दुष्काळी सोलापूरला बचत गटांनी तारले

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 डिसेंबर 2018

सोलापूर - पाचवीला पुजलेल्या दुष्काळावर मात करत कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी जिल्ह्यातील महिलांनी बचत गटांच्या माध्यमातून कंबर कसली आहे. राज्यातील बचत गटांची अवस्था बिकट झाली असताना दुसरीकडे सोलापूर जिल्ह्यात सहा हजार 227 बचत गट अस्तित्वात असून, त्या माध्यमातून 87 हजार महिलांनी उद्योजकतेची वाट धरली आहे. त्यापैकी साडेबारा हजार महिलांनी स्वत:चे व्यवसाय सुरू केले असून, त्यांच्या वस्तूंना सध्या सोलापूरसह अन्य जिल्ह्यांमधून मोठी मागणी आहे.

ग्रामीण व शहरी महिलांना सक्षम करण्याच्या दृष्टीने शासनाने तेजस्विनी ग्रामीण महिला सक्षमीकरण अभियान, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आणि राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान राबविले. मोहोळ, माळशिरस या तालुक्‍यांत जीवनोन्नती अभियान; तर करमाळा, पंढरपूर, कुर्डूवाडी, सांगोला, मंगळवेढा, बार्शी, मैंदर्गी, दुधनी व अक्‍कलकोट या नगर परिषदांमध्ये राष्ट्रीय नागरी उपजीविका जीवनोन्नती अभियान राबविले जात आहे. प्लॅस्टिक बंदीनंतर काही महिलांनी कापडी व कागदी पिशव्या तयार करण्याचे उद्योग सुरू केले आहेत; तसेच लोकांच्या गरजा ओळखून महिलांनी ब्यूटी पार्लर, पशुपालन, शिवणकाम, भाजीपाला विक्री, कुक्कुटपालन असे व्यवसाय सुरू केल्याने ग्रामीण महिलांची वाटचाल सक्षमीकरणाकडे सुरू असल्याचे पाहायला मिळते.

Web Title: Drought Solapur Self Help Group