धनंजय, इकडं-तिकडं नादाला लागू नका - डॉ. कदम

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 एप्रिल 2017

कोल्हापूर - कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येकाची नाडी मला माहीत आहे; म्हणूनच धनंजय, इकडं-तिकडं कुठे नादाला लागू नका, असा वडीलकीचा सल्ला आज काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. पतंगराव कदम यांनी राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक यांना दिला. 

संघर्ष यात्रेच्या निमित्ताने दसरा चौकात झालेल्या सभेत डॉ. कदम बोलत होते. 

कोल्हापूर - कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येकाची नाडी मला माहीत आहे; म्हणूनच धनंजय, इकडं-तिकडं कुठे नादाला लागू नका, असा वडीलकीचा सल्ला आज काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. पतंगराव कदम यांनी राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक यांना दिला. 

संघर्ष यात्रेच्या निमित्ताने दसरा चौकात झालेल्या सभेत डॉ. कदम बोलत होते. 

खासदार महाडिक यांची अलीकडची राजकीय वाटचाल जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली आहे. पक्षाचे वरिष्ठ नेते कोल्हापुरात आल्यानंतर श्री. महाडिक यांची व्यासपीठावर दिसणारी उपस्थिती, त्यानंतर पक्षविरोधी भूमिका यावर राजकीय तर्कवितर्क लढवले जात आहेत. या पार्श्‍वभूमीवर डॉ. कदम यांनी श्री. महाडिक यांच्या वर्मावरच बोट ठेवून त्यांना सल्ला दिला. डॉ. कदम म्हणाले, ‘‘या जिल्ह्याशी मी १५ वर्षे संपर्कात आहे. एखादा निर्णय मी घेतला तर इतरांनी चिडीचूप व्हायचे अशी परिस्थिती होती. प्रत्येकाची नाडी मला माहीत आहे. आता जे दिसते ते सगळं तात्पुरते आहे. सुरवातीला ते बरं वाटतंय. ते हिताचे नाही. यशवंतराव चव्हाण म्हणायचे, की घर कधी सोडायचे नाही. म्हणूनच धनंजय, तुम्ही इकडं-तिकडं कुठं नादाला लागू नका. एकमेकांच्या खोड्या काढायच्या नाहीत, हे मी पुन्हा एकदा सांगतो.’’

ते म्हणाले, ‘‘आज सर्वपक्षीय नेते एका व्यासपीठावर बघून बरे वाटले; पण व्यासपीठावरून खाली उतरल्यावर एकमेकांचे हात दाबायचेही बंद झाले पाहिजे. सगळे एकत्र राहिले तर आघाडीचे सरकार आणणे अवघड नाही. जे जे ठरवाल ते करून दाखवण्याची हिंमत ठेवा. या जिल्ह्याचा बाणेदारपणा कायम ठेवा. आपण सर्वांनी मिळून जिद्दीने पुढे गेले पाहिजे.’’

मी, मुलगा प्रचारात होतो
२०१४ ची लोकसभा निवडणूक दोन्ही काँग्रेसने एकत्र लढवली. त्यात खासदार धनंजय महाडिक हे राष्ट्रवादीचे उमेदवार होते. आमदार सतेज पाटील यांच्याशी असलेले त्यांचे मतभेद मिटवण्यात डॉ. कदम यांनीही पुढाकार घेतला. आजच्या सभेत डॉ. कदम यांनी मी व माझा मुलगा तुमच्या प्रचाराला आलो होतो, अशी आठवण करून देताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. 

तटकरेंचाही टोला
डॉ. कदम यांच्या भाषणाचा संदर्भ घेऊन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही श्री. महाडिक यांना टोला लगावला. ते म्हणाले, ‘‘कदमसाहेब, कुणाला कुणाचा नाद करायचा असेल तर करू द्या. कोण हात दाबत असेल तर तेही दाबू द्या. शेतकऱ्यांना सरकारच्या नादाला लावल्याशिवाय आपण मात्र स्वस्थ बसायचे नाही, एवढे लक्षात ठेवा.’

Web Title: dr. patangrao kadam talk to dhananjay mahadik