बहीण-भावाच्या श्रमदानाचे झाले चीज!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 जून 2018

गोंदवले - दुष्काळाचे चटके सोसल्याने आपला गावही दुष्काळमुक्त करायचाच, या उद्देशाने संपूर्ण उन्हाळी सुटीत राबलेल्या गोंदवल्याच्या रोहित व रक्षिताच्या या भाऊ-बहिणीच्या हातांनी आज खळाळते पाणी पाहिले. आपण केलेल्या जलसंधारणाच्या कामात आजच्या पावसाने घातलेला हा अभिषेकच असल्याच्या भावना या दोघांनी व्यक्त केल्या. 

दुष्काळ हद्दपार करायचाच म्हणून झपाटलेल्या गोंदवले खुर्दमधील १६ वर्षीय रोहित बनसोडे याने १३ वर्षीय बहीण रक्षिताच्या मदतीने उन्हाळ्याच्या सुटीत मौजमजा करण्यात वेळ न घालवता पाण्यासाठी कोणाच्याही व कसल्याही मदतीशिवाय काम सुरू केले. एक गुंठाही जमीन नसलेल्या रोहितने जलसंधारणाच्या ध्वनिचित्रफित पाहिल्यानंतर आपणही आपल्या गावासाठी अशी कामे करू शकतो, असे ठरविले. याचदरम्यान व्यायामासाठी जाताना त्याला जानाई तलावाचे उजाड माळरान जलसंधारणाच्या कामासाठी खुणावू लागले. उन्हाळ्याची सुटी सुरू होताच व्यायामासाठी येतानाच त्याने हातात फावडे व घरीच बनविलेली कुदळ घेतली व कामाला लागला. त्याच्या कुटुंबीयांना पूर्वकल्पना होती. त्यांनीही त्याला प्रोत्साहन दिले. रक्षिताही त्याच्या मदतीला धावली. दोघांनी दिवसभरात सुमारे पाच तास हे जलसंधारणाचे काम करून महिनाभरात ५२ हून अधिक समतल चरींचे खोदकाम व एक मोठा नालाबांधही घातला. 

हे काम पूर्ण झाल्यानंतर प्रतीक्षा होती ती पावसाची. काल (ता. २१) दुपारी ही प्रतीक्षाही संपली. भर पावसातच दोघांनी जानाईचे माळरान गाठले. केलेल्या कामात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाल्याचे पाहून दोघेही हरखून गेले.

गावाचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी प्रामाणिकपणे केलेल्या कामात आज पाणीसाठा झाल्याचे पाहून उन्हाळी सुटी कारणीभूत लागल्याचे मोठे समाधान झाले.
- रोहित बनसोडे, गोंदवले खुर्द

Web Title: drought labour donate water storage rain