शेळ्या-मेंढ्यांसाठी तत्काळ चारा छावण्या सुरु कराव्यात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 मे 2019

दुष्काळी तालुक्यांमध्ये सध्या भीषण परिस्थिती आहे. त्यातच माॅन्सून महाराष्ट्रात दाखल होण्यास विलंब होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे माण सारख्या दुष्काळी तालुक्यात चारा व पाणी टंचाईची भयावह अवस्था होणार आहे. आत्ताच अनेक ठिकाणी पाण्याचा थेंबही उपलब्ध होत नाही.

दहिवडी : राज्यात भीषण दुष्काळी परिस्थितीमुळे जनावरांसाठी चारा छावण्या सुरु करण्यात आल्या आहेत. पण शेळ्या-मेंढ्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. काल मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रीमंडळ उपसमितीच्या बैठकीत राज्यात प्रथमच दुष्काळी भागात शेळ्या-मेंढ्यांसाठी चारा छावणी सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र जनावरांसाठीच्या चारा छावण्यांसारखा शेळ्या-मेंढ्यांच्या चारा छावण्या सुरु करण्यास चालढकल करु नये अशी अपेक्षा मेंढपाळ करत आहेत.

दुष्काळी तालुक्यांमध्ये सध्या भीषण परिस्थिती आहे. त्यातच माॅन्सून महाराष्ट्रात दाखल होण्यास विलंब होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे माण सारख्या दुष्काळी तालुक्यात चारा व पाणी टंचाईची भयावह अवस्था होणार आहे. आत्ताच अनेक ठिकाणी पाण्याचा थेंबही उपलब्ध होत नाही. जनावरांसाठी चारा छावण्या सुरु झाल्यामुळे दुष्काळात पशुपालकांना दिलासा मिळाला आहे. पण माणमध्ये मोठ्या प्रमाणात असणार्या शेळ्या व मेंढ्यांची अवस्था बिकट झालेली आहे.

चाऱ्याच्या शोधात हिंडणारे मेंढपाळ  आपल्या शेळ्या व मेंढ्या घेवून सध्या जनावरांच्या चारा छावण्यांच्या आधाराला येताना दिसत आहेत. जनावरांना ऊस खायला घातल्यानंतर उरणाऱया हिरवी किंवा वाळलेली पाचट शेळ्या-मेंढ्यांना खायला घालत आहेत. मोठ्या जनावरांच्या उरलेल्या उष्ट्या चार्यावर शेळ्या-मेंढ्यांचा आपली भूक शमविण्याचा प्रयत्न सुरु आहे.

शासनाचा शेळ्या-मेंढ्यांसाठी चारा छावण्या सुरु करण्याचा निर्णय दिलासा देणारा असला तरी तो अंमलात कसा येणार हे पहावे लागेल. नाहीतर निकष पुर्ण करताना छावणी चालक मेटाकुटीस येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नियम व अटी शिथिल करुन शेळ्या-मेंढ्यांसाठी तत्काळ चारा छावण्या सुरु कराव्यात व मेंढपाळांना दिलासा द्यावा.

"माझा सत्तर मेंढरांचा खांडवा आहे. सध्या कुठंच चारा नसल्यामुळे मी जनावरांच्या चारा छावणीवर मेंढरं घेवून येतो व तिथल्या पाचटीवर मेंढरांना चरायला सोडतो."
- धनंजय राजगे, शेवरी, ता. माण

"माझ्या तीस शेळ्या-मेंढ्या आहेत. सध्या दुष्काळामुळे त्यांना जगवणं अवघड झालंय. सरकारनं लवकर शेळ्या-मेंढ्यांसाठी छावण्या सुरु कराव्यात."
- भागवत खरात, शेवरी, ता. माण


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: drought affect on animal in satara