेही म्हणाले होते की, सामाजिक समता, विरोधकांचे अस्तित्व, कायद्याबाबतची सर्वसमानता आणि आणि समाजाचा सारासार विवेक -सहिष्णूता कायम असेल तेव्हाच लोकशाही टिकू शकेल. आज या सर्वच गोष्टींना नख लावला जातोय.'' 

प्रा कोकाटे म्हणाले,"हिंदूराष्ट्र करण्याची जाहीर घोषणा या देशातील केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे करतात आणि त्याचवेळी पंतपमंत्री मात्र मौन पाळून त्यावर ब्र देखील काढत नाहीत. त्यांच्यासाठी संविधान हाच मोठा अडसर असून त्यासाठीच एक मोठी मोहिम आखली जात आहे. भीमा कोरेगावची दंगल त्यासाठीच घडवण्यात आली. मराठा आणि दलित यांच्यात भांडण लावून देण्यासाठीचे हे कारस्थान असून आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी समाजात दंगली घडवण्यासाठी प्रयत्न होतील.'' 

शुभांगी कांबळे यांनी स्वागत केले. डॉ नामदेव कस्तुरे यांनी प्रास्ताविकात डॉ आंबेडकर हा विचारच या देशापुढील सर्व समस्यांचे उत्तर आहे असे सांगितले. भर उन्हात मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

Web Title: Dr Babasaheb Ambedkar Festival Sangli