..तर कृष्णा कारखाना भोसलेंची प्रायव्हेट लिमीटेड कंपनी होईल - डॉ. इंद्रजित मोहिते

..तर कृष्णा कारखाना भोसलेंची प्रायव्हेट लिमीटेड कंपनी होईल -  डॉ. इंद्रजित मोहिते

इस्लामपूर - कृष्णा कारखान्यावर पारदर्शी कारभाराची स्वप्ने दाखवून निवडून आलेल्या सत्ताधार्‍यांनी अंदाधूंद कारभार सुुरु केला आहे. कारखान्याचे निर्णय खासगी ट्रस्टवर घेतले जातात. कृष्णेच्या सत्तेचा उपयोग करुन जयवंत शुगरला बाळसं आणायचा प्रयत्न अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले करीत असल्याचा आरोप कृष्णेचे माजी अध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते यांनी पत्रकार बैठकीत केला. असाच कारभार राहिला तर लवकरच कृष्णा कारखाना भोसलेंची प्रायव्हेट लिमीटेड कंपनी होईल असेही ते म्हणाले. 

डॉ. इंद्रजित मोहिते म्हणाले, ‘‘ कृष्णा कारखान्याच्या सत्तेवर येताना विद्यमान सत्ताधार्‍यांनी पारदर्शी कारभार करु, कृष्णेला गतवैभव प्राप्त करुन देऊ अशी गोडगोड स्वप्ने सभासदांना दाखवली होती. मात्र सत्तेवर आल्यावर त्यांनी कर्‍हाड दक्षिण व उत्तर मधील बहुतांशी सभासदांच्या ऊस नोंदीमध्ये फरक करुन जाणिवपुर्वक ऊस तोड उशिरा देणे, अडचणी आणणे असला उद्योग सुरु केला आहे. चांगला ऊस जयवंत शुगरला पाठवायचा खासगीत सल्ला दिला जातो. व कृष्णेच्या जीवावर जयवंत शुगर मोठा करण्याचा उद्योग सुरु आहे.’’

ते म्हणाले, ‘‘ 2015 पासून आजअखेर मृत सभासद शेअर्स ट्रान्सफर करण्याची प्रक्रीया जाणिवपुर्वक थांबवली आहे. शेअर्स ट्रान्सफर अर्ज देण्यासाठी गेलेल्या सभासदांना अजून धोरणात्मक निर्णय झाला नाही, संचालक बोर्डाचा आदेश नाही, या बाबतची कागदपत्रे दाखल करायची असल्यास कृष्णा चॅरीटेबल ट्रस्टवर जावा, असा सल्ला देऊन टोलवाटोलवी केली जाते. विद्यमान संचालक मंडळाला यात राजकारण करायचे आहे. त्यामूळे संबंधीत शेअर्स धारकांनी मृत सभासद शेअर ट्रान्सफर  करण्यासाठी एक लेखी अर्ज, वारसाच्या नावाचा चालू तारखेचा सातबारा खातेउतारा, वारस नोंदीचा किंवा अन्य वारस नसल्याचा तलाठ्यांचा दाखला, तहसीलदारांचा वारस दाखला, 100 रुपयांच्या स्टॅम्पवर शेअरवर्ग होणार आहे. त्याचे प्रतिज्ञापत्र, 100 रुपयांच्या स्टॅम्पवर वारसांचे संमतीपत्र, सोसायटीचा येणे - देणेबाकीचा दाखला, मृत्यु  नोंद, इरिगेशन येणेबाकी दाखला, प्रवेश फी व शेअर ट्रान्सफर अर्ज, शेअर सर्टीफीकेट अगर त्याचा दाखला मिळण्यासाठीचा अर्ज ही कागदपत्रे 31 डिसेंबरच्या आत रजिस्टर पोस्टाने कारखान्याचे अध्यक्ष व एम.डीं.च्या नावे पाठवावीत. संबंधीत अर्जांची झेरॉक्स व कागदपत्रांची झेरॉक्स स्वतःजवळ ठेवावी. त्यानंतरही निर्णय झाला नाही तर त्यांनी ही कागदपत्रे आमच्याकडे द्यावी आम्ही मृत सभासद शेअर ट्रान्सफर साठी प्रयत्न करु.’’  

प्रा. अनिल पाटील, सुरेंद्र पाटील, जगन्नाथ पाटील, अरविंद पाटील, पृथ्वीराज पाटील उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com