डॉ. प्रकाश आंबेडकर - आवाडे यांच्या भेटीत राजकीय खलबते

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 सप्टेंबर 2019

इचलकरंजी - बहुजन वंचित आघाडीचे नेते डॉ. प्रकाश आंबेडकर व माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी आज स्वतंत्रपणे राजकीय विषयावर चर्चा केली. श्री. आवाडे हे इचलकरंजी मतदारसंघात अपक्ष म्हणूनच निवडणूक लढविणार असल्याचे यापूर्वीच स्पष्ट केले असून हातकणंगले आणि शिरोळ तालुक्‍यातील राजकीय परिस्थिती व व्यूहरचनेबाबत चर्चा झाल्याचे समजते.

इचलकरंजी - बहुजन वंचित आघाडीचे नेते डॉ. प्रकाश आंबेडकर व माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी आज स्वतंत्रपणे राजकीय विषयावर चर्चा केली. श्री. आवाडे हे इचलकरंजी मतदारसंघात अपक्ष म्हणूनच निवडणूक लढविणार असल्याचे यापूर्वीच स्पष्ट केले असून हातकणंगले आणि शिरोळ तालुक्‍यातील राजकीय परिस्थिती व व्यूहरचनेबाबत चर्चा झाल्याचे समजते.

माजी मंत्री श्री. आवाडे यांनी काँग्रेस जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. चार दिवसापूर्वी झालेल्या हातकणंगले आणि शिरोळ तालुक्‍यातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्यांनी इचलकरंजीबरोबरच शिरोळ व हातकणंगले विधानसभा मतदारसंघात आपण उमेदवार उभे करणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघात राजकीय समीकरण बदलण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

दोन्हीही मतदारसंघात आघाडी आणि युतीच्या उमेदवार घोषणेनंतर पुन्हा राजकीय फेरबदल होण्याचे संकेत आहेत. यावर श्री. आवाडे यांनी नजर ठेवली असून बदलत्या घडामोडीत नवी रचना काय करता येईल याबाबत त्यांनी लक्ष ठेवले आहे.

दरम्यान लोकसभा निवडणूकीत हातकणंगले आणि शिरोळ तालुक्‍यात वंचित आघाडीने चांगली मते घेतली. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघात वंचित आघाडीचा प्रभाव यावेळीही दिसून येणार आहे. विशेषत: हातकणंगले विधानसभा मतदारसंघात बौध्द समाजाची मते मोठ्या प्रमाणात असून ही मते निर्णायक ठरणार आहेत. या दोन मतदारसंघातील राजकीय व्यूहरचनेबाबत आजच्या या भेटीत चर्चा झाल्याचे समजते. हातकणंगले आणि शिरोळमध्ये वंचित आघाडी व आवाडे गट एकत्र आल्यास वेगळेच चित्र दिसणार आहे. त्यामुळे आजच्या बैठकीनंतर पुढील काय घडामोडी घडतात याकडे लक्ष लागून राहिले आहे.

यावेळी श्री. आवाडे यांनी श्री. आंबेडकर यांचा सत्कारही केला. याप्रसंगी नवनाथ पडळकर, अनिल म्हमाणे, शरद कांबळे आदींची उपस्थिती होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr Prakash Ambedkar Prakash Awade meeting