ये रे माझ्या मागल्या... यंदाही दुष्काळाचे सावट

रूपेश कदम
रविवार, 2 एप्रिल 2017

‘जलयुक्त’चा काही गावांना फायदा; आगामी काळात प्रशासनाची लागणार कसोटी
मलवडी - माण तालुक्‍यात पुन्हा एकदा दुष्काळाची दाहकता जाणवू लागली आहे. जीवघेणा वाढता उन्हाळा हा पाणीटंचाईत भर घालतो आहे. अपवाद वगळता संपूर्ण तालुका भीषण दुष्काळाच्या सावटाखाली येण्याची शक्‍यता आहे. आगामी काळ सर्वसामान्यांसह, जनावरे व प्रशासनासाठी मोठा कसोटीचा ठरणार आहे.

‘जलयुक्त’चा काही गावांना फायदा; आगामी काळात प्रशासनाची लागणार कसोटी
मलवडी - माण तालुक्‍यात पुन्हा एकदा दुष्काळाची दाहकता जाणवू लागली आहे. जीवघेणा वाढता उन्हाळा हा पाणीटंचाईत भर घालतो आहे. अपवाद वगळता संपूर्ण तालुका भीषण दुष्काळाच्या सावटाखाली येण्याची शक्‍यता आहे. आगामी काळ सर्वसामान्यांसह, जनावरे व प्रशासनासाठी मोठा कसोटीचा ठरणार आहे.

माण हा दुष्काळासाठी कुप्रसिद्ध तालुका. या दुष्काळावर मात करण्यासाठी सामान्य जनता, स्वयंसेवी संस्था, राजकीय व्यक्ती व प्रशासकीय अधिकारी आपापल्यापरीने प्रयत्न करत आहेत. जलयुक्त शिवार अंतर्गत तालुक्‍यात झालेली कामे याचेच एक उदाहरण आहे; पण जलसंधारणाच्या या सर्व प्रयत्नांना निसर्गाची साथ लाभणे आवश्‍यक आहे. माणच्या तहानलेल्या मातीसाठी भरभरून पावसाची आवश्‍यकता आहे; पण तीन- चार वर्षांनंतर एखादा अपवाद वगळता माणवर वरुणराजाची कृपा होताना दिसत नाही. त्याचाच परिणाम म्हणून पाणीटंचाई व दुष्काळाचे हे दुष्टचक्र थांबताना दिसत नाही.

सध्या माणमधील १-५ पैकी ५७ गावे टंचाईग्रस्त घोषित करण्यात आली आहेत. या संख्येत दिवसागणिक भरच पडताना दिसत आहे. या गावांमध्ये पाणीटंचाईची भीषणता कमालीची वाढली आहे. विशेषतः कुळकजाई ते कारखेल या पश्‍चिमेत्तर भागात पावसाने ओढ दिल्याने या भागातील परिस्थिती अत्यंत बिकट झालेली आहे. येथील लोकांना स्वतःसह जनावरांच्या पाण्यासाठीही शासनावर अवलंबून राहावे लागत आहे.

मागील वर्षीच्या तुलनेत यंदा अजूनतरी टंचाईग्रस्त गावांची संख्या कमी आहे. त्याला कारण म्हणजे जलयुक्त शिवार योजनेंतर्गत जलसंधारणाची झालेली कामे होय. साखळी सिमेंट बंधाऱ्यांसह निसर्गही आहे. माणमधील सरासरी पर्जन्यमान ४६२.५ मिलिमीटर आहे; पण मागीलवर्षी दहिवडी (४९८ मिलिमीटर), मलवडी (४८० मिलिमीटर) व म्हसवड (५२६ मिलिमीटर) या मंडलांनी पावसाची सरासरी ओलांडली, तर मार्डी (४३५ मिलिमीटर) या मंडलाने सरासरी गाठली. त्यातही एक ऑक्‍टोबर रोजी दहिवडी, मार्डी, मलवडी, गोंदवले बुद्रुक व शिंगणापूर या मंडलांमध्ये २५ मिलिमीटर ते ५३ मिलिमीटर इतक्‍या पावसाची नोंद झालेली होती, तर सात ऑक्‍टोबर रोजी मार्डीत दहा मिलिमीटर व मलवडीत ३२ मिलिमीटर पाऊस झाला.

इतक्‍या मोठ्या प्रमाणात पाऊस होऊनही आंधळी धरण, पिंगळी, राणंद, ढाकणी व राजेवाडी तलाव या मोठ्या प्रकल्पांनी सध्या तळ गाठला आहे.
एवढा पाऊस पडूनही व जलयुक्तमध्ये समाविष्ट असूनही काही गावांमध्ये सध्या टॅंकर सुरू आहेत, तर काहींमध्ये पुढील काळात टॅंकर लागण्याची शक्‍यता आहे. दहिवडी, वारुगड, परकंदी, तोंडले, पिंगळी खुर्द, पळशी, हवालदारवाडी, वळई, वडगाव, राजवडी, बिजवडी, पाचवड, टाकेवाडी, कारखेल या जलयुक्त शिवारमध्ये सहभागी गावांमध्ये सध्या टॅंकर सुरू आहेत; पण जलयुक्तचा काही गावांना फायदाही झाला आहे. त्यात मलवडी, मोगराळे, इंजबाव, खुटबाव, मार्डी, थदाळे, दानवलेवाडी, किरकसाल, भांडवली, शिंदी खुर्द, पांढरवाडी, दिवडी, कोळेवाडी, काळचौंडी या गावांचा विशेष उल्लेख करावा लागेल. अद्याप तरी जनावरांसाठी चाऱ्याची मागणी झालेली नाही; पण उन्हाळ्याची दाहकता पाहता टंचाईची भीषणता अत्यंत तीव्र होणार आहे. 

‘जलयुक्त’मधून कामे होऊनही टंचाई!
दरम्यान, काही गावांमध्ये समाधानकारक पाऊस झाला. जलयुक्तमधून सिमेंट बंधाऱ्यांची साखळी उभी राहिली, असे असूनही त्या गावांकडून अनपेक्षितपणे टॅंकरची मागणी होत आहे. या ठिकाणी नक्की कशामुळे पाणीटंचाई निर्माण झाली, याचा शोध घेणे व त्यावर उपाययोजना करणे आवश्‍यक आहे.

Web Title: drought in man tahsil