'शहाण्यांनीच बुद्धी गहाण टाकणं अस्वस्थ करते '

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 मार्च 2017

सांगली - "गुणवत्ता जन्मानेच येते असे नव्याने बिंबवण्यात यश आलेले दिसते. हे शहाण्याचे बुद्धी गहाण टाकणे अस्वस्थ करणारे आहे. त्यांना शहाणे कसं करायचं, हा आज सर्वांत मोठा प्रश्‍न आहे', असे मत ज्येष्ठ विचारवंत डॉ. एन. डी. पाटील यांनी आज व्यक्त केले. विश्‍वजागृती मंडळाच्या वतीने त्यांना आमदार गणपतराव देशमुख यांच्या हस्ते आज सांगली भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. महापौर हारुण शिकलगार अध्यक्षस्थानी होते. सुमारे तासभर त्यांनी वादळी, संघर्षमय आयुष्यातील काही पैलूंना स्पर्श करताना जीवनपटच उलगडला. 

ते म्हणाले, ""कर्मवीर अण्णांच्या परीसस्पर्शाने महाराष्ट्रातील कैक पिढ्यांचे सोने झाले. ते भाग्य लाभलेला मी एक. कष्टकरी वर्गातील शेकडोंनी आयुष्यभर मला बळ दिले. त्यांचा या हारफुलांवर खरा अधिकार आहे. आयुष्याच्या या टप्प्यावर मागे वळून पाहताना मला प्रकर्षाने जाणवलेली गोष्ट म्हणजे स्वतंत्र भारताचा हा प्रवास देवाच्या आळंदीला नव्हे, तर चोराच्या आळंदीच्या दिशेने झाला आहे.'' 

ते म्हणाले, ""जिल्हाधिकाऱ्यांनी परवा आष्ट्याजवळ "स्मशानात एक रात्र' असा उपक्रम "अंनिस'च्या वतीने घेतला. मीही गेलो. दोन अडीच हजार लोक गोळा झाले. तीस वर्षांपूर्वी नरेंद्र दाभोलकरांसह आम्ही पनवेलपासून पार वेंगुर्ल्यापर्यंत अशीच एक यात्रा गावोगावी काढली. त्या वेळी सायंकाळी आम्ही गावात भाषण करायचो आणि भूत नसते हे सिद्ध करण्यासाठी रात्री स्मशानात झोपायला चला, असे आवाहन करायचो. चार दोन लोकसुद्धा आमच्याबरोबर यायचे नाहीत. हा बदल मला समाजात झालेला दिसतो. त्याच वेळी बुद्धी गहाण टाकलेल्या डोक्‍यांची गर्दीही मला सर्वत्र दिसते.'' विचारवंत कार्लाईल म्हणाला, ""मला जग शहाणे करायचे आहे. मी काय करू?'' त्यांच्या ज्येष्ठांनी त्याला सांगितलं, ""तू एकटा शहाणा हो म्हणजे या जगातल्या मूर्खांची संख्या एकाने कमी होईल.''

Web Title: Dr N D patil