esakal | मिरजेत औषध गोदामास आग; सव्वा कोटीची औषधे, साहित्य खाक

बोलून बातमी शोधा

drug warehouse fire; Drugs worth crores Miraj

मिरज शहरातील रेल्वेस्थानकानजीक प्रताप कॉलनी परिसरातील औषध विक्रेते शशिकांत धनवडे यांच्या गोदामास आग लागून सव्वा कोटी रुपयांहून अधिक किमतीची औषधे आणि साहित्य खाक झाले.

मिरजेत औषध गोदामास आग; सव्वा कोटीची औषधे, साहित्य खाक

sakal_logo
By
प्रमोद जेरे

मिरज (जि. सांगली) : शहरातील रेल्वेस्थानकानजीक प्रताप कॉलनी परिसरातील औषध विक्रेते शशिकांत धनवडे यांच्या गोदामास आग लागून सव्वा कोटी रुपयांहून अधिक किमतीची औषधे आणि साहित्य खाक झाले. काल (ता. 10) रात्री सव्वादहा ते साडेदहाच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अग्निशमन दलाने केवळ काही मिनिटांत ही आग आटोक्‍यात आणली. 


रेल्वेस्थानकानजीक प्रताप कॉलनी परिसरात औषध विक्रेता संघटनेचे पदाधिकारी आणि आघाडीचे औषध विक्रेते शशिकांत धनवडे यांच्या मालकीचे औषध गोदाम आहे. धनवडे यांची औषधांची स्वतःची तीन दुकाने असून, अनेक मोठ्या कंपन्यांची होलसेल डीलरशिपही त्यांनी घेतली आहे. अनेक महागड्या औषधांचे वितरक म्हणूनही ते काम पाहतात. त्यांनी नुकतीच कोट्यवधी रुपयांची औषधे कोरोना आणि अन्य कारणास्तव खरेदी करून ठेवली होती.

काल रात्री सव्वादहा ते साडेदहाच्या सुमारास अचानक आग लागल्याचे शेजारील कुटुंबाच्या निदर्शनास आले. आग लागताच सर्वप्रथम इन्व्हर्टरचा स्फोट झाला आणि त्यानंतर आगीने छतासह खाली फर्निचर आणि अन्य साहित्यास वेढले. काही क्षणात संपूर्ण गोदामात आग पसरल्याने गोदामातील औषधे आणि फर्निचरला आगीची झळ पोचली. केवळ काही क्षणांत कोट्यवधी रुपयांच्या औषधांची राख झाली. आगीपासून बचावलेली औषधेही केवळ आगीची झळ लागल्याने फेकून द्यावी लागणार आहेत. 


महापालिकेच्या अग्निशमन दलाचे बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले. केवळ काही मिनिटांत ही आग जवानांनी आटोक्‍यात आणली. परंतु, तोपर्यंत गोदामातील कोट्यवधी रुपयांची औषधे आणि लाखो रुपयांचे फर्निचर, संगणक तसेच अन्य साहित्याचे मोठे नुकसान झाले. या आगीची महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. ही आग शॉर्टसर्किटने लागली असावी, असा प्राथमिक अंदाज महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. आज सायंकाळी उशिरापर्यंत घटनास्थळाचा पंचनामा सुरू होता.

संपादन : युवराज यादव