'जय भीम'चा नारा.. सजला शहर सारा! 

solapur
solapur

सोलापूर - पांढऱ्या आणि निळ्या रंगांचा पोशाख करून आलेले हजारो अनुयायी, निळे झेंडे अन्‌ मंडपही निळाच, प्रत्येकाच्या तोंडी जय भीमचा नारा, विचारांचे धन देणाऱ्या पुस्तकांचे स्टॉल, आनंद व्यक्त करण्यासाठी लाडू वाटप, वही, पेन अन्‌ पुस्तकांचे संकलन, सुरक्षेसाठी पोलिसांचा बंदोबस्त, महिला, ज्येष्ठांसह छोट्यांच्या चेहऱ्यावरही उत्साह.. हे वातावरण आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक आणि पुतळा परिसरातील. बाबासाहेबांच्या 127 व्या जयंती उत्सवाला शनिवारपासून जल्लोषात सुरवात झाली. 22 एप्रिलपर्यंत हा उत्सव चालणार असून शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 

शुक्रवारी रात्री बाराच्या सुमारास शेकडो अनुयायांनी एकत्र येऊन बाबासाहेबांचा जयघोष केला. मेणबत्ती लावून अभिवादन केले. शनिवारी सकाळपासूनच बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी शहरासह आजूबाजूच्या खेड्यांमधून अनुयायी येत आहेत. 

पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सहकार मंत्री सुभाष देशमुख, प्रभारी जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, महापालिका आयुक्त अविनाश ढाकणे, पोलिस आयुक्त महादेव तांबडे, माजी आमदार नरसय्या आडम, ज्येष्ठ नेते राजा सरवदे, राजा इंगळे, सुबोध वाघमोडे, प्रमोद गायकवाड, शिवसेना शहरप्रमुख प्रताप चव्हाण, विष्णू कारमपुरी, बसपा नगरसेवक आनंद चंदनशिवे यांच्यासह मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून बाबासाहेबांना अभिवादन केले.

दिवसभर उन्हातच अनुयायी उत्साहाने अभिवादनासाठी येत आहेत. चौकात हुतात्मा स्मृती मंदिरासमोरील बाजूस पुस्तकांचे स्टॉल लागले आहेत. बाबासाहेबांसह अनेक राष्ट्रपुरुषांची, कायद्याची, इतिहासाची आणि शासकीय योजनांची माहिती देणाऱ्या पुस्तकांची दिवसभरात मोठ्या प्रमाणात विक्री झाली. सामाजिक संस्थांच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात आले. वाहतुकीचे नियोजन आणि सुरक्षेसाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला होता. 

जयंतीनिमित्त शहरातील चौकाचौकांमध्ये बाबासाहेबांच्या प्रतिमांची स्थापना करण्यात आली असून, उत्सव काळात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 

समता सैनिक दलाचे संचलन 
भुजंग गायकवाड, मुकुंद शिवशरण यांच्या नेतृत्वाखाली समता सैनिक दलाच्या सदस्यांनी बाबासाहेबांना मानवंदना दिली. या संचलनात केरू जाधव, शशिकांत कांबळे, आनंद इंगळे, प्रकाश घटकांबळे, राजू गायकवाड, सुचित्रा थोरे, सुनीता गायकवाड, लतिका गायकवाड, सुमित्रा जाधव आदी सहभागी झाले होते. 

विधायक उपक्रम.. 
- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समितीच्यावतीने पुस्तकांसोबतच एक वही, एक पेन संकलनाच्या उपक्रमाला सुरवात करण्यात आली. अध्यक्ष सत्यजित वाघमोडे, डॉ. सायली शेंडगे, अतिष सिरसट, सूरज कदम आदी या उपक्रमात सहभागी झाले आहेत. संकलित केलेली पुस्तके विहारांमध्ये देण्यात येणार आहेत. 

- सत्यशोधक परिवाराच्यावतीने एक वही एक पेन संकलनाचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात विक्रांत गायकवाड, प्रणव पात्रे, अमर कबाडे, विशाल चतुर, सनी शिवशरण, रश्‍मी प्रक्षाळे, नितीन बनसोडे, सुजित घटकांबळे, राकेश घाडगे, रोहित रासे, प्रवीण सुरवसे, प्रशांत गायकवाड, संघपाल घोडकुंबे सहभागी झाले होते. जयंती उत्सवानंतर महापालिका शाळांमध्ये वही आणि पेन विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com