सख्या भावंडांसह चौघांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 मार्च 2017

मुळीकवाडीतील विहिरीत पोहताना बुडाल्याने दुर्घटना
सातारा - रहिमतपूर रस्त्यावरील तासगावशेजारील मुळीकवाडी (ता. सातारा) येथे दोन सख्या भावंडासह चार शाळकरी मुलांचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना आज घडली. शाळा सुटल्यानंतर पोहण्यास गेलेल्या या मुलांबाबतची दुर्घटना सायंकाळी उघडकीस आली.

मुळीकवाडीतील विहिरीत पोहताना बुडाल्याने दुर्घटना
सातारा - रहिमतपूर रस्त्यावरील तासगावशेजारील मुळीकवाडी (ता. सातारा) येथे दोन सख्या भावंडासह चार शाळकरी मुलांचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना आज घडली. शाळा सुटल्यानंतर पोहण्यास गेलेल्या या मुलांबाबतची दुर्घटना सायंकाळी उघडकीस आली.

राजरतन सुनील कांबळे (वय 11), करण सुनील कांबळे (वय 10) या दोन सख्या भावंडासह सिद्धार्थ संतोष कांबळे (वय 10), अक्षय विश्‍वास काळभोर (वय 11) (सर्व रा. मुळीकवाडी, ता. सातारा) अशी मृत मुलांची नावे आहेत. एक मुलगा मुळीकवाडीतील जिल्हा परिषद शाळेत, तर तीन मुले तासगाव येथील संजय भैरवनाथ काळे विद्यालयात शिक्षण घेत होती. राजरतन, सिद्धार्थ, अक्षय हे इयत्ता सहावीत, तर करण हा पाचवीत शिकत होता. शाळा सुटल्यानंतर सकाळी 11 ते 12 च्या सुमारास हे चौघे खेळण्यासाठी घराबाहेर गेले. मुळीकवाडीपासून सुमारे 100 मीटर अंतरावरील कुरणाचा वडा शेतातील किरण नावडकर यांच्या विहिरीवर ही मुले पोहण्यास गेली. या विहिरीला दोन टप्पे असून, खालच्या टप्प्यावर मुलांनी कपडे काढली. ही मुले पोहण्यास गेल्याची माहिती कुटुंबीयांना नव्हती. मुले इतका वेळ कुठे आहेत, हे पाहण्यासाठी सायंकाळी पाचच्या सुमारास राजरतनची मावशी शेताकडे गेली. त्या वेळी विहिरीच्या खालच्या टप्प्यावर मुलांची कपडे दिसली; परंतु मुले दिसली नाहीत. त्याची माहिती इतरांना दिल्यानंतर शोध सुरू झाला. ग्रामस्थ व पोलिसांनी शोधाशोध केली असता चारही मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय नाळे व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पंचमाना केला. रात्री उशिरा येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात चौघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी आणले होते.

कांबळे कुटुंबावर कोसळली आपत्ती
चार मुलांचा दुर्दैवी अंत झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे. तिन्हीही कुटुंबे शेतमजूर असून, त्यातील सुनील कांबळे यांना दोन मुले होती. सख्या भावांचा मृत्यू झाल्याने या कुटुंबावर आपत्तीच कोसळली. घटना समजताच कुटुंबीयांनी टाहो फोडला.

Web Title: drawn fourth brothers