सहकाराच्या साथीने दिंडनेर्लीत ठिबक क्रांती 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 मे 2017

इस्राईलचे तंत्रज्ञान 
ठिबक सिंचन योजनेसाठी इस्राईलचे तंत्रज्ञान वापरले आहे. फिल्टर, कंट्रोलसह इतर मशीन इस्राईलची बसविली आहेत. या तंत्रज्ञानाचा शेतीसाठी चांगला फायदा होत आहे. 

कोल्हापूर - राष्ट्रीय जल धोरणाला पोषक आणि पूरक ठरणारी, तसेच शेतकऱ्यांच्या जीवनात जलक्रांती आणण्यासाठी दिंडनेर्ली (ता. करवीर) येथील भैरवनाथ सहकारी पाणीपुरवठा संस्थेने राबवलेली ठिबक सिंचन योजना यशस्वी झाली आहे. 700 एकरांपैकी 400 एकरांवर उसाचे डौलदार पीक घेऊन फोंड्या माळातून उत्पादन घेतले असल्याचे भैरवनाथ सहकारी पाणीपुरवठा संस्थेचे अध्यक्ष व्ही. डी. कुलकर्णी यांनी सांगितले. दिंडनेर्ली येथील ठिबक सिंचन पाहणी दौऱ्याच्या वेळी ते बोलत होते. 

दिंडनेर्ली (ता. करवीर) हे डोंगरावर वसलेले गाव आहे. गावापासून 5 किलोमीटरवर दूधगंगा नदी वाहते. गावातील विहिरी, ओढे, नाले आणि पावसाळ्यात पडणाऱ्या पावसावरच येथील शेती अवलंबून होती. दरम्यान, संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल धोंडिपंत तथा व्ही. डी. कुलकर्णी यांनी 2004 ला भैरवनाथ पाणीपुरवठा संस्थेची स्थापना केली. यामध्ये 150 शेतकरी सभासद आहेत. येथील शेती समृद्ध व्हावी यासाठी 2008 मध्ये पाटाने पाणी देण्यास सुरवात केली. या योजनेतून 200 एकरांतील उसाला व 200 एकरांतील खरीप पिकांना पाणीपुरवठा केला जात होता. शेतकऱ्यांनी ऊस, आंतरपिके घेऊन मिळविलेल्या उत्पन्नातून पाच वर्षांत 4 कोटी 18 लाख रुपयांचे कर्ज व व्याजाची परतफेड केली. या योजनेमुळे शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती झाली आहे. पाटाने दिल्या जाणाऱ्या पाण्याऐवजी ठिबक सिंचनाचा प्रयोग करून जास्तीत जास्त उत्पादन, पाण्याची बचत करून जास्त क्षेत्रावर पीक घेण्याची संकल्पना श्री. कुलकर्णी यांनी मांडली. त्यानुसार संस्थेच्या सर्व सभासदांना ठिबक सिंचनचे महत्त्व पटवून देऊन ही योजना कार्यान्वित केली. 21 नोव्हेंबर 2015 ला या योजनेचे शंभर टक्के काम सुरू झाले. संस्थेच्या 150 शेतकऱ्यांना याचा फायदा होत आहे. पाच-पाच एकराला दिवसाला एकरी दोन ते अडीच तास पाणी दिले जाते. एकाच वेळी सर्व शेती भिजेल आणि त्याचा फायदा होईल, या अपेक्षेने सुरू केलेल्या या योजनेला यश आले आहे. नदीपासून पाच किलोमीटर अंतरावर जलवाहिन्यांद्वारे पाणी आणून सुमारे साडेसहा लाख लिटर क्षमतेच्या पाण्याच्या आरसीसी टाकीत याचा साठा केला आहे. अत्याधुनिक पद्धतीच्या विना गळतीच्या फिनोलेक्‍स पाईपद्वारे स्वयंचलित, संगणकीय, वायरलेस यंत्रणेद्वारे पिकांना पाणी पुरविण्याचा प्रयत्न यशस्वी झाला आहे. या योजनेमुळे शेती तर सुजलाम झालीच आहे; पण पाण्याचा कमी वापर होऊन शेती समृद्ध होत आहे. या वेळी संस्थेचे उपाध्यक्ष दत्तात्रय जाधव, बाजीराव जाधव, आकाराम बोटे, सचिव दत्ता सपकाळ, सोमनाथ पाल, अविनाश पुरोहित, पी. एस. माने, तसेच ए. जी. कासार उपस्थित होते. 

अशी आहे योजना 
* योजनेस 4 कोटी 14 लाखांचा खर्च 
* 150 सभासद 
* 700 एकरांसाठी पाणीपुरवठा 
* 400 एकर ऊस 
* 5 किलोमीटरहून पाणी उपसा 
* ठिबकसाठी इस्राईलचे तंत्रज्ञ 
* संपूर्ण संगणकीय कंट्रोल 

Web Title: Drip revolution