ऑक्‍सफर्डच्या ज्ञानपंढरीत राहून ज्ञानमय झालो - डॉ. देवानंद शिंदे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 फेब्रुवारी 2017

कोल्हापूर - ऑक्‍सफर्ड विद्यापीठ ही ज्ञानाची पंढरी असून, ज्ञान देणे आणि ज्ञान घेणे, एवढेच कार्य तिथे शतकानुशतके सुरू आहे. इंग्लंडच्या ज्ञानाचे व संस्कृतीचे केंद्र असलेल्या या ज्ञानपंढरीत एक महिना राहून मी ज्ञानमय झालो, अशी प्रांजळ भावना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी आज येथे व्यक्त केली.

कोल्हापूर - ऑक्‍सफर्ड विद्यापीठ ही ज्ञानाची पंढरी असून, ज्ञान देणे आणि ज्ञान घेणे, एवढेच कार्य तिथे शतकानुशतके सुरू आहे. इंग्लंडच्या ज्ञानाचे व संस्कृतीचे केंद्र असलेल्या या ज्ञानपंढरीत एक महिना राहून मी ज्ञानमय झालो, अशी प्रांजळ भावना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी आज येथे व्यक्त केली.

कुलगुरू डॉ. शिंदे युरोपियन युनियनच्या नमस्ते प्रकल्पांतर्गत इंग्लंडच्या ऑक्‍सफर्ड विद्यापीठात व्हिजिटिंग स्कॉलर म्हणून एक महिना संशोधन करून नुकतेच परतले. त्यांच्या ऑक्‍सफर्ड येथील अनुभवाचा लाभ शिवाजी विद्यापीठातील शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, संशोधक, विद्यार्थी-विद्यार्थिनींना मिळावा, यासाठी राजर्षी शाहू सभागृहात आयोजित व्याख्यानात ते बोलत होते.

डॉ. शिंदे म्हणाले, ‘‘एक देश, एक भाषा, एक संस्कृती आणि एक कायदा अशा एकात्म सूत्रात ऑक्‍सफर्डमधील कारभार चालतो. एकूणच तेथील शिस्त आणि संशोधन-अध्यापन संस्कृती अत्यंत अनुकरणीय आहे. संशोधन आणि अध्यापनाची तिथे इतकी अप्रतिम सांगड घातली गेली आहे, की त्यामुळेच या विद्यापीठातून आजपर्यंत ५० हून अधिक नोबेल विजेते आणि जागतिक स्तरावर गौरविले गेलेले शास्त्रज्ञ, साहित्यिक व कलाकार निर्माण झाले. ऑक्‍सफर्डमध्ये आणि एकूणच इंग्लंडमध्ये एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे येथे जनतेच्या प्राधान्यक्रमावर सर्वप्रथम देश असतो. त्यानंतर संस्था, कुटुंब आणि सरतेशेवटी मी असतो.’’

ते म्हणाले, ‘‘ऑक्‍सफर्डला दरवर्षी जगभरातील सत्तर लाख लोक भेट देतात. ते केवळ या शैक्षणिक पंढरीच्या दर्शनासाठी. बावीस हजार विद्यार्थी, तेरा हजार कर्मचारी, सतरा हजार रोजगार, ४६०० व्यवसाय आदींच्या माध्यमातून अब्जावधी पौडांची उलाढाल या विद्यापीठात होते. दीड लाख लोकवस्तीच्या ऑक्‍सफर्ड गावात सुमारे १२५ ग्रंथालये आहेत. जगातले सर्वांत मोठे ग्रंथभांडार येथे एकवटले आहे. जमिनीच्या वर जितकी इमारत दिसते, तितकेच ग्रंथागार जमिनीच्या खालीही असून, भूमिगतरित्या ही ग्रंथालये एकमेकांशी जोडलेली आहेत. 

येथील मध्यवर्ती ग्रंथालयात सुमारे एक कोटी वीस लाख ग्रंथ असून, १६२० पासून प्रसिद्ध झालेले प्रत्येक पुस्तक या ठिकाणी उपलब्ध आहे. इतक्‍या प्रचंड संग्रहातील कोणतेही पुस्तक अवघ्या तीन मिनिटांत वाचकाला उपलब्ध करण्यात येते. या भेटीदरम्यान आपण केवळ बावीस ग्रंथालयांना भेट देऊ शकलो.’’ त्यांनी पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनद्वारे ऑक्‍सफर्ड विद्यापीठासह भेटी दिलेली अन्य विद्यापीठे, विविध शहरे, प्रयोगशाळा यांची माहिती दिली. या प्रसंगी बीसीयूडीचे संचालक डॉ. डी. आर. मोरे, परीक्षा नियंत्रक महेश काकडे, वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. आर. व्ही. गुरव उपस्थित होते. नंदिनी पाटील यांनी सूत्रसंचालन केले. कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी आभार मानले.

Web Title: dr. devanand shinde talking