सामाजिक सद्‌भाव टिकवण्याचे आव्हान  - डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर

संजय शिंदे 
बुधवार, 6 जून 2018

सातारा - देशातील सामाजिक सद्‌भाव टिकवण्याचे आव्हान आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर यांनी "सकाळ'शी बोलताना केले. डॉ. दाभोळकर यांनी नुकतेच 81 व्या वर्षात पदार्पण केले. त्यानिमित्ताने साताऱ्यात उद्या (ता. 6) त्यांचा कर्तृत्व गौरव सोहळा होत आहे. त्यानिमित्त विविध विषयांवर त्यांच्याशी साधलेला संवाद... 

सातारा - देशातील सामाजिक सद्‌भाव टिकवण्याचे आव्हान आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर यांनी "सकाळ'शी बोलताना केले. डॉ. दाभोळकर यांनी नुकतेच 81 व्या वर्षात पदार्पण केले. त्यानिमित्ताने साताऱ्यात उद्या (ता. 6) त्यांचा कर्तृत्व गौरव सोहळा होत आहे. त्यानिमित्त विविध विषयांवर त्यांच्याशी साधलेला संवाद... 

प्रश्‍न - देशाची सध्याची सामाजिक, राजकीय स्थिती कशी आहे? 
डॉ. दाभोळकर - देशाला सामाजिक सद्‌भाव आणि सर्वधर्म समभाव नव्हे; तर सर्वधर्म सद्‌भावाची गरज आहे. त्याचा तोल जाणीवपूर्वक बिघडवला जातोय. देश स्वतंत्र झाला त्यावेळी राजेंद्र प्रसाद यांनी या देशात गोहत्याबंदी झाली पाहिजे आणि महात्माजींचे मत तसेच आहे, असे पत्र पंडित नेहरूंना पाठवले. त्यावर पंडित नेहरूंनी राजेंद्र प्रसादांना पत्राद्वारे, "गोहत्या बंदीचा कायदा व्हावा, असे महात्माजींना वाटत नाही. अल्पसंख्याकांना केवळ संरक्षण देऊन चालणार नाही. आपण त्यांचे संरक्षण करत आहोत, ही भावना त्यांच्या मनात स्थिर झाली पाहिजे', असे कळवले होते. वीर सावरकर, स्वामी विवेकानंद आणि पंडित नेहरू यांना गोहत्याबंदी नको होती. ती सध्या आपण करतोय. 

प्रश्‍न - चळवळी घटल्याने युवकांना घडविणारी नवी माध्यमे कोणती? 
डॉ. दाभोळकर - हा यक्षप्रश्‍न आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी "शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा,' हा मंत्र दिला. कारण शिक्षणाने माणूस आर्थिकदृष्ट्या सक्षम होतो. त्यानंतर संघटित होऊन संघर्ष करतो. आज सुशिक्षित बेकारांचे थवे हिंडत असल्याने आपणाला नव्या रचना शोधाव्या लागतील. शिक्षणाची रचनाही स्वयंरोजगाराकडे न्यावी लागेल. 

प्रश्‍न - मूलभूत विज्ञान संशोधनाच्या दृष्टीने जागतिक स्पर्धेत भारत कोठे आहे? 
डॉ. दाभोळकर - आपल्या शास्त्रज्ञांनी स्वातंत्र्यानंतर फारसे काही केलेच नाही. स्वातंत्र्यपूर्व काळात विज्ञानक्षेत्रातील दोन नोबेल पटकावणाऱ्या देशाने स्वातंत्र्योत्तर काळात एकही नोबेल मिळवले नाही. देशात पन्नासवर राष्ट्रीय प्रयोगशाळा आणि अग्रगण्य विद्यापीठे असताना कोणतेही नवे तंत्रज्ञान शोधले नाही. तीन गोष्टी लक्षात घ्या. बोफोर्सबद्दल दिल्लीपासून गल्लीपर्यंत चर्चा रंगली ती पैसे कोणी खाल्ले? किती खाल्ले, याची. एकानेही प्रश्‍न केला नाही की, स्वातंत्र्याला अनेक दशके उलटूनही देशात तोफा का बनत नाहीत? दुसरे जैतापूरमध्ये आपण फ्रान्समधून वारेमाप पैसे देऊन 1650 मेगावॉटच्या सहा अणुभट्ट्या आणणार आहोत. चीनने हजार मेगावॉटची अणुभट्टी पाकिस्तानला भेट दिली. देशात कोणच विचारत नाही की, देशी बनावटीच्या अणुभट्ट्या का उभारत नाही? तिसरे कोयना धरणात दोनदा लेक टॅपिंग परकीय कंपनीने केले. लेक टॅपिंग म्हणजे धरणाच्या भिंतीत उघडता येईल व बंद करता येईल अशी खिडकी बसविणे. किमान पहिल्या वेळचे लेक टॅपिंग बघून दुसऱ्यांदा तरी करायचे होते. थोडक्‍यात, संशोधन क्षेत्राची रचनाच चुकीच्या पद्धतीने केल्याचा परिणाम आहे. 

प्रश्‍न - स्वामी विवेकानंदांचे विचार सध्याच्या स्थितीत उपयुक्त ठरतील का? 
डॉ. दाभोळकर - 120 वर्षांपूर्वी देशातील आजचे आणि उद्याचे प्रश्‍न याची मांडणी आणि त्यांची उत्तरे सांगत हा विचारवंत उभा आहे. त्यामुळे विवेकानंद अधिकाधिक वाचून, समजावून घेत त्यावर भाषणे देत चर्चा घडवून आणण्यात मी मग्न झालोय. विवेकानंद सनातन धर्म आणि परिवर्तनाची चळवळ, विज्ञान आणि धर्म यांच्यामध्ये समन्वय साधतात. विवेकानंदांचे 10 जून 1898 रोजी सरफराज महम्मद हुसेन यांना पाठवलेले पत्र महत्त्वाचे आहे. त्यात ते कळवतात, ""जेथे वेद नाही, कुराण नाही आणि बायबल नाही, अशा ठिकाणी आपणाला मानव जातीला घेऊन जायचंय. मात्र, हे काम वेद, कुराण आणि बायबल यांच्या आधारावरच करावे लागेल.'' 

 

प्लॅस्टिकबंदी करणे हा उपाय नाही. त्याऐवजी त्याचे विघटन करणे, त्याचा पुनर्वापर करून त्याच्या विपरीत परिणामांवर मात करण्याचा मार्ग शोधण्यावर भर द्यावा. 

Web Title: Dr.Dattaprasad Dabholkar interview