मनुष्य घडविणे हेच दयानंद शिक्षण संस्थेचे ध्येय- डॉ. सुरी

Dr. Poonam Suri
Dr. Poonam Suri

नीतिमूल्ये जपणारा माणूस समाजात परिवर्तन घडवू शकतो. परिवर्तन घडविण्याची "डीएव्ही'मध्ये क्षमता आहे. संस्थेच्या देशभरात 914 शाखा आहेत. 60 हजार शिक्षक कार्यरत असून 20 लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. संस्थेमार्फत केवळ विद्यार्थी नव्हे तर "मनुष्य' घडविण्याचे काम अविरत केले जाते, असे दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पद्मश्री डॉ. पूनम सुरी यांनी कॉफी विथ सकाळ उपक्रमादरम्यान सांगितले. 

संस्थेचा लोकहितवादी दृष्टिकोन पाहूनच एखाद्या खासगी आस्थापनेला शाळा सुरू करायची असेल तर ते सर्वप्रथम "डीएव्ही'ला प्राधान्य देतात. उत्तर भारतातील नक्षलवादी क्षेत्रात 74 शाळा शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या होत्या. त्या "डीएव्ही'ने चालवायला घेतल्या आणि आता त्या ठिकाणी 50 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. हे करीत असताना अनेक अडचणी येतात, मात्र "मुश्‍कील पडी तो क्‍या मुश्‍कील कुशा तो है, अरे सर पडी तो क्‍या, सर पर खुदा तो है' या सुभाषितानुसार आमच्या संस्थेचे काम सुरू असते, असेही डॉ. सुरी म्हणाले. 

देशाने घ्यावा सोलापूरचा आदर्श 
सोलापूर शहर बहुभाषिक आहे. या ठिकाणी विविधता असूनही एकात्मतेचे सुंदर दर्शन घडते. बहुभाषिकता असूनही सर्व जाती-धर्माचे लोक येथे गुण्यागोविंदाने राहतात. या शहरापासून देशानेच खूप काही शिकण्यासारखे आहे. देशातील अनेक मोठ्या शहरांमध्ये विविधता असली तरी, सोलापूरसारखी एकात्मता दिसून येत नाही. देशातील सर्वांनी सोलापूरचा आदर्श घेतला तर हा देश निश्‍चितच सुजलाम्‌ सुफलाम्‌ होईल. आपल्या देशामध्ये विविध जाती, धर्म असले तरी, आधी मी भारतीय आणि नंतर महाराष्ट्रीयन, पंजाबी, गुजराती ही भावना लोकांमध्ये रुजली आहे. सोलापुरात केवळ महाराष्ट्रीयनच नव्हे तर मूळच्या कर्नाटक, आंध्र प्रदेशमधील लोकांचीही वस्ती मोठ्या प्रमाणात आहे. ही बहुभाषिकता निश्‍चितच देशासमोर आदर्श आहे. 

सोलापुरात "मिनी डीएव्ही' 
निजामाच्या विरुद्ध सत्याग्रह सुरू झाला होता, त्यावेळी सोलापुरात दयानंद संस्थेची उभारणी झाली. महात्मा आनंद स्वामीजींच्या पुढाकारातून विजयी निशाण म्हणून या संस्थेची सोलापुरात उभारणी झाली. 1886 मध्ये ज्या हेतूने दयानंद संस्थेची स्थापना झाली तो हेतू सोलापुरात साध्य होत असल्याचे दिसून येते. येथील सर्वच लोकांनी संस्थेच्या विकासासाठी खूप चांगले प्रयत्न केले आहेत. त्यामुळे सोलापुरात "मिनी डीएव्ही' असल्याचा अनुभव येतो. 

हजारो "सेलिब्रेटी' "दयानंद'चे विद्यार्थी 
दयानंद शिक्षण संस्थेतून अनेक मोठ्या लोकांनी शिक्षण घेतले आहे. आतापर्यंत सुमारे 40 लाख विद्यार्थी शिकून पुढे गेले. त्यामध्ये काही पंतप्रधान, काही मुख्यमंत्री, काही सैन्यदलात अधिकारी, राजकारण्यांचा समावेश आहे. अभिनेता शाहरुख खान, क्रिकेटपटू कपिल देव, महेंद्रसिंग धोनी, चित्रपट दिग्दर्शक विधु विनोद चोपडा इतकेच नव्हे तर, लोकसभेचे माजी सभापती शिवराज पाटील-चाकूरकर, सोलापूरचे सुपुत्र आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेही "दयानंद'चेच विद्यार्थी आहेत. 

सोलापूरचा चेहरामोहरा निश्‍चित बदलेल 
सोलापूर शहराचा स्मार्ट सिटीत समावेश झाला याचा मलाही आनंद आहे. सध्या स्मार्ट सिटीनुसार सुविधा दिसत नसल्या तरी विविधतेत एकतेमुळे देशात स्मार्ट असलेले हे शहर भविष्यात मूलभूत सुविधांच्या दृष्टीनेही निश्‍चित स्मार्ट होईल आणि जगासमोर एक नवा अध्याय ठेवील, असा विश्‍वासही डॉ. सुरी यांनी व्यक्त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com