डॉ. दीक्षित यांच्या रंकाळा प्रदक्षिणा उपक्रमात शेकडो कोल्हापूरकरांचा सहभाग

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 सप्टेंबर 2019

उत्तम आरोग्यासाठी, शरीर निरोगी असणे आवश्यक आहे. शुद्ध पाणी, शुद्ध परिसर पाहिजे त्यासाठी कोल्हापूर शहर प्लास्टिक मुक्त करण्याचा निर्धार महानगरपालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी रंकाळा येथे व्यक्त केला.

कोल्हापूर - उत्तम आरोग्यासाठी, शरीर निरोगी असणे आवश्यक आहे. शुद्ध पाणी, शुद्ध परिसर पाहिजे त्यासाठी कोल्हापूर शहर प्लास्टिक मुक्त करण्याचा निर्धार महानगरपालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी रंकाळा येथे व्यक्त केला.

डॉ. जगन्नाथ दीक्षित यांच्या अभियानांतर्गत आयोजित केलेल्या पाच किलोमीटर चाला, रंकाळा प्रदक्षिणा या उपक्रमात शेकडो कोल्हापूरकर सहभागी झाले. याप्रसंगी डॉ. कलशेट्टी म्हणाले, स्वच्छ व सुंदर कोल्हापूरसाठी शहर प्लास्टिक मुक्त होणे आवश्यक आहे. प्रत्येकाने प्लास्टिक मुक्तीसाठी पाच लोकांना प्रवृत्त करावे.    

जिल्हाधिकारी दौलत देसाई म्हणाले, चालणे हा सर्वांग सुंदर व्यायाम आहे. त्यामुळे उत्तम आरोग्यासाठी चालणे महत्त्वाचे आहे. सकाळी साडेसहापासून उपक्रमासाठी लोकांची गर्दी झाली. प्रारंभी युनिक ऑटोमोबाईल्सचे राहुल व विशाल चोरडिया यांनी स्वागत केले. सुधर्म वाझे यांनी उपक्रमाचा हेतू स्पष्ट केला.
साडेसात वाजता अंबाई टँक येथून उपक्रमास सुरुवात झाली. रंकाळा चौपाटी मार्गे रंकाळा टॉवर, राजकपूर पुतळा, सरसेनापती संताजी घोरपडे चौक ते परत अंबाई टॅक अशी पाच किलोमीटर अंतराची रंकाळा प्रदक्षिणा घालण्यात आली. उपक्रमात आठ वर्षाच्या आशिष पोवार या मुलापासून 81 वर्षाचे बंडू माने यांच्यासह शेकडो कोल्हापूरकर सहभागी झाले होते.

याप्रसंगी युवक नेते ऋतुराज पाटील, स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख, नगरसेवक संजय मोहिते, आशिष ढवळे, राजसिंह शेळके, अजय कोराणे आदी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr Jagannath Dixit Round to Rankala event