पर्यावरण जगण्याची चळवळ व्हावी - डॉ. डी. टी. शिर्के

पर्यावरण जगण्याची चळवळ व्हावी - डॉ. डी. टी. शिर्के

कोल्हापूर - ‘केवळ अन्न, वस्त्र व निवाराच नव्हे; तर आता हवा आणि पाणी याही आपल्या प्रमुख गरजा बनल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर पर्यावरण आता प्रत्येकाच्या जगण्याचीच चळवळ बनली पाहिजे,’ असे स्पष्ट मत शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी व्यक्त केले. येथे सुरू असलेल्या नवव्या किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांतर्गत वसुंधरा गौरव व वसुंधरा मित्र पुरस्कार वितरणावेळी ते बोलत होते. शाहू स्मारक भवनात हा कार्यक्रम झाला.

दरम्यान, यावेळी झालेल्या कार्यक्रमात ‘सकाळ’चे छायाचित्रकार बी. डी. चेचर, मलबार नेचर क्‍लब, फ्रेंडस्‌ नेचर क्‍लबचे तुषार साळगावकर यांना वसुंधरा मित्र; तर शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. पी. डी. राऊत, पंचगंगा प्रदूषणप्रश्‍नी सुकाणू समिती सदस्य डॉ. एस. डी. कदम, ‘सायबर’च्या पर्यावरणशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. ए. आर. कुलकर्णी यांना वसुंधरा गौरव पुरस्काराने गौरवण्यात आले.

प्र-कुलगुरू डॉ. शिर्के यांनी एकूणच वर्तमान आणि पर्यावरणीय प्रश्‍नावर भाष्य करताना माणसाने आपले सोडून, दुसऱ्याचे ओरबडायला सुरवात केल्याने प्रश्‍नांचा गुंता वाढल्याचे सांगितले. डॉ. राऊत यांनी पंचगंगा प्रदूषणमुक्‍तीच्या लढ्यातील विविध अनुभव शेअर केले. डॉ. कदम, श्री. साळगावकर, ‘मलबार’च्या वतीने सायली पलांडे-दातार यांनीही मनोगते व्यक्त केली. ‘सकाळ’ समूहाने काम करण्याची संधी दिल्याने आजवर अनेक छायाचित्रे, व्हिडिओ स्टोरीज्‌च्या माध्यमातून विविध प्रश्‍नांचा वेध घेतला. ‘सकाळ’सह कुटुंब आणि वडणगे गावचा हा पुरस्कार असल्याचे श्री. चेचर यांनी सांगितले.

संयोजन समितीचे उपाध्यक्ष कृष्णा गावडे, विजय टिपुगडे व्यासपीठावर उपस्थित होते. संयोजन समितीचे अध्यक्ष चंद्रहास रानडे यांनी स्वागत केले. उदय गायकवाड यांनी मानपत्रांचे वाचन केले. अनिल चौगुले यांनी आभार मानले. दुर्गा आजगावकरने सूत्रसंचालन केले.  

सिंगापूरचं मॉडेल
आपल्याला पाण्याची किंमत नाही; मात्र दुष्काळी भागातून जाऊन आले, की त्याची किंमत कळते. त्याच्याही पुढे जाऊन प्रत्येकाने एकदा सिंगापूरच्या पाण्याच्या मॉडेलचा अभ्यास करावा. कारण सिंगापूर बहुतांश टक्के पाणी आयात करते आणि त्याचेही नियोजन २०६० पर्यंत त्यांनी करून ठेवले असल्याचेही प्रा. डॉ. शिर्के म्हणाले.

धुण्याची चावी स्वच्छता मोहीम
महोत्सवांतर्गत आज सकाळी धुण्याची चावी परिसराची स्वच्छता झाली. दुपारी झालेल्या युवा संवाद उपक्रमात सायबर, शिवाजी विद्यापीठ पर्यावरणशास्त्र विभाग, संजय घोडावत युनिव्हर्सिटी, न्यू आर्किटेक्‍चर, डी. वाय. पाटील कॉलेज, केआयटी कॉलेजमधील विद्यार्थी सहभागी झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com