डॉ. शरद जगताप बनलेत "हाडांचे कैवारी' 

jagtap
jagtap

सातारा : बस स्थानकासमोरील भिकाऱ्याचा अपघात... पायाचे हाड मोडले... कोणी तरी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले... तरीही त्याला सिव्हिल हॉस्पिटलचा रस्ता दाखविला नाही... केवळ सेवाभावी वृत्तीतून इलिझारो या रशियन पद्धतीच्या महागड्या तंत्रज्ञानाद्वारे उपचार केले... पुढे सहा महिने औषधोपचार दिले... 70 हजार रुपये बिल झाले असतानाही त्याची फिकीर केली नाही. 14 वर्षे गरीबांवर अत्यंत माफक दरात उपचार करून खरंच ते "हाडांचे कैवारी' बनलेत. 

गोरगरिबांना आजार झाले, तर ते अंगांवरच रेटतात. सहन होईना तरच दवाखान्याची पायरी चढतात. कारण धास्ती असते, ती फाटक्‍या खिशाची. पण, साताऱ्यातील डॉ. शरद जगताप हे जसे श्रीमंतावर उपचार करतात, तसेच गरिबांवरही. "एमबीबीएस डीएनबी ऑर्थोपेडिक'चे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी 2004 मध्ये गोडोलीत हॉस्पिटल सुरू केले.

"उंबरठयाच्या आत आला तो माझा' या भावनेने उपचार करत असल्याने आज त्यांच्याकडे मोलमजुरी, गवंडी, सेंट्रिंग, एमआयडीसीतील कामगार, धुणीभांडी करणाऱ्या महिला वैद्यकीय उपचार घेण्यास विश्‍वासाने जातात. 
रुग्णसेवा हा उद्देश ठेऊनच वैद्यकीय क्षेत्रात पाऊल ठेवल्याने "स्टेटस्‌' सांभाळ्यापेक्षा "स्टेट फॉरव्हर्ड' राहण्यात ते धन्यता मानतात. समाजाचे मीच देणं लागतो, या कृतज्ञतेतून योग्य दरात उपचार करत असल्याची प्रचिती अनेकांना येते. एका शाळेतील विद्यार्थ्याचे खुब्यातील हाड मोडले. वडील व्यसनी असल्याने मुलाला आई घेऊन आली. अठराविश्‍व दारिद्य्र असलेल्या आईला वैद्यकीय खर्च देणे अशक्‍यच होते. तेव्हा शाळेने एक पाऊल पुढे येत औषधांचा खर्च दिला, तर डॉ. जगताप यांनी उपचाराचा खर्च घेतला नाही. 

शिबिर, व्याख्यानांतूनही रुग्णसेवा 
हाडांची घनता तपासणीसाठी काही ठिकाणी सुमारे एक हजार रुपये खर्च येतो. मात्र, डॉ. जगताप हे गेली सहा वर्षे वर्षातून दोनदा हाडांची घनता तपासणी शिबिर घेतात. त्याचा सुमारे 1800 जणांनी मोफत लाभ घेतला आहे. रोटरी क्‍लब, सामाजिक संस्थांमार्फत ते ग्रामीण भागातही मोफत व्याख्याने देतात. मेडिकल कंपन्यांकडून मिळत असलेली औषधे ते सामाजिक संस्थांना देतात. महाराष्ट्र ऑर्थोपेडिक असोसिएशनच्या महाबळेश्‍वर येथील राज्य परिषदेचे त्यांनी सचिवपदही सांभाळले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com