पूरग्रस्त प्रत्येक कुटूंबाला 15 हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान द्यावे - डॉ. विश्वजित कदम

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

राज्य शासनाने प्रत्येक पूरग्रस्त कुटूंबाना 15 हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान व पिकांना भरघोस नुकसानभरपाई देणेबाबत निर्णय तात्काळ जाहीर करावा.अशी मागणी आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी पत्रकारांशी येथे बोलताना केली.

कडेगाव - सांगली जिल्ह्यात सर्वत्र पूरस्थिती गंभीर झाली असून नदी काठावरील सर्व गावांना पुराच्या पाण्याचा वेढा पडला.त्यामुळे लाखोंच्या संख्येने पूरग्रस्त विस्थापित झाले असून महापुरामुळे त्यांची कोट्यवधींची हानी झाली आहे.या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने प्रत्येक पूरग्रस्त कुटूंबाना 15 हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान व पिकांना भरघोस नुकसानभरपाई देणेबाबत निर्णय तात्काळ जाहीर करावा.अशी मागणी आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी पत्रकारांशी येथे बोलताना केली. 

ते म्हणाले, कृष्णा व वारणा काठी नदीचे पाणी अनेक गावात शिरले आहे.तर पलूस तालुक्यात कृष्णा नदीला आलेल्या महापुरामुळे येथील पूरग्रस्तांना भारती विद्यापीठ व सोनहिरा कारखान्याच्या माध्यमातून सर्वतोपरी मदत केली जात आहे. येथील सर्व पूरग्रस्तांना राहण्याची व जेवणाची सोय करण्यात आली आहे. तसेच भारती बझारच्यावतीने विस्थापितांना चादरींचे वाटप करण्यात येत आहे. सोनहिरा कारखान्याच्या वतीने जनावरांसाठी चारा छावण्या सुरु करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये हजारावर जनावरे दाखल झाली आहेत. तसेच पूरस्थितीमध्ये साथीचे आजार पसरु नयेत म्हणून भारती हॉस्पिटलच्या डॉक्टरांचे पथक नदी काठावरील प्रत्येक गावात जावून पूरग्रस्त लोकांना आरोग्य सेवा देत आहेत.

श्री. कदम म्हणाले, अंकलखोप, भिलवडी, आमणापूर, बुर्ली, तुपारी, धनगाव, नागठाणे, संतगाव, सुर्यगाव, औदुंबर आदी कृष्णा नदी काठावरील पलूस तालुक्यातील चौदा गावातील लोकांना मोठ्या प्रमाणात महापुराचा फटका बसला आहे. त्यांना भारती विद्यापीठ व सोनहिरा कारखान्याच्या माध्यमातून सर्वतोपरी मदत देण्यासाठी व कोणी मदतीपासून वंचित राहू नये यासाठी प्रत्येक पूरबाधित गावांचा दौरा सुरु आहे.एकही पूरग्रस्त कुटुंब मदतीपासून वंचित राहणार नाही याची काळजी आम्ही घेतली आहे.

सन 2005 मध्ये असाच मोठा पूर आला होता. त्यावेळी पालकमंत्री असलेले डॉ. पतंगराव कदम यांनी पूरग्रस्तांना राज्य शासनाकडून सर्वतोपरी व भरघोस मदत केली. बाधित पिकांची नुकसानभरपाई दिली. तसेच प्रत्येक पूरग्रस्ताला एक हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान मिळवून दिले, असेही श्री कदम यांनी सांगितले.

2005 पेक्षाही आजची पूरस्थिती गंभीर आहे. नदीकाठी लोकांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे आताही राज्य शासनाने पूर्वीप्रमाणेच पूरग्रस्तांना मदत करावी. तसेच याबाबत तात्काळ घोषणा करावी. तर पूरग्रस्तांना मदत करण्याबाबतचा 65 व 45 रुपयांचा शासन निर्णय बदलावा व प्रत्येक पूरग्रस्त कुटुंबाला किमान 15 हजार रुपये सानुग्रह अनुदान व पिकांना भरघोस नुकसानभरपाई देणेबाबत निर्णय घ्यावा. तसेच महसूल प्रशासन व आरोग्य विभागाने पूरग्रस्तांना सर्वतोपरी सहकार्य करावे. तर सेवाभावी संस्थांनीही पूरग्रस्तांना शक्य तेवढी मदत करावी.

महापूराची स्थिती गंभीर होत चालली आहे. तरीही पलूस तालुक्यातील नदीकाठावरील गावातील अनेक लोक अजूनही बाहेर पडले नाहीत. त्यांनी तात्काळ पूरातून सुरक्षितस्थळी बाहेर पडावे.

-  डॉ. विश्वजित कदम, आमदार, पलूस - कडेगाव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr. Vishwajeet Kadam demand in Press conference