ड्राय मसालेपान आहे तरी काय ?

नंदिनी नरेवाडी
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

जेवल्यानंतर पचनासाठी अनेकजण मसालेपान खातात; परंतु दरवेळी ताजे पान मिळेलच याची शाश्‍वती नसते. यावर पर्याय शोधत सारिका चौगुले यांनी घरच्या घरी दीर्घकाळ टिकणारे मसालेपान तयार केले.

कोल्हापूर - जेवणानंतर अनेक जण हौसेने पान खातात. असे मसालेपान पानठेल्यावर जाऊन खाणाऱ्यांचे प्रमाणही अधिक आहे. पानठेल्यावर असे पान तत्काळ तयार केले जाते व अवघ्या काही वेळात खाल्लेही जाते. पण याच चवीचे मसालेपान कोरड्या स्वरूपात तयार करण्याची नवीन पद्धत शास्त्रीनगर येथील सारिका चौगुले यांनी रूढ केली. वर्षाकाठी २५० हून अधिक किलो हे कोरडे मसालेपान त्या बनवितात. हे ड्राय मसालापान बनविणे, साठविणे व दीर्घकाळ टिकवून खाणे, अशी नवी पद्धत लोकप्रिय होत चालली आहे. 

जेवल्यानंतर पचनासाठी अनेकजण मसालेपान खातात; परंतु दरवेळी ताजे पान मिळेलच याची शाश्‍वती नसते. यावर पर्याय शोधत सारिका चौगुले यांनी घरच्या घरी दीर्घकाळ टिकणारे मसालेपान तयार केले. खाऊचे पान वाळवून त्यामध्ये गुलकंद, धनाडाळ, बडीशेप आणि पाचक मसाले मिसळले. ताज्या मसालेपानाइतकीच त्याची चव कायम राहिली व हवाबंद डब्यात ठेवल्यानंतर दीर्घकाळ टिकूनही राहत होते. सुरवातीला घरापुरतेच असे मसालेपान त्या तयार करत होत्या. वर्षभर पुरेल इतके मसालेपान त्या घरी करायच्या. काही वर्षांपूर्वी त्या स्वयंसिद्धा संस्थेच्या सदस्या झाल्या.

संस्थेच्या शॉपीमध्ये व प्रदर्शनात त्यांनी हे ड्राय मसालेपान विक्रीस ठेवले. याला ग्राहकांसह खवय्यांची पसंती मिळाली. सध्या त्यांनी तयार केलेले हे ड्राय मसालेपान कोल्हापूरसह पुणे, मुंबई, सावंतवाडी, रत्नागिरी येथे पाठवले जात आहे. तसेच दुबई, अमेरिकेतही या मसालेपानाला मागणी आहे.

स्वयंसिद्धामुळे मदत

सुरवातीला घरच्यापुरते असे ड्राय मसालेपान तयार करत होते. स्वयंसिद्धामध्ये गेल्यानंतर तेथे या पानाला पसंती मिळाली. त्यानंतर माझा हा छोटा उद्योग सुरू झाला. 
- सारिका मिलिंद चौगुले

चार महिलांना रोजगारही
सारिका चौगुले गेल्या सात वर्षांपासून हे ड्राय मसालेपान बनवितात. घरच्या घरी त्यांचा हा लघुउद्योग सुरू होता. त्याच्या गुणवत्तेमुळे पानाला मागणी वाढू लागली. खाऊचे पान कट करण्यासाठी तसेच धनाडाळ, बडीशेप निवडण्यासाठी त्यांना मनुष्यबळाची गरज भासू लागली. यातूनच त्यांनी चार महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dry Masalepan New Business By Sarika Chougule