मंत्र्यांच्या मतदारसंघाला दुष्काळातून वगळले 

drought
drought

सोलापूर : जिल्ह्यात दोन मंत्री आहेत. मात्र, त्या मंत्र्यांच्या तालुक्‍यांनाच दुष्काळातून वगळले आहे. दोन मंत्र्यांबरोबरच माजी पालकमंत्र्यांच्या तालुक्‍यातही दुष्काळ नाही. उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, बार्शी या तीन तालुक्‍यांचा अपवाद वगळता उर्वरित आठ तालुक्‍यांचा समावेश ट्रिगर दोनमध्ये केला आहे. म्हणजेच, या आठ तालुक्‍यांमध्ये दुष्काळ जाहीर होणार आहे. 

वनस्पती स्थिती निर्देशांक, क्रॉप कव्हर, जमिनीतील ओलावा या माध्यमातून दुष्काळाचे निकष निश्‍चित केले आहेत. बार्शी, उत्तर सोलापूर व दक्षिण सोलापूर या तालुक्‍यांत दुष्काळाची स्थिती सामान्य, अक्कलकोट, मोहोळमध्ये मध्यम तर करमाळा, माढा, मंगळवेढा, सांगोला, पंढरपूर, माळशिरस या सहा तालुक्‍यांमध्ये तीव्र दुष्काळ आहे. दुष्काळाच्या या स्थितीची यादी राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागाने निश्‍चित केली आहे. ट्रिगर दोन लागू झालेल्या तालुक्‍यातील 10 गावे निवडून त्या गावांतील सत्यमापन मोबाईल ऍपच्या माध्यमातून आठ दिवसांत शासनाला देण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. 

सहकारमंत्री सुभाष देशमुख हे दक्षिण सोलापूर व उत्तर सोलापूर तालुक्‍यातील 10 गावांचे प्रतिनिधित्व करतात. पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात उत्तर सोलापूर तालुक्‍यातील कोंडी व खेड या दोन गावांचा समावेश आहे. या दोन्ही मंत्र्यांच्या तालुक्‍यांना दुष्काळाच्या यादीतून वगळले आहे. माजी पालकमंत्री दिलीप सोपल यांच्या बार्शी तालुक्‍यालाही दुष्काळातून वगळले आहे. 

सप्टेंबरअखेर पडलेला सरासरी पाऊस टक्‍क्‍यांमध्ये 
उत्तर सोलापूर- 37.60, दक्षिण सोलापूर- 39.32, बार्शी- 59.16, अक्कलकोट- 35.22, मोहोळ- 38.41, माढा- 30.84, करमाळा- 25.03, पंढरपूर- 37.58, सांगोला- 38.29, माळशिरस- 41.11, मंगळवेढा- 37.22, एकूण- 38.16 टक्के. 

आमच्या आढावा बैठकीत सगळ्याच तालुक्‍यांत दुष्काळी स्थिती होती. तीन तालुके वगळले, असे होऊच शकत नाही. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी बोलतो. 
- विजयकुमार देशमुख, पालकमंत्री 

तालुक्‍याचा दुष्काळी दौरा केला आहे. स्थिती बिकट आहे. मोबाईल मॅपिंगवर तसे येतेय. तहसीलदारांना बोललो आहे. त्यांना माहिती द्यायला सांगितली आहे. हे तालुकेही दुष्काळाच्या यादीत येतील. 
- सुभाष देशमुख, सहकारमंत्री 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com