सोलापूर: डॉ. कोटणीस स्मारकात धुळीचे थर

परशुराम कोकणे
गुरुवार, 3 मे 2018

सोलापूरला मिळाली आंतरराष्ट्रीय ओळख 
डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांचे बालपण सोलापुरात गेले. त्यांचा जीवनपट स्मारकात छायाचित्रांच्या माध्यमातून मांडण्यात आला आहे. त्यांच्या हस्ताक्षरातील पत्रही याठिकाणी आहेत. दुसऱ्या चीन-जपान युद्धाच्या पार्श्‍वभूमीवर भारताने चीनमध्ये वैद्यकीय सुविधेसाठी पाठविलेल्या पथकामध्ये डॉ. कोटणीस होते. त्यांच्यामुळे सोलापूरला आंतरराष्ट्रीय ओळख मिळाली. वयाच्या 32 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. तत्कालीन नेते माओ त्से तुंग यांनी कोटणीस यांना चीनचे मित्र म्हणून गौरवले होते. चीनसह सोलापुरात त्यांचे सुंदर स्मारक आहे. 

सोलापूर : स्मार्ट सिटीच्या दिशेने जाणाऱ्या सोलापुरात पर्यटन वाढीसाठी प्रयत्न होणे गरजेचे असताना महापालिका प्रशासनाने डॉ. द्वारकानाथ कोटणीस स्मारकाकडे पूर्णतः दुर्लक्ष केले आहे. स्मारकाला पर्यटकांनी भेट द्यावी यासाठी विशेष प्रयत्न होताना दिसत नाहीत. स्मारकाबाहेरील बाग स्वच्छ आणि सुंदर असली तरी स्मारकातील स्थिती मात्र वेगळीच आहे. स्वच्छतेअभावी आतमध्ये धूळ थर साचले असून छतासह खिडक्‍या, दरवाजे आणि फोटोफ्रेमला जाळ्या लागल्या आहेत. 

महापालिका प्रशासनाने लाखो रुपये खर्च करून डॉ. कोटणीस स्मारकाची उभारणी केली. सुरवातीला काही दिवस याठिकाणी व्यवस्थित देखभाल करण्यात आली. सध्या स्मारकाच्या स्वच्छतेसाठी एकाच मजुराची नियुक्ती आहे. स्वच्छतेअभावी स्मारकात मोठ्या प्रमाणात धूळ साचली असून आतमध्ये कुमट वास येतो. स्मारकाच्या बाहेरील बागेच्या व्यवस्थेसाठी दोन माळी आहेत, त्यांच्याकडून बागेची व्यवस्थित देखभाल होत आहे. या दोघांवरच चौकातील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याची देखभाल करण्याचेही काम आहे. याठिकाणी आणखी एका माळीची आवश्‍यकता आहे. सुरवातीला याठिकाणी पुरेसे मनुष्यबळ होते, आता मात्र दोन माळी आणि एका मजुरावर काम चालू आहे. स्मारकाजवळच असलेल्या खुले सभागृहात एकही कार्यक्रम होत नाही. चित्रकार राम खरटमल यांनी रेखाटलेली डॉ. कोटणीस यांची दोन मोठी चित्रे याठिकाणी आहेत. चित्रावरील प्लास्टिकचे आवरण निघाले असून ऊन, पावसामुळे ते चित्र खराब होत आहे. स्मारकात पाणीपुरवठा व्यवस्थित होतो, त्यामुळे बागेतील झाडांना पाणी मिळत आहे. तसेच स्वच्छतागृहही उपलब्ध आहे. मुंबई, पुण्याहून कधीतरी पर्यटक येतात. सोलापुरातील लोक मात्र या स्मारकाकडे कधीच फिरकत नाहीत. याठिकाणी पर्यटकांनी यावे यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. 

सोलापूरला मिळाली आंतरराष्ट्रीय ओळख 
डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांचे बालपण सोलापुरात गेले. त्यांचा जीवनपट स्मारकात छायाचित्रांच्या माध्यमातून मांडण्यात आला आहे. त्यांच्या हस्ताक्षरातील पत्रही याठिकाणी आहेत. दुसऱ्या चीन-जपान युद्धाच्या पार्श्‍वभूमीवर भारताने चीनमध्ये वैद्यकीय सुविधेसाठी पाठविलेल्या पथकामध्ये डॉ. कोटणीस होते. त्यांच्यामुळे सोलापूरला आंतरराष्ट्रीय ओळख मिळाली. वयाच्या 32 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. तत्कालीन नेते माओ त्से तुंग यांनी कोटणीस यांना चीनचे मित्र म्हणून गौरवले होते. चीनसह सोलापुरात त्यांचे सुंदर स्मारक आहे. 

डॉ. कोटणीस स्मारकाकडे महापालिकेचे दुर्लक्ष व्हायला नको. मोठ्या प्रमाणात निधी खर्च करून स्मारक उभारले आहे. स्मार्ट सिटी होत असताना याठिकाणी पर्यटन वाढीसाठी प्रयत्न व्हायला हवेत. यापुढे याठिकाणी नियमितपणे स्वच्छता होईल याकरिता मी स्वत: लक्ष देतो. 
- विनोद भोसले, नगरसेवक 

डॉ. द्वारकानाथ कोटणीस स्मारकाच्या देखभालीसाठी महापालिकेने कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. याठिकाणी पर्यटकांनी भेट द्यायला हवी. महापालिकेने सर्व सुविधा याठिकाणी पुरविल्या आहेत. 
- लक्ष्मण चलवादी, नगर अभियंता 

डॉ. कोटणीस स्मारकाच्या ठिकाणी महापालिकेकडून बागकामासाठी दोन माळी आहेत, पण स्वच्छतेसाठी एकच मजूर आहे. स्मारकाकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाले आहे. आयुक्तांनी स्वत: याकडे लक्ष द्यावे. पर्यटन वाढीसाठी महापालिका प्रशासनाकडून प्रयत्न व्हायला हवेत. 
- रमेश मोहिते, चिनी भाषा केंद्र चालक

Web Title: Dr. Dwarkanath Kotnis memorial in Solapur