पोरांना त्यांच्या कलानं घडू द्या!

पोरांना त्यांच्या कलानं घडू द्या!

कोल्हापूर - ‘पोरांना त्यांच्या कलानं घडू द्या. आपलीच मतं कशाला त्यांच्यावर लादता ? ती जर त्यांच्या कलानं घडली; तर देशाचं भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे,’ असे स्पष्ट मत आज ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, पद्मश्री डॉ. रवींद्र कोल्हे यांनी व्यक्त केले.

संजय घोडावत ग्रुप स्टार एअर प्रस्तुत ‘ऊर्जा - संवाद ध्येयवेड्यांशी’ या संवादमालिकेचे तिसरे पुष्प आज त्यांनी गुंफले. यानिमित्ताने मेळघाटातील त्यांचा साडेतीन दशकांचा संघर्ष उलगडला आणि उत्स्फूर्त गर्दीत भारावून गेलेल्या कोल्हापूरकरांनी त्यांच्या कार्याला टाळ्यांच्या गजरात सलामही केला. दरम्यान, शिवाजी विद्यापीठाच्या लोककला केंद्रात ही मालिका रंगली असून, ‘सकाळ माध्यम समूह’ आणि 
शिवाजी विद्यापीठाच्या संयुक्त सहकार्याने या उपक्रमाचे आयोजन केले आहे. 

डॉ. रवींद्र आणि डॉ. स्मिता कोल्हे हे दांपत्य आणि त्यांचा मेळघाटातला संघर्ष हा साऱ्यांनाच प्रेरणा देणारा. काट्या-कुट्यांचा रस्ता तुडवत, असंख्य चटके खात त्यांनी या परिसरातील आदिवासींसाठी केवळ आरोग्य सुविधाच पुरविल्या नाहीत; तर साऱ्या परिसरात नंदनवन फुलवले. मात्र, त्यांतील एकेक टप्पा प्रत्येकालाच अंतर्मुख व्हायला लावणारा आणि बरेच काही शिकवून जाणारा. साहजिकच तब्बल दोन तास रंगलेल्या या संवादातून कितीही अडचणी आल्या, तरी पाय घट्ट रोवून उभं राहण्याचा आत्मविश्‍वास जागवला गेला. मुलाखतकार मिलिंद कुलकर्णी यांनी हा संवाद खुलवला.    

डॉ. कोल्हे यांच्या शैक्षणिक प्रवासापासून संवादाला प्रारंभ झाला. शाळेत असतानाच गुरू असे भेटले, की ते दुसरा अनवाणी चालत असेल तर स्वतःच्या पायातील चप्पल त्याला देऊन स्वतः अनवाणी जात. हाच संस्कार मनावर रुजत गेला. महात्मा गांधी, विनोबा भावे, संत गाडगेबाबा हे तर त्यांचे आयडॉल. त्याचमुळे ‘एमबीबीएस’ झाल्यानंतर त्यांनी थेट मेळघाटात बैरागडला जाऊन तेथे केवळ एक रुपयात वैद्यकीय सुविधा देण्याचा निर्णय घेतला.

ते सांगतात, ‘‘सुरवातीला रुग्ण येतील की नाही, खात्री नव्हती. वजन मोजण्याचं मशिन बाहेर काढलं आणि साऱ्यांची वजनं फुकट करून त्यांच्यात आरोग्यविषयक जागृती सुरू केली. कैलास नावाच्या एका मुलाच्या मृत्यूनंतर त्याच्या आईने ‘माझ्यासाठी नव्हे; तर रात्रभर तुला जिवदान मिळावं, यासाठी मेहनत घेणाऱ्या या डॉक्‍टरसाठी तर तू जगायला हवा होतास...’ ही प्रतिक्रिया दिली. पुढे एकेक रुग्ण बरा होत गेला आणि पुढे लोकांचाच विश्‍वास इतका निर्माण झाला, की तेच औषधे आणण्यासाठीही पैसे देऊ लागले.’’

सुरवातीच्या वर्षभरात केवळ दीड रुपयाची इंजेक्‍शन्स उपलब्ध न झाल्यानं सहाजणांचा मृत्यू झाला. त्यामुळे ‘एमडी’ होण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, विवाह झाला आणि पत्नीसह ते पुन्हा बैरागडला आले. संघर्षाचं एक नवं पर्व पुन्हा सुरू झालं. बैलानं शिंग मारलं म्हणून पोटाच्या बाहेर आलेलं आतडं नीट धुऊन जागच्या जागी बसवून टाके घालून शिवायचं. चुलीवर पाऊस पडायला लागला, की छत्री घेऊन स्वयंपाक करायचा... हा सारा अनुभव घेत स्मिताताईही पुढे वैद्यकीय सेवेत आल्या.

त्याच्याही पुढे जाऊन त्यांनी बैरागडला शेतीही केली. दगड-धोंड्यांच्या जमिनीत चांगलं पीक काढून दाखवलं. रामनवमीच्या उत्सवाला वर्षानुवर्षे सुरू असलेली कोंबडी व बकऱ्यांच्या बळीची प्रथा बंद पाडली. अनिष्ट प्रथा नष्ट करण्यासाठी तर या दांपत्यानं अनेकदा अपमानही सहन केले. पण, न दमता त्या मोडून काढल्या. त्यासाठी प्रसंगी पोलिस, कोर्ट-कचेऱ्याही कराव्या लागल्या. मात्र, या साऱ्या प्रवासातील त्यांनी स्वतःच्या मुलाला बैरागडमध्येच दिलेला जन्म आणि त्यावेळी आलेल्या अडचणींतून मार्ग काढत मुलाला मिळालेलं जिवदान, हा अनुभव ऐकताना साऱ्यांच्याच डोळ्यांच्या कडा ओलावल्या. मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी त्यांनी केलेली एक रुपयाची मनीऑर्डर आणि मिळालेल्या पोचपावतीतून उघडकीस आणलेल्या भ्रष्टाचाराचा अनुभवही थक्क करणारा ठरला.  

‘सकाळ माध्यम समूहा’चे संपादक संचालक श्रीराम पवार, शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, संजय घोडावत विद्यापीठाचे संचालक डॉ. विवेक कुलकर्णी, तनिष्क शोरूमचे प्रसाद कामत यावेळी उपस्थित होते.

डॉ. कोल्हे सांगतात..

  • कुपोषित मुलांवरील संशोधन जगभरात गेलं आणि या प्रश्‍नाकडं पाहण्याचा सर्वांचा दृष्टिकोनच बदलला.
  • अनेक अडचणी आल्या. संघर्षाला सामोरे जावे लागले. पण, तत्त्वांशी तडजोड कधीच केली नाही.
  • मेळघाटात शेतकरी आत्महत्या करीत नाहीत. कारण तिथे आता तरुण शेतकरी स्वतः घाम गाळून शेती फुलवताहेत आणि ती साऱ्यांसाठीच अनुकरणीय ठरते आहे.
  • मेळघाटात आता आर्थिक मदत नकोच आहे. तुम्ही तिथे या. तिथली सुख-दुःखं जाणून घ्या आणि तुमच्या परीने जे योगदान देता येईल ते द्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com